Join us   

गर्भाशयातील फायब्रॉइड्स अर्थात गाठींचा आजार घातक असतो का? बरा होतो का, उपचार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 4:02 PM

गर्भाशयातील फायब्रॉइड्स हे शब्द ऐकले की अनेकजणी घाबरतातच. टाळतात त्यावर उपचार घेणं, पण तसं करत अंगावर त्रास काढणं धोक्याचं ठरू शकतं.   

ठळक मुद्दे मोठ्या वारंवार उद्भवण्याऱ्या गाठींमुळे होताऱ्या तीव्र त्रासासाठी गर्भाशय काढून टाकणं हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. लेखातील सर्व छायाचित्रे-गुगल

गर्भाशयातील फायब्रॉइड्स हे शब्द ऐकले की अनेकजणी घाबरतातच. स्रीच्या गर्भाशयाच्या भिंतीत वाढणारे हे ट्यूमर्स असतात. हे ट्यूमर्स कॅन्सरचे नसतात, मात्र त्यांच्यामुळे रक्तस्राव, वेदना आणि इतर त्रासदायक लक्षणं दिसू शकतात. हे फायब्रॉइड्स सामान्यतः स्त्रीच्या मुलं होण्याच्या (प्रजननक्षम) वयात तयार होतात कारण हे फायब्रॉइड्स बीजांडकोषातून स्रवणाऱ्या इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सवर पोसले जातात. मात्र काही स्रियांना रजोनिवृत्तीनंतरही त्याचा त्रास होऊ शकतो. रजोनिवृत्तीनंतर गर्भाशयाचे काम कमी झाल्यामुळे हार्मोन्सचा स्राव कमी होत असल्याने लहान आकाराचे फायब्रॉइड्स आक्रसू शकतात.

फायब्रॉइड्स तयार होण्यामागचे काही रिस्क फॅक्टर्स

उच्च रक्तदाब ड जीवनसत्त्वाची कमतरता फायब्रॉइड्सचा कौटुंबिक इतिहास लठ्ठपणा कधीही गरोदरपण न येणे जुनाट, अतीव ताण

लक्षणं

फायब्रॉइड्सचा प्रजननक्षम वयातल्या आणि रजोनिवृत्तीनंतरच्या वयातल्या स्रियांना वेगवेगळ्या प्रकारचा त्रास होऊ शकतो. सामान्यतः प्रजननक्षम वयातील स्रियांमध्ये जास्त तीव्र लक्षणं आढळतात. काही स्रियांना कुठलीही लक्षणं जाणवत नाहीत, पण त्यांच्या डॉक्टरला नियमित तपासणी करतांना फायब्रॉइड्स सापडतात.  मात्र स्रियांना जाणवणारी काही लक्षणं म्हणजे : अति रक्तस्राव वारंवार स्पॉटिंग (अगदी कमी रक्तस्राव) होणं पाळीसारखं पोट दुखणं ओटीपोट भरल्यासारखं वाटणं पोटावर सूज असणं पाठीच्या खालच्या भागात वेदना होणं शिंकताना किंवा खोकताना नियंत्रण सुटून थोडीशी लघवी होणं किंवा वारंवार लघवीला होणं शारीरिक संबंधांच्या वेळी वेदना होणं ताप मळमळ डोकेदुखी

 

महिलांना या फायब्रॉइड्सपासून रजोनिवृत्तीनंतर कर्करोग होऊ शकतो का?

यात सार्कोमा नावाचा कर्करोग होण्याची अत्यंत कमी म्हणजे ०.२७% शक्यता असते. या गाठींवर उपचार करण्यासाठी खाली दिलेले विविध पर्याय आहेत.

हार्मोनल थेरपीज

वेदना आणि अति रक्तस्राव या लक्षणांसाठी संततिनियमनाच्या गोळ्यांचा उपयोग होतो. मात्र, त्यांच्यामुळे गाठी कमी किंवा नाहीशा होत नाहीत. संशोधनातून असं दिसतं की या गाठींसाठी फक्त प्रोजेस्टिन असलेल्या आणि कॉम्बिनेशन स्वरूपाच्या संततिनियमनाच्या गोळ्यांचा उपयोग होतो. प्रोजेस्टिनमुळे रजोनिवृत्तीच्या इतर लक्षणांमध्येही फरक पडतो आणि हार्मोन रिप्लेसमेंटच्या उपचारांची परिणामकारकता वाढते. इतर हार्मोनल ट्रीटमेंट्समध्ये प्रोजेस्टिनची इंजेक्शन्स आणि प्रोजेस्टिन असणाऱ्या गर्भाशयाच्या आत बसवण्याच्या साधनांचा समावेश होतो. आता ऍरोमॅटेज इनहिबिटर्स, मिफेप्रिस्टन किंवा युलिप्रिस्टलसारखी अँटीप्रोजेस्टिन आणि गोनॅडोट्रोपीन सोडणाऱ्या अगॉनिस्टसारख्या हार्मोन्सची नवीन औषधं आहेत. त्यांचाही काही प्रमाणात उपयोग होतो.

Myomectomy- मायोमेक्टोमी ही गर्भाशयातील गाठी काढून टाकण्याची शस्त्रक्रिया असते. गाठी जर का गर्भाशयाच्या आत असतील तर ही हिस्टेरोस्कोपी नावाची शस्त्रक्रिया एका बारीक नळीवाटे करता येते. काही वेळा गाठी काढण्यासाठी ओटीपोटावर एक बारीक छेद घ्यावा लागतो. मात्र ही पद्धत फारशी वापरली जात नाही. ही शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारेही करता येऊ शकते आणि लहान गाठींसाठी सामान्यतः तीच वापरली जाते.

हिस्टेरेक्टोमी मोठ्या वारंवार उद्भवण्याऱ्या गाठींमुळे होताऱ्या तीव्र त्रासासाठी गर्भाशय काढून टाकणं हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. या शस्त्रक्रियेमध्ये संपूर्ण गर्भाशय किंवा त्याचा काही भाग काढून टाकला जातो.

गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया खालील महिलांसाठीही उपयुक्त ठरते..

रजोनिवृत्तीच्या जवळ असलेल्या एकाहून अधिक गाठी असलेल्या खूप मोठ्या गाठी असलेल्या इतर उपचारपद्धती वापरून झालेल्या आणि अधिक नेमका उपचार हव्या असणाऱ्या भविष्यात मुलं होऊ देण्याचा विचार नसणाऱ्या

गर्भाशयातील गाठींसाठी उपलब्ध असणारे, कमीतकमी शस्त्रक्रियेचा भाग असणारे इतर काही उपचार म्हणजे.. 

मायलोसिस, यात गाठी आणि त्यांच्या रक्तवाहिन्या उष्णता किंवा विजेचा वापर करून नष्ट केल्या जातात. मॅग्नेटिक रेझोनन्स गाईडेड फोर्स्ड अल्ट्रासाऊंड सर्जरी, हिच्यात हाय-एनर्जी, हाय-फ्रिक्वेन्सी ध्वनी लहरींचा वापर करून गाठी नष्ट केल्या जातात. एन्डोमेट्रियल अब्लेशन, यात उष्णता, विजेचा करंट किंवा गरम पाणी वापरून गर्भाशयाचा आतील स्तर नष्ट केला जातो. युटेराइन आर्टरी एम्बोलायझेशन, यात गाठींना होणार रक्तपुरवठा कापला जातो.

निष्कर्ष

गर्भाशयातील गाठी या सामान्यतः प्रजननक्षम वयातील स्रियांमध्ये आढळून येत असल्या तरी त्या रजोनिवृत्तीच्या काळातही होऊ शकतात आणि त्यांचा बऱ्यापैकी त्रास होऊ शकतो. तुम्हाला या गाठींमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल तुमच्या डॉक्टरशी बोला आणि तुमच्यासाठी शस्त्रक्रिया हा योग्य पर्याय आहे का याबद्दलही चर्चा करा. काही वेळा, जर गाठींचा काहीही त्रास होत नसेल तर त्यांना कुठल्याही उपचाराची आवश्यकता नसते.

तज्ज्ञ सल्ल्यासाठी विशेष आभार - डॉ. मिलिंद शहा (MD, DGO, DFP, FICOG)

टॅग्स : महिला