मनाली बागुल
जगभरात कोरोना व्हायरसच्या संसर्गानं धुमाकुळ घातला आहे. लोकांना घरी राहण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता. कोरोनामुळे फक्त शारीरिक समस्याच नाही तर सतत घरात राहून कौटुंबिक समस्याही उद्भवत आहेत. कोरोना व्हायरसमधून बरं झाल्यानंतर अनेकांना पोस्ट कोविडच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. हा व्हायरस माणसांच्या लैगिंक जीवनावर परिणाम करत असल्याचं (effect of covid-19 on Sex Life) दिसून आलं आहे. खरंतर कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे व्यक्तीच्या लैगिंक क्षमतेवर कोणताही परिणाम नसून परिस्थितीजन्य घटकांमुळे लोकांच्या लैंगिक इच्छा, आवडी निवडींवर नकळतपणे परिणाम झाला आहे.
प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट अर्थात लैंगिक विकार तज्ज्ञ राजन भोसले यांनी लोकमतला माहिती देताना सांगितले की, ''कोरोना संसर्गाच्या काळात जोडप्यांच्या लैंगिक जीवनावर चांगला आणि वाईट अशा दोन्ही प्रकारे परिणाम झालाय. म्हणजेच प्रत्येक घरातील परिस्थितीप्रमाणे महिला आणि पुरूषांच्या लैगिंक जीवनात बदल घडून आले आहेत. यातील काही बदल सकारात्मक आहेत तर काही नकारात्मक. ''
डॉ. भोसले सांगतात, ''आधी ज्या जोडप्यांची अशी तक्रार होती की त्यांना लैगिंक जीवनाचा आनंद घेण्यासाठी व्यवस्थित वेळ मिळत नाही. कामानिमित्तानं घराच्याबाहेर जास्त असतात, आता लॉकडाऊनमुळे घरीच राहिल्यानं किंवा वर्क फॉर्म होम केल्यानं त्यांना अधिकाधिक वेळ मिळू लागला. त्यांच्या लैगिंक जीवनात बरीच सुधारणा झाली आहे. याऊलट काही घरातील जोडपी २४ तास एकमेकांसमोर असल्यानं कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत आहे. टेंशन, डोक्यात सतत काहीतरी सुरू असतं याचा परिणाम शरीरसंबंधांवर झाल्यामुळे पार्टनरबाबत फारसं आकर्षण वाटत नाही.''
प्रायव्हसी मिळत नाही
कोरोनामुळे लैंगिक जीवनावर एकाचप्रकारे परिणाम झाला नसून अनेक गोष्टी यासाठी कारणीभूत ठरत आहेत. उदा. सध्या शाळा, महाविद्यालयं बंद असल्यानं आधीसारखी प्रायव्हसी मिळत नाहीये. म्हणजेच वेळ असूनही पार्टनरसोबत संबंध ठेवता येत नाहीत. यामुळे चिडचिड होत आहे. याशिवाय पती किंवा पत्नी कामाला जात असेल तर कोरोना संक्रमण घरी घेऊन तर येणार नाही ना.., जवळ कसं जायचं, योग्य ठरेल का? ही भिती सतावत असते.
काही जोडप्यांना, विभक्त कुटुंब पध्दतीत लैगिंक जीवनासाठी जास्त वेळ मिळतोय
तर दुसरीकडे वर्क फॉर्म होममुळे जोडप्यांना जास्तीत जास्त चांगला वेळ घालवता येतोय. अनेक कुटुंबात दोघेजण असल्यामुळे घरात कोणाचाही डिस्टर्बन्स होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आधी नोकरीसाठी बाहेर असल्यानं एकमेंकाना वेळ देता येत नव्हता. थकवा जाणवणं, कंटाळवाणं वाटणं अशा समस्या येत होत्या. आता घरीच असल्यामुळे दुपारीसुद्धा पार्टनरला वेळ देता येतो.
परिणामी लैगिंक जीवन आधीपेक्षा चांगलं झाल्याचा अनुभव अनेकांना आला. अनेक घरांमध्ये आता बाळासाठी प्लॅनिंग केलं जात आहे. लॉकडाऊनमुळे जीवनशैलीत बदल झाला. लोकांना व्यायामासाठी भरपूर वेळ मिळतोय, बाहेरचं खाणं पूर्णपणे बंद झालंय. घरचं खाल्यामुळे वजनावर नियंत्रण मिळवलंय त्यामुळे लैगिंक जीवनात सुधारणा झाल्याचंही निदर्शनास आलं आहे.
काही जोडप्यांचे बिनसले आहे, भांडणं-मतभेद वाढले
याऊलट पती पत्नी सतत घरात असल्यामुळे दोघांचीही चिडचिड होते, आकर्षण कमी झालं आहे. उदा. आधी कामावरून पती आल्यानंतर पत्नी व्यवस्थित नटून बसायची, आता नेहमीच गाऊनमध्ये असते. ड्रेसअप होत नाही, वॅक्सिंग करत नाही, हातापायावरचे केस वाढलेत, त्यामुळे आकर्षण कमी झालंय. पुरुषांकडून अशा प्रकारच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचं तज्ज्ञांना जाणवलं. याच परिस्थितीजन्य कारणांमुळे इरेक्टाइल डिसइंफेक्शनचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत लैगिंक जीवनावर नकारात्मक परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे.