साराह निकोल लॅण्ड्री नावाची एक अतिशय लोकप्रिय इन्फ्लूएन्सर आहे. द बर्ड्स पपाया नावाचा तिचं पेज, पॉडकास्ट, ब्लॉग प्रचंड लोकप्रिय आहे. तर अलीकडचीच गाेष्ट साराहने आपला बिकिनीला फोटो शेअर केला आणि स्ट्रेच मार्कविषयी काही मोकळेपणानं लिहिलं ज्याची प्रचंड चर्चा झाली. खरंतर स्ट्रेच मार्क हा अनेक महिलांसाठी अतिशय काळजीचा विषय असतो. त्यातही बाजारपेठेनं निर्माण केलेले कॉम्प्लेक्स की तुमच्या पोटावर दिसणारे स्ट्रेच मार्क घाणेरडे दिसतात. अमूक क्रीम लावा, तमूक तेल लावा. स्ट्रेच मार्क घालवा. गरोदरपणातही अनेकींना आपल्याला स्ट्रेच मार्क येऊ नयेत याचीच जास्त काळजी वाटते. पण काळ बदलतो आहे, अनेकजणी आता सांगतात की स्ट्रेच मार्कमध्ये लपवण्यासारखं काही नाही.
परदेशी साराहच कशाला, आपल्याकडचंही एक उदाहरण आहे..
तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतल्या रिटा रिपार्टरने आपल्या बाळासह समूद्र किनारीचा एक फोटो शेअर केला होता. त्यात तिनंही बिकिनी घातली होती. त्यात ती म्हणते, वाढलेलं वजन आणि स्ट्रेच मार्क यात लपवण्यासारखं काहीही नाही.
आता परवाच्या पोस्टमध्ये साराहनेही हेच लिहिलं आहे.
ती म्हणते, ‘स्ट्रेच मार्कसह बिकिनी घालून मी एका ब्यूटी प्रॉडक्टचं शूट केलं. मॉडेल झाले. आपल्याला स्ट्रेच मार्क आहेत हे मान्य करायला मला ५ वर्षे लागली, आणि ८ वर्षे लागली स्वत:ला आहे तसं स्वीकारायला! आता दुनिया गेली उडत..’
मदर्स डेच्या आमेमागेच बायकांना स्ट्रेच मार्क घालवा असं बाजारपेठ सतत सांगत असताना कुणीतरी आपले स्ट्रेच मार्क बिकिनी घालून मिरवणं हेच नव्या काळातील महिलांचं स्टेटमेण्ट आहे.
आहेत स्ट्रेचमार्क तर..
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांच्या दृष्टिकोनातून कमी महत्वाची आणि गर्भवती महिलांसाठी संवेदनशील बाब म्हणजे- स्ट्रेच मार्क्स.
गर्भावस्थेत शरीरात फॅटचं ( चरबी )प्रमाण वाढत असतं. गर्भाशयाचा आकार वाढत असल्यामुळे पोटाच्या त्वचेखालील वाढलेल्या चरबीवर ताण येतो आणि तिथे सूक्ष्म अशी इजा होते आणि त्याचं रूपांतर स्ट्रेच मार्क्समधे होतं. असा बदल फक्त पोटावरच्या त्वचेवरच होतो असं नाही तर स्तनांवर, मांड्यांवर देखील झालेला आढळतो.
पोटावरचे स्ट्रेच मार्क्स अर्थातच सौंदर्याच्या दृष्टिकोनातून मान्य होण्यासारखी बाब नाही.
बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही मलमाचा वापर केल्यानं स्ट्रेच मार्क्सवर प्रतिबंध घालता येतो.
काही आठवड्यात गर्भावस्थेत झालेले शारीरिक बदल पूर्वपदावर येतात तसे स्ट्रेच मार्क्स देखील गायब होतात.
बाळंतपणानंतर, डॉक्टरच्या सल्ल्यानं फिटनेस कार्यक्रम सुरु केल्यास स्ट्रेच मार्क्स लवकर गायब होण्यास मदत होईल.
आणि ते राहिले तरी त्यात लाज किंवा शरम वाटावी असं काही नाही!