भारतामध्ये महिलांना होणाऱ्या कॅन्सरच्या यादीत सर्व्हायकल आणि स्तनांच्या कॅन्सरनंतर तिसरा क्रमांक अंडाशयाच्या कॅन्सरचा आहे. (Ovarian cancer) जागतिक आरोग्य संघटनेकडील माहितीनुसार, भारतामध्ये दर १,००,००० महिलांमागे अंडाशयाच्या कॅन्सरच्या जवळपास ११.९ केसेस आढळून येतात. अंडाशयाच्या कॅन्सरच्या रुग्ण महिलांपैकी जवळपास ८५ ते ९०% जणींचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त असते आणि हा आजार ५५ ते ६५ वर्षे वयात सर्वात जास्त प्रमाणात होतो. भारतात दरवर्षी अंडाशयाच्या कॅन्सरच्या २३,००० ते २५,००० नवीन केसेस आढळून येतात. (Ovarian cancer symptoms treatment and precautions by health experts)
अंडाशयाच्या कर्करोगाची कोणतीही विशिष्ट लक्षणे दिसून येत नाहीत, त्यामुळे बहुतेक वेळा रुग्णांना अस्पष्ट गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ब्लोटिंग जाणवते. अपचन, ओटीपोटात दुखणे, भूक कमी होणे, बद्धकोष्ठता, ओटीपोटात जडपणा असेही काही त्रास होत राहतात. विशिष्ट लक्षणे दिसून न येणे आणि पोटदुखीसारख्या अस्पष्ट लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे या केसेसमध्ये बऱ्याचदा लवकर निदान केले जाऊ शकत नाही. म्हणूनच या आजाराला 'सायलेंट किलर' मानले जाते. याबाबत डॉ योगेश कुलकर्णी (सर्जिकल ऑन्कोलॉजी, हेड - गायनेकॉलॉजिक ऑन्कोलॉजी, रोबोटिक सर्जन, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई) यांनी अधिक माहिती दिली आहे.
अंडाशयाचा कॅन्सर रुग्णाच्या शरीरात किती प्रमाणात पसरला आहे त्यानुसार याची चार टप्प्यांमध्ये विभागणी करण्यात येते. ६५ ते ७०% केसेसमध्ये अंडाशयाचा कॅन्सर ऍडव्हान्स्ड म्हणजे तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात लक्षात येतो. तोपर्यंत आजार ओटीपोटाच्या बाहेर पसरलेला असतो आणि ट्युमर डिपॉझिट्स पोटाच्या पोकळीच्या बाहेर देखील आढळून येतात.
अंडाशयाच्या कॅन्सरचा धोका यामुळे उत्पन्न होतो
कुटुंबात आधी एखाद्या नातेवाईकाला हा कॅन्सर झालेला असणे: आई, बहीण, मुलगी अशा नातेवाईकांना जर आधी हा कॅन्सर झालेला असेल तर या आजाराचा धोका वाढतो. तसेच स्तन, गर्भाशय, मोठे आतडे किंवा मलाशयाचा कॅन्सर हे आजार जर कुटुंबातील महिलांना झालेले असतील तर हा कॅन्सर होण्याचा धोका अधिक जास्त असतो. एखाद्या कुटुंबात अनेक महिलांना अंडाशयाचा किंवा स्तनांचा कॅन्सर झालेला असेल तर हे फारच धोकादायक ठरू शकते.
रुग्ण व्यक्तीला एखादा दुसरा कॅन्सर झालेला असणे: स्तनांचा किंवा मलाशयाचा कॅन्सर जर झालेला असेल तर त्या महिलेला अंडाशयाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. वंध्यत्व: ज्या महिला कधीच गर्भवती झालेल्या नाहीत त्यांना याचा धोका सर्वात जास्त असतो. स्तनपान न करवणे: ज्या महिलांनी कधीच स्तनपान करवलेले नसते त्यांना हा कॅन्सर होण्याची शक्यता असते. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी दीर्घकाळपर्यंत जर करून घेतलेली असेल तर अंडाशयाचा कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो.
तपासणीचे महत्त्व
अंडाशयाच्या कॅन्सरच्या केसेसमध्ये तपासणीमुळे काय-काय होऊ शकते याचा आढावा आणि अभ्यास अनेक संशोधनांमधून करण्यात आला आहे. सर्व महिलांची तपासणी करावी अशा सूचना सध्या तरी करण्यात आलेल्या नाहीत. रुग्ण महिलेला स्वतःला किंवा कुटुंबात इतर कोणाला कॅन्सर झालेला असेल तर आणि अंडाशयाचा कॅन्सर होण्याची खूप जास्त शक्यता असेल तर ट्रान्सव्हजायनल अल्ट्रासाऊंड आणि सीए१२५ लेव्हल्ससह तपासणी केली जाते.
ऑपरेबिलिटीचे प्रमाण
अंडाशयाचा कॅन्सर हा एक सर्जिकल-पॅथॉलॉजिकली स्टेज्ड आजार आहे. अंडाशयाचा कॅन्सर झाला असल्याचा संशय किंवा निदान ज्यांच्या बाबतीत करण्यात आले आहे अशा सर्व महिलांनी तातडीने फुल- टाईम सर्व्हिस देणाऱ्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया करून घेणे आवश्यक आहे, अन्यथा आजार पुढचा टप्पा गाठू शकतो आणि मग शस्त्रक्रिया करणे अशक्य होऊन बसते. अशा परिस्थितीत, आधी केमोथेरपी देण्याबाबत विचार केला जाऊ शकतो. अंडाशयाच्या कॅन्सरच्या जवळपास ६० ते ७०% केसेसमध्ये आधी शस्त्रक्रिया केली जाऊ शकते.
उपचार आणि रुग्णाचा जीव वाचण्याचे प्रमाण
अंडाशयाचा कॅन्सर झालेल्या महिलेचा जीव वाचेल की नाही हे अनेक वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते.
कॅन्सर कोणत्या टप्प्यात पोहोचला आहे.
1) शस्त्रक्रियेमध्ये ट्युमर नीट काढला गेला आहे की नाही (सुरुवातीच्या टप्प्यात हे फार महत्त्वाचे असते कारण शस्त्रक्रियेच्या वेळी जर ट्युमरचा काही भाग सांडला तर ते हानिकारक ठरू शकते.)
2) अंडाशयाचा कॅन्सर जर पुढच्या टप्प्यात पोहोचलेला असेल तर शस्त्रक्रियेनंतर आजार किती प्रमाणात उरला आहे यावर त्या रुग्णाचा जीव वाचेल की नाही ते अवलंबून असते.
3) केमोथेरपीला दिला जाणारा प्रतिसाद.
4) रुग्ण महिलेचे एकंदरीत आरोग्य आणि वय
शस्त्रक्रियेनंतर केमोथेरपीची भूमिका
अंडाशयाच्या कॅन्सरवरील उपचारांमध्ये केमोथेरपी देखील तितकीच महत्त्वाची असते. जवळपास ८० ते ९०% रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर केमोथेरपीची आवश्यकता असते. केमोथेरपीबाबतचा निर्णय हिस्टोपॅथोलॉजीचा अंतिम रिपोर्ट पाहिल्यानंतर घेतला जाऊ शकतो. ज्यांच्या बाबतीत धोका खूप जास्त आहे अशा सर्व महिलांना शस्त्रक्रियेनंतर केमोथेरपीची गरज असते.
अंडाशयाच्या कॅन्सरबाबतचे गैरसमज आणि त्यामागील सत्य
गैरसमज १: ज्यांना अंडाशयाचा कॅन्सर झाला आहे अशा सर्व महिलांच्या कुटुंबामध्ये आधी कोणाला तरी हा आजार झालेला असतोच.
सत्य: अंडाशयाचा कॅन्सर झालेल्या एकूण रुग्णांपैकी फक्त ५ ते १०% जणींच्या बाबतीत अनुवंशिकता हे कारण असते. इतर सर्व केसेसमध्ये कुटुंबात आधी कोणाला कॅन्सर झालेला नसतो.
गैरसमज २: पॅप स्मियरने अंडाशयाचा कॅन्सर समजून येतो.
सत्य: ही टेस्ट सर्व्हायकल कॅन्सरसाठी केली जाते. अंडाशयाचा कॅन्सर पॅप स्मियरने समजून येत नाही.
गैरसमज ३: ज्यांची हिस्टरेक्टॉमी झालेली आहे अशा महिलांना अंडाशयाचा कॅन्सर होत नाही.
सत्य: हिस्टरेक्टॉमीमध्ये गर्भाशय आणि सर्व्हिक्स काढून टाकले जाते. काही केसेसमध्ये फॅलोपियन ट्यूब्स आणि ओव्हरीज देखील काढल्या जातात. जर एक किंवा दोन्ही ओव्हरीज तशाच ठेवल्या गेल्या तर अंडाशयाचा कॅन्सर होऊ शकतो. ओव्हरीज काढल्या गेलेल्या असल्या तरी देखील हा आजार होण्याची शक्यता खूप कमी प्रमाणात का होईना पण असते.
गैरसमज ४: सीए१२५ वाढलेले आहे याचा अर्थ अंडाशयाचा कॅन्सर आहे.
सत्य: कॅन्सर अँटीजेन १२५ (सीए १२५) हे काही कॅन्सर दर्शवणारे विशिष्ट चिन्ह नाही. अंडाशयाचा कॅन्सर आहे अथवा नाही याचे निदान करण्यासाठी हा एकमेव घटक विचारात घेऊन चालणार नाही. फायब्रॉईड, एन्डोमेट्रिओसिस, ट्युबरक्युलॉसिस, अंडाशयातील गाठी यासारख्या कॅन्सरव्यतिरिक्त इतर आजारांमध्ये देखील सीए१२५ चा स्तर वाढलेला असू शकतो.
त्याचप्रमाणे अंडाशयाच्या कॅन्सरच्या अनेक रुग्णांमध्ये सीए १२५ स्तर सर्वसामान्य आढळून येतो. त्यामुळे फक्त सीए१२५ स्तर पाहून कोणताही निर्णय घेतला जाऊ शकत नाही. सीए१२५पेक्षा देखील अल्ट्रासाउंड/एमआरआय/सीटी स्कॅन करून पोटाचे व पेल्वीसचे रेडिओलॉजिक इमेजिंग जास्त महत्त्वाचे असते.