पीसीओएस किंवा पीसीओडी ही समस्या हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे निर्माण होते. मुली वयात येतात तसे त्यांच्या हार्मोन्समध्ये बदल होत असतात. हे जरी खरे असले तरी पीसीओएसमध्ये चेहऱ्यावर किंवा शरीरावर अनावश्यक ठिकाणी केसांची वाढ होणे, पाळी अनियमित होणे, चेहऱ्यावर खूप जास्त पिंपल्स येणे, वजन वाढ यांसारख्या समस्या निर्माण होतात. यावर वेळीच उपाय केले नाहीत तर या समस्या वाढत जाण्याची शक्यता असते. यावर उपाय करायचे म्हणजे नेमकं काय करायचं याविषयी आपल्या मनात बरेच गैरसमज असतात. हे गैरसमज वेळीच दूर केले आणि या समस्येवर उपाय केले तर त्याचा फायदा होतो अन्यथा ही समस्या दिवसेंदिवस वाढत जाते. फिटनेसतज्ज्ञ यशश्री कलंत्री यांनी पीसीओएससाठी व्यायामाचा काय रोल असतो याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत (Know How Exercise is Important for PCOS Problem).
पीसीओएस संघटनेने नुकतेच या विषयावर एका ऑनलाइन सेमिनारचे आयोजन केले होते. ज्यामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गौरा करंदीकर, त्वचारोगतज्ज्ञ डॉ. तेजा कुलकर्णी, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ऋचा सुळे-खोत, फिटनेसतज्ज्ञ यशश्री कलंत्री आणि आहारतज्ज्ञ क्षितिजा गायकवाड यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी पीसीओएसशी निगडीत सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करण्यात आला. व्यायाम हा प्रत्येक व्यक्तीसाठीच महत्त्वाचा असतो. पण पीसीओएससारख्या समस्यांसाठी तर दिवसातून किमान वेळ काढून आवर्जून व्यायाम करायलाच हवा. कारण औषधोपचार किंवा इतर सर्व प्रकारचे उपचार घेतले तरी व्यायामामुळे हे हॉर्मोन्स सुरळीत होण्यास जास्त चांगली मदत होते. मग आपल्या सहज हातात असणारी गोष्ट करणं जास्त सोपं नाही का?
यशश्री सांगतात, तरुण मुलींनी व्यायाम करावा असं आपल्याला वाटत असेल तर त्यांच्या आईवडीलांनी आधी व्यायाम करायला हवा. मुलांना जे दिसेल तेच मुलं आत्मसात करतात आणि फॉलोही करतात. त्यामुळे सगळ्यात आधी मोठ्यांनी व्यायामाला सुरुवात करायला हवी. व्यायाम केवळ आरोग्यासाठीच नाही तर विविध प्रकारचे ताण कमी करण्यासाठीही उपयुक्त असतो. व्यायामाला अगदीच वेळ नसेल तर किमान १५ मिनीटे चालणे गरजेचे आहे. सूर्यनमस्कार सगळ्यात उत्तम व्यायामप्रकार असून दिवसातून किमान १० मिनीटे काढून प्रत्येकाने सूर्यनमस्कार करायला हवेत. यामुळे हार्मोन्स बॅलन्स होईल, निराशा कमी होईल आणि वजनही नियंत्रणात येईल. आपण अनेकदा वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतो. पण वजनाच्या मशीनकडे पाहण्यापेक्षा स्वत:कडे पाहा. सतत नंबर पाहत राहीलो तर हाती निराशेशिवाय काहीच येणार नाही. त्यामुळे फिटनेससाठी नेमकं काय किती प्रमाणात करायला हवे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. लहान लहान गोल्स सेट करुन व्यायामाचे नियोजन केले तर त्याचा अतिशय चांगला फायदा होतो.