Lokmat Sakhi >Health >Gynaecology Disorder > सर्व्हायकल कॅन्सरचे संकेत देतात साधे वाटणारे हे बदल; जीवघेणा कॅन्सर रोखण्यासाठी डॉक्टर सांगतात....

सर्व्हायकल कॅन्सरचे संकेत देतात साधे वाटणारे हे बदल; जीवघेणा कॅन्सर रोखण्यासाठी डॉक्टर सांगतात....

Cervical Cancer Awareness : महिलेची सुविधा हा केंद्रबिंदू मानून तपासणीच्या अनेक पद्धती आजच्या काळात विकसित करण्यात आल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 01:36 PM2023-01-27T13:36:58+5:302023-01-27T13:54:59+5:30

Cervical Cancer Awareness : महिलेची सुविधा हा केंद्रबिंदू मानून तपासणीच्या अनेक पद्धती आजच्या काळात विकसित करण्यात आल्या आहेत.

Cervical Cancer Awareness : Causes, Symptoms, Diagnosis & Treatment | सर्व्हायकल कॅन्सरचे संकेत देतात साधे वाटणारे हे बदल; जीवघेणा कॅन्सर रोखण्यासाठी डॉक्टर सांगतात....

सर्व्हायकल कॅन्सरचे संकेत देतात साधे वाटणारे हे बदल; जीवघेणा कॅन्सर रोखण्यासाठी डॉक्टर सांगतात....

भारतातील महिलांना सर्रास ग्रासणाऱ्या कर्करोगांच्या यादीत सर्व्हायकल कॅन्सरचा क्रमांक दुसरा आहे. भारतात सर्व्हायकल कॅन्सरमुळे दर दिवशी जवळपास २००, दर तासाला ८ आणि दर ७ मिनिटांनी १ महिला मृत्युमुखी पडते. (Cervical Cancer  Causes, Symptoms, Diagnosis & Treatment) ९९% पेक्षा जास्त सर्व्हायकल कॅन्सर केसेसमध्ये ह्युमन पॅपीलोमा व्हायरस (एचपीव्ही) १६ आणि १८ यासारखे जास्त जोखीम असलेले जेनोटाईप्स कारणीभूत असल्याचे आढळून येते. या विषाणूमुळे अनेक महिलांना आपल्या प्रजननक्षम वयामध्ये जीव गमवावा लागतो. अनेक महिलांमध्ये एचपीव्ही संसर्ग प्रदीर्घ काळपर्यंत राहतो आणि मग त्याचे रूपांतर सर्व्हिक्स अर्थात गर्भाशय ग्रीवाचा प्रीकॅन्सर ते प्राथमिक आणि नंतर आक्रमक कर्करोगामध्ये होते.

पण बऱ्याच केसेसमध्ये एचपीव्हीचा संसर्ग झालेल्या महिलांना आपल्याला संसर्ग झाला आहे हेच कळून येत नाही, शरीरात संसर्ग झालेला असतो पण लक्षणे दिसून येईपर्यंत त्याची काहीच कल्पना नसते. काही केसेसमध्ये एचपीव्हीची काहीच लक्षणे आढळून येत नाहीत. त्यामुळे नियमितपणे तपासणी करून घेणे हा सर्व्हायकल कॅन्सर आहे अथवा नाही हे समजून घेण्याचा एकमेव मार्ग आहे. डॉ. व्ही. रवी (व्हायरॉलॉजिस्ट आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख, टाटा मेडिकल अँड डायग्नॉस्टिक्स) यांनी कॅन्सरची लक्षणं, उपचारांबाबत अधिक माहिती दिली आहे.

सर्व्हायकल कॅन्सरची लक्षणे 

प्राथमिक टप्प्यांमध्ये सर्व्हायकल कॅन्सरची काहीच लक्षणे दिसून येत नाहीत, म्हणूनच नियमितपणे तपासणी करवून घेणे महत्त्वाचे असते. सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये जर काही लक्षणे दिसून येत असतील तर त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो:

योनीमार्गातून असामान्य रक्तस्त्राव, उदाहरणार्थ, दोन मासिकपाळ्यांच्या मधल्या काळात, लैंगिक संबंध ठेवल्यानंतर किंवा रजोनिवृत्तीनंतर लैंगिक संबंधांदरम्यान ओटीपोटात वेदना होणे किंवा अस्वस्थता आणि वेदना. मासिकपाळीतील रक्तस्त्राव दीर्घकाळपर्यंत आणि सामान्यपेक्षा खूप जास्त होणे, योनीमार्गातून स्त्राव येणे, हा स्त्राव घट्ट असतो, त्याला दुर्गंध येतो आणि रक्ताच्या रंगाचा असतो.

जसजसा कॅन्सर वाढत जातो आणि गर्भाशय ग्रीवाच्या बाहेर शरीरातील इतर भागांपर्यंत पसरतो, त्याची पुढीलप्रमाणे लक्षणे दिसून येतात  

लघवी करताना वेदना होणे, अस्वस्थता जाणवणे, लघवीवर संयम न राहणे.बद्धकोष्ठता आणि पोटातील सवयींवर इतर बदल, हाडांमध्ये वेदना होणे.  बाजूला किंवा पाठीत खूप वेदना होणे,  शरीराच्या खालच्या अवयवांना सूज येणे,  कमकुवतपणा किंवा थकवा, भूक न लागणे किंवा वजन कमी होणे. 

ही लक्षणे इतर काही कारणांमुळे देखील दिसून येऊ शकतात, उदाहरणार्थ, एखादा संसर्ग किंवा इतर प्रकारचा कॅन्सर. त्यामुळे नक्की निदान करून घेण्यासाठी डॉक्टरांना दाखवणे आवश्यक आहे. लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास उपचार सुरु होण्यास विलंब लागू शकतो आणि उपचार कमी प्रभावी ठरू शकतात.

तपासणी करून घेण्याची सुरुवात कशी करावी

प्रत्येक महिलेने आपल्या शरीरातील प्रजनन यंत्रणेच्या आरोग्याला प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक आहे.  त्यासाठी डॉक्टरकडून नियमितपणे तपासणी करून घ्यावी. आजाराचे निदान लवकरात लवकर केले गेले तर रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता वाढते.

आजार लवकरात लवकर लक्षात आला पाहिजे यावर भर देत, पॅप स्मियर टेस्ट, व्हिज्युअल तपासणी आणि लिक्विड-बेस्ड सायटोलॉजी यासारख्या पारंपरिक तपासणी पद्धतींचा उपयोग करून महिलेच्या शरीरात कॅन्सरपूर्व बदल होत आहेत अथवा नाही हे तपासले जायचे. आताच्या काळात एचपीव्ही डीएनए शोधून काढणे शक्य झाले आहे त्यामुळे आजार लवकरात लवकर लक्षात येणे शक्य आहे. २५ वर्षे वयापासूनच एचपीव्ही संसर्गासाठी तपासणी करून घेण्यास सुरुवात करावी आणि ६५ वर्षे वयापर्यंत दर पाच वर्षांनी एचपीव्ही तपासणी करून घ्यावी.

सर्व्हायकल पेशींमध्ये होणारे बदल प्राथमिक टप्प्यामध्ये असतानाच जर लक्षात आले तर आजाराचे निदान केले जाऊ शकते, त्यावर उपचार करणे आणि आजार पूर्णपणे बरा करणे देखील शक्य असते.  पण असे जर झाले नाही तर कर्करोगाच्या पेशी शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतील. या कर्करोगाचे निदान जर वेळेत केले गेले तर त्याला आळा घालण्यासाठी उपचार उपलब्ध आहेत.

आजच्या काळात तपासणीकडे दुर्लक्ष का केले जाते? 

सर्व्हायकल कॅन्सरचे निदान केले जावे आणि त्यावर उपचार केले जावेत यासाठी नियमितपणे प्राथमिक तपासणी करून घेणे महत्त्वाचे असल्याचे अनेक संघटना गेली अनेक वर्षे सांगत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने देखील यावर सातत्याने भर दिला आहे. असे असून देखील जागरूकतेचा अभाव आणि कर्करोगाविषयीच्या गैरसमजुती व सामाजिक कलंक यामुळे सर्व्हायकल कॅन्सरच्या तपासणीकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण खूप जास्त आहे.

ह्युमन पॅपीलोमा विषाणू सर्व्हायकल कॅन्सरला कारणीभूत ठरत असल्याने, तपासणीसाठी आलेल्या महिलांना त्यांच्या लैंगिक आरोग्याविषयी डॉक्टरसोबत बोलावे लागू शकते, जे त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे आजाराची लक्षणे खूप उशिरा लक्षात येतात. तपासणीसाठी नमुने घ्यावे लागतात.

एखाद्या तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली तपासणी करून घेण्यासाठी महिलांना एखाद्या जवळच्या क्लिनिक किंवा रुग्णालयात जावे लागू शकते, ही बाब अनेक महिलांसाठी किचकट आणि अडचणीची ठरू शकते. या आजाराविषयीचे गैरसमज दूर करणे आणि महिलांना जास्तीत जास्त सोयीचे होतील असे तपासणी फॉरमॅट तयार करणे खूप गरजेचे आहे.  त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना तपासणी करून घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, परिणामी आजाराचे प्रमाण, मृत्युदर यामध्ये लक्षणीय घट होईल.

तपासणी अधिक सहजसोपी बनली आहे. 

महिलेची सुविधा हा केंद्रबिंदू मानून तपासणीच्या अनेक पद्धती आजच्या काळात विकसित करण्यात आल्या आहेत. सेल्फ-सॅम्पलिंग पद्धतींमुळे महिलांना नमुने गोळा करणे देखील खूप सोपे बनले आहे कारण आता यावर तज्ञांनी देखरेख करणे गरजेचे नाही.  जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच असे सुचवले आहे की, कोणतीही लक्षणे दिसून येत नसतानाच्या टप्प्यात धोकादायक जेनोटाईप्स शोधून काढण्याचा सर्वात सक्षम मार्ग म्हणजे एचपीव्ही डीएनए टेस्ट आहे.

देशात विकसित करण्यात आलेले एचपीव्ही आरटी-पीसीआर किट आणि सेल्फ-सॅम्पलिंग स्वॅबसोबत असणारे डायग्नोस्टिक सोल्युशन हे महिलांना स्वतः एकट्याने सेल्फ-सॅम्पलिंग अगदी सहजपणे करता यावे यादृष्टीने डिझाईन करण्यात आले आहे. एचपीव्ही तपासणीसाठी नमुने गोळा करण्यामध्ये महिलांना जो संकोच वाटतो आणि अडचणी येतात त्या दूर होण्यात यामुळे मदत होईल.

कोविडनंतरच्या काळात इतक्या पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध झाल्यामुळे महिलांनी घरच्या घरी स्वतः नमुने गोळा करणे सुरु केले पाहिजे. त्यातून मोठ्या प्रमाणावर तपासणी उपक्रम राबवण्यासाठी सरकारला देखील प्रोत्साहन मिळेल. सार्वजनिक आरोग्य समस्या बनलेल्या सर्व्हायकल कॅन्सरला संपूर्णपणे आळा घालण्याचे उद्दिष्ट २०३० सालापर्यंत पूर्ण करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने आखलेल्या ग्लोबल स्ट्रॅटेजीमध्ये हे भारताचे खूप मोठे योगदान ठरेल.

Web Title: Cervical Cancer Awareness : Causes, Symptoms, Diagnosis & Treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.