डॉ. कल्पना सांगळे
आज माधुरी आपल्या 5 दिवसाच्या बाळाला घेऊन आली होती. छान ३ किलोचे पूर्ण दिवस भरलेले बाळ होते ते . " मॅडम ,थोडा पिवळा दिसत आहे हो हा ! आजी म्हणाली की कावीळ झाली आहे लवकर घेऊन जा मॅडम कडे !, म्हणून आले मी ,पण त्याला ताप ,उलट्या ,किंवा दूध पिणे कमी झाले आहे असे अजिबात नाहीये ..उलट आता मला दूध ही छान येते आहे आणि तो पण प्यायला शिकला आहे, लघवी, संडास पण पिवळी करत आहे, तर बघा ना .." बाळाला तपासले तेव्हा त्याचे डोळे आणि पाठ पोट पिवळे दिसत होते,आज पाचवा दिवस होता त्याच्या जन्माचा. बाळाच्या जन्माचे रिपोर्ट्स आणि आईचे डिलिव्हरीचे रिपोर्ट्स पाहिले. आईचा रक्तगट ओ पॉजीटीव्ह होता आणि बाळाचा देखील ओ पॉजीटीव्ह होता . " माधुरी ..बाळ दिसतेय पिवळे पण ही कावीळ काळजी करण्यासारखी नाही , 80/85 टक्के नवजात अर्भकांमध्ये असा पिवळेपणा दिसतो . आपल्या शरिरातील जुन्या झालेल्या लाल रक्तपेशी आपल्याच शरीरात नष्ट केल्या जातात , त्यातून bilirubin नावाचे पिवळ्या रंगाचे घटक तयार होते , ते शरीराबाहेर टाकण्याचे काम लिव्हर करत असते ,बाळ पोटात असे पर्यंत हे काम आईचे शरीर करत असते , त्यामुळे जन्म झाल्या नंतर लगेच बाळ पिवळे दिसत नाही . बाळाचे लिव्हर पूर्ण क्षमतेने काम करत नसते ,त्यामुळे हे बिलिरुबिन रक्तात राहते, त्यामुळे बाळाच्या त्वचेला आणि डोळ्यांनी पिवळेपणा येत असतो .जन्मानंतर 4 ते 6 दिवसात हा जास्तीत जास्त दिसतो आणि त्यानंतर तो ओसरायला लागतो 8 ते 10 दिवसात तो पिवळेपणा बऱ्यापैकी जातो, कारण बाळाचे लिव्हर आता काम करायला लागलें असते!"
माधुरी :" मी काय काळजी घेऊ मॅडम ? म्हणजे हळद ,पपई असे पदार्थ टाळू का ? " मी :" अग मी आताच सांगितले ना ..ही कावीळ मोठ्यांच्या काविळीसारखी जंतू संसर्गाने झालेली नसते, त्यासाठी तुला काहीही खाणे बंद करायची आवश्यकता नाही ,उलट तू व्यवस्थित सर्व पोटभर खा आणि बाळाला अंगावर भरपूर पाजत जा , बाळ जितकी लघवी आणि संडास करेल , हे बिलिरुबिन त्यातून बाहेर टाकले जाईल. आणि हो ,ही कावीळ काही बाळामुळे घरातील इतरांना होत नाही .हे खुप नॉर्मल आहे आणि हे आपोआप बरे होणार आहे काळजी करू नको ! आता तुझे बाळ पूर्ण दिवसाचे, चांगल्या वजनाचे आहे आणि मी त्याला बघितले आहे त्यामुळे मी हे सांगू शकते , पण जर बाळ अपुऱ्या दिवसांचे ,अपुऱ्या वजनाचे , आई आणि बाळाचा रक्त गट जर आमच्या मेडिकल दृष्टीने incompatible ( न जुळणारा ) जसे आईचा रक्त गट negative आणि बाळाचा positive ,(RH incompatibility)किंवा आईचा रक्तगट O आणि बाळाचा A किंवा B किंवा AB (ABO incompatibility) किंवा काही जनुकीय आजार असल्यास ही कावीळ त्रासदायक ठरू शकते, हे बिलिरुबिन मेंदू मध्ये शिरून मेंदूला इजा पोहचवू शकते ,त्यामुळे कुठल्याही बाळाला पिवळेपणा दिसला तर त्वरित आपल्या बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा . ते बाळाला तपासून ठरवतात की ही कावीळ काळजी करण्यासारखी आहे की नाही ! पिवळ्या झालेल्या बाळाला घरी ठेवून बघत बसू नये ! एकदा का मेंदूमध्ये इजा झाली की त्याचे परिणाम त्याला आयुष्यभर भोगावे लागणार आहेत ! मी स्वतः अशी बाळं बघितली आहेत ज्यांच्या गळ्यात काविळीची माळ घालून घरचे ती बरी व्हायची वाट बघत बसले आणि मुलाचे आयुष्याचे नुकसान झाले ! तू खुप चांगले केलेस की लगेच घेऊन आलीस!" माधुरी समाधानी दिसत होती.
तिला म्हंटलं ही माहिती तुझ्या मैत्रिणीना पण सांग.
(लेखिका बालरोगतज्ज्ञ आहेत.)