शारीरिक संबंध जगण्यातील अविभाज्य घटक आहे. एकूण सुदृढआरोग्यासाठी आनंदी लैगिक संबंध गरजेचे असतात. संभोगात अडचणी येत असतील तर त्या का आणि कशामुळे येतायेत हे शोधणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे बाळाचा विचार जर करत असाल तर ही गोष्ट अधिकच गांभीर्याने घ्यायला हवी.
संभोगात अडचणी येण्याची कारणं
१) संभोग कसा केला जातो याविषयी अज्ञान किंवा अर्धवट माहिती.
२) वयानुसार शरीरात होणारे बदल
३) नैराश्य
४) अस्वस्थता
५) ताणतणाव
६) जोडीदाराशी असलेल्या नात्यातले प्रश्न
७) हार्मोनल बदल
८) मधुमेह, अतिताण, हृदयविकार
९) इतर आजारांच्या औषोधोपचारांचे दुष्परिणाम
ज्यावेळी एखाद्या स्त्रीला संभोग करण्यात अडचणी येतात तेव्हा त्याला 'फिमेल सेक्शुअल डिसफंक्शन' म्हटलं जातं. डिसफंक्शन्स म्हणजे रोग किंवा आजार नाही. पण एखाद्या आजारपणामुळे डिसफंक्शन किंवा अकार्यक्षमता मात्र निर्माण होऊ शकते.
सेक्शुअल डिसफंक्शन काही काळासाठी किंवा दीर्घकाळासाठी टिकू शकतं. यात लैंगिक इच्छा कमी होणं, ऑर्गझम न येणं, संबंधांच्या वेळी वेदना होणं असे त्रास होऊ शकतात. शारीरिक संबंधांमध्ये सहजता नसल्यामुळे मग जोडीदाराशी असलेल्या नात्यातही ताण निर्माण होतो. ज्यामुळे मानसिक आणि भावनिक अस्वस्थता निर्माण होते.
स्त्रियांमधल्या लैंगिक आजारांचे प्रकार
१) सेक्शुअल पेन डिसऑर्डर: यात शारीरिक संबंध ठेवताना प्रचंड वेदना होतात.
२) ऑर्गझमीक डिसऑर्डर: यात ऑर्गझम येत नाही किंवा संभोगाच्या अत्युच्च पातळीपर्यंत पोचताच येत नाही.
३) सेक्शुअल अरायझल डिसऑर्डर: यात लैंगिक उत्तेजना मिळत नाही. जोडीदाराने प्रयत्न केला तरी त्याला थंड प्रतिसाद दिला जातो.
४) लो सेक्शुअल डिझायर : यात मुळातच लैंगिक इच्छा, गरज कमी असते. त्यामुळे पुढाकार घेतला जात नाही.
कधी ना कधी यातला एखादा प्रकार स्त्रिया अनुभवतात. बऱ्याच स्त्रियांना लैंगिक संबंधांची इच्छाच नसते. अशावेळी लैंगिक संबंध टाळण्यासाठी त्या ‘मूड नसल्याचं’ कारण पुढे करताना दिसतात. काही महिलांमध्ये लैंगिक इच्छा नसण्याची समस्या अनेक वर्ष असते. आणि याचं एक महत्वाचं कारण म्हणजे जोडीदाराशी असलेला विसंवाद.
लैंगिक प्रश्न सोडवता येतात. त्यावर उपचार करता येतात. पण बहुतेकदा हे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला जात नाही. डॉक्टरांकडे जाण्यापासून सुरुवात केली पाहिजे, डॉक्टर नक्की समस्या काय आहे ते शोधून योग्य उपचार करू शकतात.
लैंगिक संबंधाची इच्छा नसण्याची कारणे
१) टायरॉईड, मधुमेहासारख्या आजरामध्ये अनेकदा योनीमार्ग कोरडा पडतो. त्यामुळे शरीर संबंध ठेवताना वेदना होतात. हार्मोन्सच्या असंतुलनामुळे आधीच इच्छा कमी झालेली असते त्यात जर वेदना झाली तर लैंगिक संबंधांवर आणि त्यांच्या नियमितपणावर परिणाम होतो.
२) काही औषधांच्या दुष्परिणामांमुळे लैंगिक इच्छा कमी होते. योनिमार्गातली इन्फेक्शन्सचाही लैंगिक इच्छेवर परिणाम होतो.
३) व्यक्तीच्या लैंगिक जीवनात भावनांना विशेष महत्व असतं. ताण, अस्वस्थता, नैराश्य यांसारख्या आजारांचाही लैंगिक इच्छेवर परिणाम होतो.
४) सामाजिक, सांस्कृतिक समज-गैरसमज आणि धारणांचाही लैंगिक आयुष्यावर प्रभाव असतो. दोन व्यक्तींचे विचार यासंदर्भात निराळे असतील आणि आग्रही असतील तर त्याचा त्यांच्या लैंगिक जीवनावर नक्कीच परिणाम होतो.
समस्या सोडवण्याचे सोपे मार्ग
१) एकमेकांच्या आवडीनिवडी, इच्छा याविषयी स्पष्ट बोला.
२) संभोगाच्या वेळी ल्युब्रिकंट्सचा वापर करा.
३) रिलॅक्स राहा.
४) स्वतःच्या शरीरावर प्रेम करा आणि स्वत:बद्दल आत्मविश्वास बाळगा.
५) झटपट उरकण्यापेक्षा आनंददायी लैंगिक जीवनाचा स्वीकार करा.
जर तुम्हाला तुमच्या लैंगिक जीवनात समस्या आहेत असं वाटत असेल तर मदत घ्या. बऱ्याच वेळी समस्या गंभीर नसतात. पण वेळीच निदान आणि उपचार न झाल्यामुळे त्या गंभीर होऊ शकतात. सातत्याने शारीरिक संबंध ठेवताना अडचणी येत असतील तर लगेच डॉक्टरांकडे जा. मदत घ्या. डॉक्टरांना तुमची मेडिकल हिस्ट्री द्या. तुमची मानसिक आणि शारिरीक तपासणी झाल्यावर नक्की समस्या काय आहे याचे निदान डॉक्टर करतात आणि त्यानंतर योग्य ते उपचार दिले जातात.
विशेष आभार: डॉ. पराग पाटील
(M.D., DGO)