एखाद्या लैंगिक आजार झालेल्या व्यक्तीशी लैंगिक संबंध आल्यास ओटीपोटाचा दाह रोग होऊ शकतो. सुरुवातीला काहीच लक्षणं दिसत नाहीत. पण आजार बळावला, खूपच त्रास होऊ लागला कि ओटीपोटाचा दाह रोग झाल्याचं लक्षात येतं. अनेकदा उशीर झालेला असतो आणि या आजारात रुग्णाचा मृत्यू होण्याचाही संभव असतो. त्यामुळे हा आजार होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे हे समजून घेऊया!
काय आहेत प्रतिबंधक उपाय? १) एकापेक्षा जास्त लैंगिक जोडीदार नकोत. २) जरी गर्भनिरोधक वापरत असाल तरीही कंडोम वापरला पाहिजे. ३) गर्भधारणा होऊ नये म्हणून तर कंडोम आवश्यक आहेच पण लैंगिक आजार आणि इन्फेक्शन्स होऊ नये यासाठीही कंडोम वापरणं गरजेचं आहे.
४) नियमित स्त्रीरोगतज्ज्ञांकडे जाऊन तपासणी केली पाहिजे. ५) ओटीपोटात होणारे अनेक संसर्गाचं वेळीच निदान झालं तर पुढे जाऊन प्रजनन अवयवांपर्यंत पसरणारा संसर्ग रोखता येऊ शकतो. ६) जोडीदाराला तुमच्या व्यतिरिक्त अजूनही लैंगिक जोडीदार असतील तर अशा व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेऊ नयेत. ७) अनेक वर्ष तोंडावाटे घेण्याच्या गर्भनिरोधकांमुळेही ओटीपोटाचा दाह रोग होऊ शकतो. त्यामुळे काही काळ गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानंतर थांबवायला हव्यात. ८) गर्भनिरोधक डिव्हाइस किंवा आययूडी जर बसवलेलं असेल तरीही वरचेवर स्त्रीरोगतज्ज्ञांकडे जाऊन तपासणी केली पाहिजे. कारण पहिले काही महिने अतिशय महत्वाचे असतात. कुठलीही वेगळी गोष्ट किंवा संसर्ग जाणवला तर लगेच डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे. ९) निकोटिनच्या अतिसेवनामुळेही ओटीपोटाचा दाह रोग होऊ शकतो. त्यामुळे धूम्रपान पूर्णपणे थांबवलं पाहिजे किंवा ते अतिशय कमी प्रमाणात केलं पाहिजे.
ओटीपोटाचा दाह रोगावरील उपचार ओटीपोटाचा दाह रोगावर योग्य निदान आणि उपचार अतिशय गरजेचे आहेत. कारण योग्य निदान आणि उपचार झाले नाहीत तर काहीवेळा प्रचंड वेदना होऊ शकते तसंच वंध्यत्वाचीही शक्यता असते. उपचारांच्या काही आठवड्यानंतर ओटीपोटाची सोनोग्राफी केली जाते. ज्या स्त्रियांना तीव्र संसर्ग असतो त्यांना लॅप्रोस्कोपी करायचा सल्ला डॉक्टर्स देतात. हा आजार टाळायचा असेल तर मुळात सुरक्षित लैंगिक संबंध अतिशय महत्वाचे आहेत. एकापेक्षा जास्त जोडीदार असता कामा नयेत. जोडीदारानेही नियमितपणे कुठले संसर्ग नाहीत ना याची तपासणी केली पाहिजे. काहीवेळा उपचारांनंतर रुग्णांना निराशा येते. अशावेळी समुपदेशकांची मदत घेतली पाहिजे.
विशेष आभार: डॉ. माधुरी मेहेंदळे
(MBBS, DGO, FCPS, DNB)