उन्हाळा म्हणजेच मराठी वर्षाचा पहिला महिना सुरू होतो तेव्हा हवामानात वेगाने बदल होतात. कडाक्याची थंडी कमी झालेली असते आणि हवेतील तापमान वाढण्यास सुरुवात झालेली असते. अशावेळी या तापमानाशी जुळवून घेताना शरीराला बरेच बदल करावे लागतात. नवीन हवामानाशी जुळवून घेण्यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणे आवश्यक असते. या सगळ्या गोष्टींसाठी आयुर्वेदात आणि भारतीय परंपरेत आहाराशी निगडीत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. पाडवा म्हणजे चैत्र महिन्याचा पहिला दिवस. या दिवशी उभारल्या जाणाऱ्या गुढीला कडूनिंबाचा पाला लावला जातो. इतकेच नाही तर हा आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर असल्याने आंघोळीच्या पाण्यात घालण्याची आणि त्याची चटणी करण्याचीही पद्धत आहे. आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. संदिप काळे कडूनिंबाचे आरोग्याला असणाऱ्या फायद्यांविषयी काय सांगतात (Gudi Padwa 2023 Benefits of Neem Leaves).
१. त्वचेसाठी फायदेशीर
कडूनिंब जंतुघ्न असल्याने कोणत्याही त्वचाविकारात कडूनिंबाच्या पाल्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. आंघोळीचे पाणी गरम करताना पाण्यात टाकल्यास त्यातील गुणधर्म पाण्यात उतरतात आणि ते पाणी अंगावर घेतल्यास त्वचाविकार दूर होण्यास मदत होते. बरेचदा थंडीने किंवा जास्त उष्णतेने त्वचा कोरडी पडते. अशावेळी कडूनिंबाच्या तेलाचा त्वचेवर वापर केल्यास निश्चितच फायदा होतो.
२. कफ आणि उष्णतेच्या विकारांवर उपयुक्त
कडूनिंबाची चव अतिशय कडू असते. बदलत्या हवामानात सर्दी-कफाचे विकार वाढतात. आयुर्वेदाच्या काही औषधांमध्ये कडूनिंबाचा वापर केला जातो. तसेच कडूनिंब शीत प्रकृतीचा असल्याने उष्णतेच्या विकारांसाठीही कडूनिंब पोटात घेणे फायदेशीर ठरते. यामुळे उष्णतेचे विकार नियंत्रणात येण्यास मदत होते.
३. मधुमेहासाठी फायदेशीर
मधुमेह असणाऱ्या व्यक्तींच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. रक्तातील ही साखर नियंत्रणात राहावी यासाठी कडूनिंब अतिशय फायदेशीर असतो. यामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.
४. रक्त शुद्धीसाठी उपयुक्त
रक्ताशी निगडीत समस्या असल्यास कडुलिंब खाण्याचा सल्ला दिला जातो. कडूनिंब हा रक्त शुद्ध करण्यासाठी उत्तम उपाय असल्याने रक्तशुद्धीसाठी त्याचा चांगला उपयोग होतो. पोटातून काढा दिल्यास त्याचा फायदा होतो.
५. केसांच्या सौंदर्यासाठी
महिलांमध्ये केस गळणे, केसांत कोंडा होणे, उवा किंवा लिखा होणे अशा समस्या वारंवार उद्भवताना दिसतात. अशावेळी कडूनिंबाच्या पानांचा रस केसांना लावल्यास या समस्या दूर होण्याची शक्यता असते. त्यामुळे केसांच्या समस्यांसाठीही कडूनिंब उपयुक्त असतो.