- डॉ. गीता वडनप
थायरॉइड ही शरीरातील महत्त्वाची ग्रंथी आहे. ही ग्रंथी शरीरातील हार्मोन्सची पातळी नियंत्रित करते. थायरॉइड संबंधी जेव्हा आजार होतात तेव्हा थायरॉइड ग्रंथीतून स्त्रवणाऱ्या थायरॉइडचं प्रमाण कमी जास्त होऊन संपूर्ण शरीराचं संतुलन त्यामुळे बिघडू शकतं. थायरॉइड संबंधित आजार हे प्रामुख्याने अनुवांशिक असतो. आईला, मावशीला , आजीला जर थायरॉइड संबंधी आजार असेल तर तो नंतरच्या पिढीतही होऊ शकतो.
हायपोथायरॉडिझम आणि हायपरथायरॉडिझम हे थायरॉइडशी संबंधित दोन मुख्य प्रकार आहेत. थायरॉइड ग्रंथीमधून जे हार्मोन्स शरीरात स्त्रवतात ते म्हणजे टी ३ आणि टी ४ . आणि यांचं संतुलन टीएसएच अर्थात थायरॉइड स्टिम्यूलिटींग हार्मोन करते. आणि जेव्हा टी ३ आणि टी४ च्या मात्रेत बिघाड होतो म्हणजे त्यांची पातळी कमी किंवा जास्त होते तेव्हा त्यांना नियंत्रित् करणाऱ्या थायरॉइड स्टिम्यूलिटींग हार्मोनमधे बिघाड झालेला असतो. थायरॉइड संबंधित आजाराचं निदान करताना ही टीएसएच हार्मोन तपासलं जातं. हे टीएसएच हार्मोन वाढलेलं असेल तर मग टी ३ आणि टी४ कमी झालेलं असतं. यालाच हायपोथायरॉडिझम असं म्हणतात. आणि जेव्हा टीएसएच कमी असतं तेव्हा टी३ आणि टी४ चं प्रमाण जास्त झालेलं असतं. यालाच हायपरथायरॉडिझम असं म्हणतात.
थायरॉइडसंबधीच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या महिलांमधील ७० टक्के महिलांना काही कल्पनाच नसते की आपल्याला थायरॉइडसंबंधी व्याधी आहे. कारण यासंबंधित आजारामधे दिसून येणारी लक्षणं नसतातच. अचानक लक्षात येतं की वजन वाढतंय, थकवा येतोय, केस गळताय, त्वचा कोरडी झालीये. ही लक्षणं तीव्रतेनं जाणवतात तेव्हा महिला दवाखान्यात येतात. तेव्हा रक्ततपासणी केल्यावर थायरॉइड संबधीच्या आजाराचं निदान होतं. स्त्रियांमधे हायपोथायरॉडिझमचं प्रमाण जास्त आहे. हायपरथायरॉडिझमचं प्रमाण कमी आहे.
आयोडिन हे थायरॉइड ग्रंथीसाठी उपकारक समजलं जातं. आयोडिन हे मेंदूचं काम आणि शरीराचं एकूणच काम व्यवस्थित चालण्यासाठी आवश्यक असलेलं खनिज आहे . आयोडिनची कमतरता हे थायरॉइडसंबंधी आजार होण्याचं मुख्य कारण आहे. थायरॉइड ग्रंथीतून जे हार्मोन्स शरीरात स्त्रवतात त्यामुळे शरीराचं तापमान नियंत्रित राहातं. शरीरातील सर्व पेशी सक्रिय राहातात. आणि प्रजोत्पदानसाठीही जे हार्मोन्स आणि आवश्यक बाबी आहेत ते थायरॉइड नियंत्रित करतं.
वजन आणि थायरॉइड
वजन आणि थायरॉइडचा जवळचा संबंध आहे. हायपोथायरॉडिझम या आजारात वजन वाढतं. तर हायपरथायरॉडिझममधे वजन कमी होतं. कारण हायपोथायरॉडिझममधे टी ३ आणि टी४ हे हार्मोन्स कमी प्रमाणात निर्माण होतात. त्यांच काम हे प्रामुख्याने शरीरातील पेशींना सक्रिय करण्याचं आहे. थायरॉइडमुळे चयापचयाची क्रियाही नियंत्रित होत असते. पण टी३ आणि टी ४ हे हार्मोन्स कमी स्त्रवले तर पेशींचं काम मंदावतं आणि चयापचय क्रिया बिघडते. कमी होते. त्यामुळे आहाराद्वारे शरीरात गेलेल्या कॅलरीज जळत नाहीत. त्यामुळे चरबी साठून राहाते. आणि म्हणून वजन वाढतं. या प्रकारात अंगावर , चेहेऱ्यावर सूज दिसते. हायपरथायरॉडिझममधे टी ३ आणि टी ४ हे हार्मोंस वाढलेले असतात. यामुळे शरीरात चयापचयक्रियेद्वारे जेवढी ऊर्जा तयार झालेली असते त्यापेक्षा जास्त खर्च होते. त्याचाच परिणाम म्हणून वजन कमी होतं.
थायरॉइड आणि इतर समस्या
इस्ट्रोजन आणि थायरॉइड यांचा परस्परसंबंध असतो. इस्ट्रोजन हे वाढलेलं असतं तेव्हा थायरॉइड हार्मोन्स तेवढे शरीरातील पेशींना उपलब्ध होत नाहीत. थायरॉइड हार्मोंन्स हे आपल्या कवटीच्या जवळ असलेली पिच्यूटरी ग्रंथी नियंत्रित करत असते. थायरॉइड हार्मोन्स्मधे असमतोल झाला तर स्त्रियांच्या शरीरातील इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या दोन हार्मोन्समधेही असमतोल होतो. त्यामुळेही गर्भधारणा होण्यास अडचणी निर्माण होतात आणि परिणामस्वरुप स्त्रियांमधे पाळीसंबंधीच्या तक्रारी सूरु होतात. जसे मासिक पाळी येण्याआधी पोटात खूप दुखणं, मूड बदलणं ,जूलाब होणं, पाळी अनियमित होणं, रजोनिवृत्तीच्या काळात अती प्रमाणात रक्तस्त्राव होणं, गाठी पडणं, , थकवा येणं, पाय दुखणं , चिडचिड होणं,नैराश्य येणं हे परिणाम जाणवतात. हायपोथायरॉडिझम असलेल्या महिलांना अचानक थंडी वाजते किंवा अचानक दरदरुन घाम येतो. छातीत धडधड होते, अस्वस्थता वाढते असे त्रास होतात. हे त्रास असे असतात की ते स्रियांना दाखवता येत नाही. इतरांनाही दिसत नाही, जाणवत नाही. 'हे काय हिचं ?' असं म्हणून इतर दुर्लक्ष करतात आणि स्वत: स्त्रियासुध्दा जे त्रास जाणवतात त्याबाबतीत कानाडोळा करतात. आज जाऊ उद्या जाऊ दवाखान्यात म्हणतात. पण अगदीच वजन खूप वाढायला लागलं की त्या जाग्या होतात आणि दवाखान्यात येतात. त्यामुळे थायरॉइडसंबंधित आजाराचं निदान व्हायला वेळ लागतो.
थायरॉइडसंंबंधी आजार केव्हा होतात?
थायरॉइड संबधित व्याधी जन्मत:ही दिसून येतात. पण त्याचं प्रमाण फारच कमी म्हणजे चारशे बाळांमधे एक ?असं आहे. चाळीशीनंतर थायरॉइड संबधित व्याधी दिसून येतात. थायरॉइडच्या बाबतीत अनूवांशिकता मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे चौदा पंधरा वर्षाच्या मुलीलाही डॉक्टर घरात कोणाला थायरॉइडसंबंधी व्याधी आहे का ? असं विचारतात. आणि असली तर मग एक रुटीन तपासणी करुन तिला तर नाही ना हे बघितलं जातं. आणि असली तर वेळेवर औषधोपचार सुरु होतात. एकदा तपासणीत काही आढळलं नाहीतर त्यांना पुढे होणारच नाही ?असं नाही. तर घरात आई, मावशी , आजी यांना थायरॉइड असेल त्या मुलींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानं दर सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा तपासणी करुन घ्यावी. आणि ज्यांना थायरॉइडसंबंधी व्याधीचं निदान झालं आहे त्यांनी तर दर तीन महिन्यांनी ही तपासणी करावी. कारण त्यानुसारच गोळ्यांचे डोसेज ठरवले जातात. या आजारात जेवढी अनुवांशिकता कारणीभूत असते तितकीच जीवनशैलीही असते. शरीराला अजिबात व्यायाम नसणं, एकाच ठिकाणी खूप वेळ बसून काम करणं, चुकीची आहारशैली यामूळेही थायरॉइडसंबंधी व्याधी जडतात.
एकदा का थायरॉइडसंबंधी आजार झाला तर तो पुढे औषधोपचारांनी, जीवनशैली सुधारुन नियंत्रित ठेवता येतो. तो पूर्ण बरा होत नाही. नियमित औषधं घ्यावीच लागतात. पण आजारावर चांगलं नियंत्रण मात्र नक्कीच मिळवता येतं. ते नियंत्रण मिळवलं तर औषधांचे कमीत कमी डोसेज लागतात. पण थायरॉइडसंबधी व्याधीचं निदान होऊनही निष्काळजीपणा दाखवला तर मात्र हदयसंबधीचे आजार, गुंतागुंत निर्माण होते. वजन वाढल्यानं किडनीला , यकृताला धोका निर्माण होतो. पाळीच्या आणि रजोनिवृत्तीच्या काळात अति रक्तस्त्राव झाल्यानं शरीरात रक्त कमी होतं. अॅनिमिया होतो.
थायरॉइडसंबधी आजारात दुर्लक्ष करुन चालत नाही. आपल्या आरोग्याबाबत दक्ष राहाणं हीच भूमिका योग्य ठरेल.
(डॉ. गीता वडनप या स्त्री रोग चिकित्सक आहेत. )