पीसीओडी संदर्भातील अभ्यास सांगतो, की ही समस्या सध्याच्या काळात बहुतांश महिलांमध्ये आढळते. पीसीओडी ही समस्या एकदा निर्माण झाली की ती बरी होत नाही, पण ती नियंत्रणात मात्र ठेवता येते. यासाठी औषधोपचारांसोबतच खाण्यापिण्याची पथ्यं पाळणंही आवश्यक आहे. पीसीओडी हा जीवनशैलीशी निगडित आजार असल्यामुळे तो नियंत्रित ठेवण्यासाठी खाण्यापिण्याचे नियम पाळणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
Image: Google
पीसीओडी आणि खाण्यापिण्याचे नियम
1. पीसीओडी या समस्येत शरीरातील इन्शुलिनची पातळी वाढते. त्यामुळे ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेले पदार्थ म्हणजे ज्या पदार्थांमुळे रक्तातील साखर एकदम वाढत नाही असे पदार्थ. हा नियम पाळण्यासाठी आहारात तेलकट आणि गोड पदार्थ टाळायला हवेत. पांढऱ्या तांदळाऐवजी हातसडीच्या तांदळाचा भात खावा. पीसीओडी नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रक्रियायुक्त पदार्थ आहारात टाळायला हवेत. यासाठीच आहारात साखरेचं प्रमाण नियंत्रित हवं आणि पॅकेज्ड फूड टाळायला हवं.
2. फळांमध्ये बेरी फळांचा समावेश करावा. स्ट्राॅबेरी, द्राक्षं, चेरी ही फळं खावीत. आहारात पपईचाही अवश्य समावेश करावा.
3. पीसीओडी नियंत्रणात ठेवण्यासाठी ब्रोकोली, पालक, मेथी या भाज्या नेहमीच्या आहारात असाव्यात. या भाज्यांमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. पीसीओडीत वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी आहारात फायबरचं प्रमाण जास्त असणं आवश्यक आहे.
Image: Google
4. दोन जेवणाच्यामध्ये भूक लागल्यास बदाम, अक्रोड, पिस्ते हा सुकामेवा खायला हवा. तसेच जवस, चिया सीड्स, सूर्यफुलांच्या बिया या बिया सेवन करणं पीसीओडी नियंत्रणासाठी आवश्यक मानलं जातं. तसेच बाहेर जातांना आपल्यासोबत पौष्टिक खाऊचा डबा अवश्य असावा. यामुळे मध्ये भूक लागल्यास बाहेरचे आरोग्यास अपायकारक पदार्थ खाणं टाळलं जातं.
5. पीसीओडीमध्ये मूड जाणे, उदास वाटणे या मानसिक समस्याही निर्माण होतात. मूड चांगला होण्यासाठी आहारात दही असणं आवश्यक आहे. तसेच गोड खाण्याची इच्छा झाल्यास डार्क चाॅकलेट खावं.