Join us   

IVF ट्रिटमेंटनं उतारवयातही मूल होऊ शकते का? तज्ज्ञ सांगतात IVF संदर्भातले समज- गैरसमज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 2:10 PM

IVF Myths and Facts :IVF ही प्रक्रिया सोपी नाही मात्र योग्य सल्ला आणि उपचार यासाठी उत्तम तज्ज्ञांचीच मदत घ्यायला हवी.

इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन, अर्थात आयव्हीएफने जगभरातील लाखो जोडप्यांना स्वतःचे मूल होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत केली आहे. आज आयव्हीएफ जवळपास सगळ्यांना माहिती आहे, जगभरात त्याचा वापर केला जातो आणि असे असून देखील या उपचार पद्धतीबाबत अनेक गैरसमज देखील आहेत. मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे आयव्हीएफचे कन्सल्टन्ट डॉ. हितेशा रामनानी रोहिरा यांनी लोकमत सखीशी बोलताना आयव्हीएफबद्दलचे काही गैरसमज दूर करून फॅक्ट्स सांगितले आहेत. (What Is In-Vitro-Fertilization (IVF)? facts of IVF explain by experts)

1) गैरसमज: आयव्हीएफ कोणत्याही वयात करता येऊ शकते. 

सत्य: आपले वय जसजसे वाढत जाते तसतसे आपल्या शरीरातील प्रजनन यंत्रणेचे देखील वय वाढते. निरोगी भ्रूण निर्माण होण्यासाठी पुरेशा प्रमाणात अंडी निर्माण करण्याची क्षमता अधिक जास्त वयामध्ये महिलेच्या शरीरात उरलेली असेलच असे नाही. गर्भधारणा करण्याची क्षमता वयोमानापरत्वे कमी होत जाते, परिणामी, आयव्हीएफ यशस्वी होण्याचा दर देखील कमी होतो.

2) गैरसमज: आयव्हीएफमार्फतच्या सर्व प्रसूती सी सेक्शनने होतात. 

सत्य: आयव्हीएफमुळे होणारी गर्भधारणा ही नैसर्गिक गर्भधारणेपेक्षा वेगळी नसते. गर्भारपणात काही समस्या उद्भवल्यास सी सेक्शन करावे लागू शकते, अशा समस्या फक्त आयव्हीएफमध्येच होतात असे नाही तर सर्वसामान्य गर्भधारणेत देखील होऊ शकतात. उदाहरणार्थ, आयव्हीएफमार्फत गर्भधारणा करवून घेणाऱ्या महिलेचे वय जर जास्त असेल तर ती धोका टाळण्यासाठी योनिमार्गाद्वारे प्रसूतीच्या ऐवजी सिझेरियन प्रसूतीच्या पर्याय स्वीकारू शकते.

3) गैरसमज: आयव्हीएफचे अनेक साईड इफेक्ट्स असू शकतात

सत्य: इतर कोणत्याही प्रक्रियेमध्ये जसे असतात तसे काही साईड इफेक्ट्स आयव्हीएफमध्ये देखील असतात पण अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आता त्यांचा प्रभाव खूपच कमी असतो. पोटात सौम्य वेदना, बद्धकोष्ठता असे काही सर्वसामान्य साईड इफेक्ट्स आयव्हीएफमध्ये जाणवू शकतात, पण भरपूर पाणी पिऊन ते दूर करता येऊ शकतात. शरीरात हार्मोनल स्तर वाढल्याने स्तन मऊ पडू शकतात.

4) गैरसमज: आयव्हीएफमुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. 

सत्य: ओव्हरीयन टिश्यूमध्ये बदल घडवून आणणारे विविध पंक्चर्स तसेच अंडी उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक असलेल्या सेक्स हार्मोन्सचे स्तर वाढवण्यासाठी आयव्हीएफदरम्यान आवश्यक असलेल्या औषधांनीच हा गैरसमज दूर केला आहे. आयव्हीएफ उपचारांमुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो हे सिद्ध करणारा एकही शास्त्रोक्त पुरावा उपलब्ध नाही.

5) गैरसमज: आयव्हीएफ खूप खर्चिक आहे. 

सत्य: आधी आयव्हीएफचा खर्च खूप जास्त यायचा पण तंत्रज्ञानामध्ये होत असलेल्या विकासामुळे आणि आता आयव्हीएफ सर्वत्र वापरले जात असल्याने हा खर्च खूप कमी झाला आहे. सध्या भारतात आयव्हीएफ प्रक्रियेचा खर्च १ लाख ते २.५ लाख रुपयांदरम्यान येतो.

टॅग्स : प्रेग्नंसीमहिलास्त्रियांचे आरोग्य