पीसीओएस हा आजार नसून ही जीवनशैलीविषयक समस्या आहे. जीवनशैलीत म्हणजेच आहार-विहारात काही बदल केल्यास ही समस्या कमी होण्यास मदत होते. आहार हा आपल्या जीवनशैलीतील एकूणच अतिशय महत्त्वाचा घटक असतो. आपला आहार पुरेसा पोषक असेल तर आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. आरोग्यातील ८० टक्के समस्या या चुकीच्या आहाराने निर्माण झालेल्या असतात. जास्तीत जास्त नैसर्गिक गोष्टींचा आहारात समावेश करणे, ताजे, घरात केलेले अन्नपदार्थ खाणे उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असते. तळलेले, मसालेदार, गोड, मैद्याचे पदार्थ कमीत कमी खाणे आणि भाज्या, फळं, दूध सर्व डाळी, धान्ये, कडधान्ये या सगळ्या गोष्टी आहारात योग्य प्रमाणात असायला हव्यात. मुलींच्या वाढीच्या वयात त्यांना पोषण देणारा आहार मिळायला हवा. आहारतज्ज्ञ क्षितिजा गायकवाड यांनी याबद्दल काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत (Know Diet Tips for PCOS Problem).
पीसीओएस संघटनेने नुकतेच एका ऑनलाइन सेमिनारचे आयोजन केले होते. ज्यामध्ये पीसीओएस या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गौरा करंदीकर, त्वचारोगतज्ज्ञ डॉ. तेजा कुलकर्णी, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ऋचा सुळे-खोत, फिटनेसतज्ज्ञ यशश्री कलंत्री आणि आहारतज्ज्ञ क्षितिजा गायकवाड यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी आहारतज्ज्ञ क्षितीजा यांनीपीसीओएस असेल तर नेमकं डाएट काय असलं पाहिजे याविषयी तरुणी किंवा महिलांना काय सांगितले समजून घेऊया..
पीसीओएससाठी नेमकं असं डाएट नाही. पण हेल्दी आणि बॅलन्स डाएट असणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचे माईंडफूल इटींग महत्त्वाचे आहे. बरेचदा पीसीओएस झालेल्यांमध्ये वजन वाढते. हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी काही जणी कमी खातात. मात्र तसं न करता खाण्याचे योग्य विभाजन करणे महत्त्वाचे आहे. एकावेळी ठराविक आहार घेऊन आहारात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, व्हिटॅमिन्स, खनिजे, स्निग्ध पदार्थ यांचे प्रमाण योग्य असणे गरजेचे असते. फ्रिज किंवा ओव्हन केलेल्या गोष्टी जास्त खाऊ नयेत. खरंच भूक आहे की काहीतरी खाण्याची इच्छा झाली आहे हे लक्षात घ्यायला हवे. शरीरातील पाण्याची पातळी योग्य ठेवायला हवी. आर्टीफीशियल स्वीटनर असलेले पदार्थ शक्य तितके टाळायला हवेत. वेळच्या वेळी भूक आहे तितके खाल्ल्यास आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते असा सल्ला क्षितीजा यांनी दिला.