Join us   

गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया, किती सोपी? किती अवघड? कसा घ्यायचा निर्णय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2023 6:51 PM

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेचे प्रमाण वाढते आहे. त्या शस्त्रक्रियेविषयी नेमकी काय माहिती हवी..

ठळक मुद्दे आपल्या शरीरातील कोणताही अवयव व्याधीग्रस्त झाला असेल तर तो वेळेत काढून टाकणे श्रेयस्कर आणि सुरक्षित

- डॉ. शिल्पा चिटणीस जोशी

‘डॉक्टर, एक महिन्यापासून ब्लीडिंग होतंय. कालपासून अजूनच वाढलंय. पोटातही दुखतं सारखं.. थकून गेलीये हो मी!’

सतत रक्तस्रावाने पांढरा पडलेला चेहरा आणि पंचेचाळीस वर्षांतच थकलेलं शरीर घेऊन आलेल्या पेशंटच्या डोळ्यात पाणी होतं. मी पेशंटच्या नवऱ्याकडे बघून म्हटलं, ‘अहो, पण गेल्यावेळी आपलं याबद्दल बोलणं झालं होतं. यांना गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्याबद्दल काय विचार केलाय तुम्ही?’ पेशंटचा नवरा हताशपणे म्हणाला, ‘मॅडम, अजून दोन डॉक्टरांनीपण हेच सांगितलंय. आम्ही सगळे समजावून थकलो; पण ही ऑपरेशनसाठी तयारच होत नाहीये. हिच्या या सततच्या आजारपणाने मी आणि मुलंपण कंटाळून गेलो आहोत!’

प्रसंग २ ३७ वर्षांची पेशंट नवऱ्याबरोबर सर्व तयारीनिशी आलेली. ‘डॉक्टर, मला आता ही कटकट नकोय. काढून टाकायची आहे मला ही गर्भपिशवी. सारखं अंगावरून पांढरं जातंय.’ मी - ‘अग, तुला या ऑपरेशनची अजिबात गरज नाहीये. तुझं वय खूप कमी आहे आणि साध्या औषधोपचारांनी तुझा त्रास कमी होऊ शकतो. ऑपरेशनचा हट्ट बरा नाही.’

 

(Image : google)

मात्र, अशा सल्ल्यानंतर दुर्दैवाने या पेशंट्स कधीकधी दुसरीकडे जाऊन ऑपरेशन करून घेतात. यामध्ये खेड्यापाड्यातील स्त्रियांचे प्रमाण खूप जास्त आहे. विशेष करून ऊसतोड मजूर बायका पाळीच्या त्रासाने कामाचे दिवस खराब होऊ नयेत म्हणून काही कारण नसतानासुद्धा गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करून घेतात. यात त्यांना उत्तेजन देणारे त्यांचे कामावरचे मुकादम आणि दुर्दैवाने काही अनैतिक प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स सामील असतात. अतिशय कमी वयात होणाऱ्या या शस्त्रक्रिया थांबविण्यासाठी आता सरकारने पावले उचलली आहेत.

हा विरोधाभास हे आपल्या सध्याच्या समाजातल्या स्थितीबाबत निखळ सत्य आहे. गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया म्हणजे हिस्टरेक्टमी. बऱ्यापैकी वादात सापडलेली शस्त्रक्रिया आहे. याची खरोखरच आणि नितांत गरज असलेल्या स्त्रिया वर्षानुवर्षे दुखणं अंगावर काढतात आणि अजिबात गरज नसलेल्या स्त्रिया विशेष करून ग्रामीण भागात सर्रास ही शस्त्रक्रिया करून घेताना दिसतात.

शस्त्रक्रिया कधी अपरिहार्य ठरते?

१) गर्भाशयाला किंवा गर्भाशयाच्या मुखाला (cervix) झालेली किंवा होऊ शकणारी कॅन्सरची लागण. आपल्या देशात गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचं प्रमाण सर्वांत जास्त आहे. याबाबतची तपासणी खरंतर लैंगिक संबंध सुरू झाल्यापासून दरवर्षी स्त्रीने करून घेणे अपेक्षित आहे; मात्र, भारतातील स्त्रियांमध्ये आणि समाजामध्ये स्वतःच्या आरोग्याबद्दल कमालीची अनास्था असल्यामुळे ही तपासणी जवळ जवळ कधीच केली जात नाही. चाळिशीच्या आसपास स्त्रियांना अंगावरून पांढरे जाणे, खाज सुटणे, संबंधानंतर लाल जाणे असे त्रास सुरू झाल्यावरच त्या स्त्रीरोग तज्ज्ञांकडे येतात. अशा वेळी कॅन्सरच्या निदानासाठी HPV LBC यासारख्या अचूक तपासण्या करता येतात. या तपासण्यांमध्ये कॅन्सरचा धोका आढळल्यास ही शस्त्रक्रिया ताबडतोब करून घेण्याचा सल्ला दिला जातो. अशा वेळी चालढकल अजिबात न करता शस्त्रक्रिया करून घेणे हेच पेशंटच्या हिताचे असते. २) फायब्रॉइडच्या खूप मोठ्या बऱ्याच गाठी असतील तर. फायब्रॉईडच्या गाठी कॅन्सरच्या शक्यतो कधीच नसतात; पण त्या ५ सें.मी.च्या वर, संख्येने जास्त आणि गर्भाशयाच्या मध्यभागी असतील तर खूप त्रासाच्या ठरू शकतात. अशा केसेसमध्ये अनियमित आणि अतिरक्तस्राव दिसून येतो. बऱ्याचवेळा स्त्रियांनी हे दुखणे अंगावर काढल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण अक्षरशः निम्म्यावर येते आणि मग रक्त भरून लगेच ऑपरेशन करणे भाग पडते. ही वेळ येऊ नये यासाठी योग्य वैद्यकीय सल्ला घेणे हितकारक आहे. एखाददुसरी गाठ असेल तर फक्त गाठ काढून गर्भाशय तसेच ठेवता येऊ शकते; पण हे स्त्रीरोगतज्ज्ञच ठरवू शकतात.

(Image : google)

३) हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळेसुद्धा अनियमित अतिरक्तस्राव होऊ शकतो.

पेशंट तरुण असेल तर हॉर्मोन्सच्या गोळ्यांनी हा रक्तस्राव थांबवला जाऊ शकतो; पण पेशंटचे वय चाळीसच्या जवळ असल्यास हॉर्मोन्सच्या गोळ्या धोकादायक ठरू शकतात आणि मग काहीवेळा गर्भाशय काढण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो. अशावेळी आधी क्युरेटिंग करून बायोप्सी घेतली जाते आणि त्यावर निर्णय घेतला जातो. कॅन्सरची शक्यता आहे असे वाटल्यास शस्त्रक्रिया केली जाते.

४) ‘इंडोमेट्रिओसीस’ नावाच्या एक आजारामध्ये पेशंटला सतत पोटदुखी आणि कंबरदुखीचा त्रास असतो तसेच गर्भाशयाशेजारी असणाऱ्या अंडाशयाच्या वेगवेगळ्या आजारांसाठीसुद्धा ही शस्त्रक्रिया करावी लागू शकते.

५) कधीकधी योनीमार्ग आणि गर्भाशयाला आधार देणारे स्नायू आणि पेशी शिथिल झाल्यामुळे गर्भाशय खाली घसरते याला प्रोलॅप्स असे म्हणतात. अशावेळी लघवीची पिशवीसुद्धा गर्भाशयाबरोबर खाली येते. अशा केसेसमध्ये स्त्रियांना एकावेळी लघवी पूर्ण न होणे, लघवीचा जंतुसंसर्ग होऊ शकतो. बाळंतपणाच्या वेळी बाळाचे वजन खूप जास्त असणे, अवघड डिलिव्हरी अशा केसेसमध्ये हे प्रमाण जास्त आढळते. या स्त्रियांमध्ये योनीमार्गाद्वारे गर्भाशय काढण्याची आणि त्याच वेळी योनीमार्गाची जागा आवळून घेण्याची शस्त्रक्रिया केली जाते. याव्यतिरिक्तही गर्भाशय काढण्याची काही कारणे असू शकतात. प्रत्येक पेशंटच्या वैद्यकीय अहवालावर ते अवलंबून आहे.

ही शस्त्रक्रिया कोणत्या पद्धतीने करतात? माझ्यासाठी कोणती पद्धत योग्य ठरेल? 

- ही शस्त्रक्रिया मुख्यतः तीन पद्धतीने करता येते.

१) पोटावरून टाक्यांची शस्त्रक्रिया (abdominal hysterectomy) - या पद्धतीत ओटीपोटावर ९ ते १० सेंमीचा छेद घेऊन पारंपरिक पद्धतीने गर्भाशय काढले जाते. खूप मोठा फायब्रॉईड किंवा कॅन्सरची शक्यता असल्यास ही पद्धत जास्त सोयीची आहे. तसेच विशेष गुंतागुंतीची केस असेल तर ही पद्धत उत्तम.

२) योनीमार्गाद्वारे बिनटाक्याची शस्त्रक्रिया (vaginal hysterectomy) - या पद्धतीने शक्यतो प्रोलॅप्स असणाऱ्या स्त्रियांची शस्त्रक्रिया केली जाते. या स्त्रियांना योनीमार्गात काही प्रमाणात टाके पडतात. काहीवेळा प्रोलॅप्स नसतानाही योनीमार्गाद्वारे ही शस्त्रक्रिया करता येते.

३) दुर्बिणीद्वारे बिनटाक्याची शस्त्रक्रिया (laparoscopic hysterectomy) - ही सध्याची सर्वात प्रगत पद्धत आहे. या पद्धतीत पोटावर ४ अतिशय छोटे छेद देऊन त्यातून शस्त्रक्रियेची साधने पोटात घालून शस्त्रक्रिया केली जाते आणि गर्भाशय योनीमार्गातून बाहेर काढले जाते. ही पद्धत रुग्णांसाठी अतिशय सोयीस्कर आणि श्रेयस्कर आहे. विशेष करून मधुमेह असलेल्या, स्थूल असलेल्या स्त्रियांमध्ये टाके लगेच भरून येतात. त्या लगेच हालचाल, रोजची कामे सुरू करू शकतात. या पद्धतीत एकूणच रुग्णाची बरे होण्याची प्रक्रिया खूप वेगाने होते.

लक्षात ठेवा...

आपल्या शरीरातील कोणताही अवयव व्याधीग्रस्त झाला असेल तर तो वेळेत काढून टाकणे श्रेयस्कर आणि सुरक्षित असते तसेच काही सबळ कारण नसताना शस्त्रक्रिया केल्यास त्याचा त्रास होऊ शकतो. एवढं सरळ, साधं, सोपं गणित आहे खरंतर...

(लेखिका स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ज्ञ आहेत.)

shilpachitnisjoshi@gmail.com

टॅग्स : आरोग्यमहिला