ओटीपोटात गर्भाशय, अंडाशय, गर्भनलिका असतात. संसर्गजन्य रोगांमुळे प्रजनन क्षमतेवर थेट परिणाम होऊ शकतो. याच संसर्गाला ओटीपोटाचा दाह रोग म्हटलं जातं. शारीरिक संबंधांच्या वेळी योनीमार्गात संसर्ग होऊन मग तो ओटीपोटापर्यंत पसरतो. या आजाराची लक्षणं चटकन दिसत नाहीत. मूल व्हावं म्हणून प्रयत्न प्रदीर्घ काळ प्रयत्न सुरु असतील आणि दिवस जात नसतील आणि ओटीपोटात प्रचंड वेदनांना सुरुवात झाली की बऱ्याचदा या आजाराचं निदान होतं.
लक्षणं काय?
१) योनीमार्गातून अनियमित डिस्चार्ज किंवा स्त्राव. या स्रावाला घाण वास असतो.
२) थंडी वाजून किंवा न वाजता ताप येणं.
३) शारीरिक संबंध ठेवताना वेदना किंवा रक्तस्त्राव होणं.
४) पोटात आणि ओटीपोटात प्रचंड वेदना होणं
५) लघवी करताना वेदना होणं.
६) मासिक पाळी नसतानाही लघवी करताना रक्तस्त्राव होणं.
७) मल विसर्जनाला त्रास होणं
८) प्रचंड थकवा
ही लक्षणं आजार गंभीर स्वरूप घेईपर्यंत अनेकदा दिसत नाहीत.
मूत्रविसर्जन करताना वेदना होणं, संभोग करताना रक्तस्त्राव होणं, घाणेरडा वास येणारा स्त्राव योनीमार्गातून जाणं ही सगळी लैंगिक आजाराची लक्षणं आहेत. यातलं कुठलंही लक्षण दिसलं तर लगेच डॉक्टरांकडे जायला हवं. वेळीच निदान आणि उपचार गरजेचे असतात. जर लैंगिक संसर्गातून झालेल्या रोगांवर वेळीच उपचार सुरु झाले नाहीत तर त्यातून पुढे जाऊन ओटीपोटाचा दाह होऊ शकतो.
या आजारमागे क्लॅमिडीया आणि गॉनोरिया हे सूक्ष्म जंतू प्रामुख्यानं असतात.
हे सूक्ष्म जंतू बहुतेकवेळा संसर्ग झालेल्या व्यक्तीशी आलेल्या शारीरिक संबंधांमधून पसरतात.
संसर्ग होण्याची इतर काही कारणे
१) एकापेक्षा जास्त लैंगिक जोडीदार
२) लहान वयात लैंगिक संबंधांची सुरुवात.
३) जोडीदाराला एकापेक्षा जास्त लैंगिक जोडीदार असणं.
४) 25 वर्षाखालील स्त्रीचे अनेक लैंगिक जोडीदार असणाऱ्या पुरुषासोबत संबंध असणे.
डॉक्टरांकडे कधी जायला हवं?
या आजाराची लक्षणं लवकर दिसत नाहीत. आजारानं गंभीर रूप घेतल्यावरच लक्षात येतं. अर्थात तुम्हाला वर दिलेल्या लक्षणांपैकी काहीही आढळून आलं तर लगेच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली पाहिजे. कारण वेळीच डॉक्टरांकडे गेला नाहीत तर संसर्ग शरीरभर पसरण्याचा संभव असतो. काहीवेळा या आजारात मृत्यूचा धोकाही असतो.
अजून काही महत्वाची लक्षणं
१) चक्कर येणं
२) उलटी होणं
३) ओटीपोटात दुखणं
४) खूप ताप येणं
त्यामुळे या लक्षणांवर नजर ठेवा. जराही शंका आली तर डॉक्टरांकडे जा आणि डॉक्टर ज्या तपासण्या सांगतील त्या करून लगेच उपचार सुरु करा.
विशेष आभार: डॉ. माधुरी मेहेंदळे
(MBBS, DGO, FCPS, DNB )