सोमनाथ खताळ मासिक पाळीमध्ये होणारे ब्लिडिंग, पोटदुखी किंवा अन्य त्रास सहन करण्याची ताकद अनेकींमध्ये नसते. त्यामुळे मग काहीजणी गर्भाशय काढण्याचा हट्ट धरतात. परंतु थेट गर्भाशय काढणे घातक ठरू शकते. गर्भाशय काढून टाकणे, हे वाटते तेवढे सोपे नाही. शरीराचा हा एक भाग काढून टाकल्यास त्याचे बरेच दुष्परिणाम भोगावे लागतात. शिवाय कमी वयात गर्भाशय काढून टाकल्यामुळे sex life ही धोक्यात येऊ शकते, असे तज्ज्ञ सांगत आहेत.
गर्भाशय काढून टाकल्यानंतर शारीरिक संबंधातील रस कमी होतो. तसेच यामुळे आरोग्यावर इतरही कोणते परिणाम होऊ शकतात, याबाबतची संपूर्ण माहिती प्रत्येक महिलेने घ्यावी आणि त्यानंतरच गर्भाशय काढून टाकण्याचा निर्णय घ्यावा, असेही डॉक्टर सुचवतात.
काही कठीण आजारांमध्ये गर्भाशय काढून टाकणे, हा एकमेव उपाय असतो. अशा परिस्थितीत जर गर्भाशय काढण्याचा निर्णय घेतला, तर तो योग्य आहे. पण बऱ्याचदा लहानसहान आजारातही महिलाच गर्भाशय काढावे म्हणून डॉक्टरांकडे हट्ट धरताना दिसून येतात. किंवा काही केसेसमध्ये डॉक्टरांनी जरी गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला दिला तरी एकदा सेकंड ओपिनियन घेण्याचा प्रयत्न प्रत्येक रूग्णाने करावा, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हे लक्षात घ्या गर्भाशयावरील प्रत्येक गाठ ही कॅन्सरची नसते. तसेच प्रत्येक गाठीसाठी गर्भाशय काढण्याचीही आवश्यकता नाही. गर्भाशयावर सूज आल्याने कॅन्सर होत नाही. त्यासाठी इतर औषधोपचार उपलब्ध आहेत. याशिवाय पाळीच्या दिवसात खूप ब्लिडिंग होणे, अंगावर पांढरे जाणे, पोटदुखी यासाठी वेगवेगळे औषधोपचार उपलब्ध आहेत. त्यासाठी प्रत्येकवेळी गर्भाशय काढण्याची गरज नाही.
गर्भाशय काढण्याचे दुष्परिणाम - हाडे ठिसूळ होतात. - मोठ्या प्रमाणात थकवा जाणवतो. - वजन वाढते. - अकाली वार्धक्य येण्याची शक्यता असते - नैराश्य येते - शारीरिकसंंबंधातील रस कमी होतो
तज्ज्ञ म्हणतात प्रत्येकवेळी गर्भाशय काढण्याची आवश्यकता नसते. औषधोपचारावरही आजार ठीक होतो. याच्या जनजागृतीसाठी प्रत्येक रुग्णालयात दर्शनी भागात जनजागृती करणारे फलकही लावलेले आहेत. नागरिकांनी मनातील गैरसमज दूर करावेत. गर्भाशय काढल्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात आहेत, हे समजून घ्यावे. -डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड