सध्या मुली आणि महिलांमधे पीसीओडी अर्थात पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम ही समस्या वाढलेली आहे. नॅशनल इन्स्टियूट ऑफ हेल्स्थ अँंड रिसर्चच्या निष्कर्षानुसार आपल्या देशात जवळजवळ 10 टक्के महिला पीसीओडीच्या समस्येशी झगडत आहेत. तज्ज्ञ म्हणतात की धावपळीच्या जीवनशैलीमुळे ताण वाढतो आहे, रात्रीची जागरणं, धूम्रपान, मद्यपानासारखी व्यसनं या सवयींमुळे पीसीओडीची समस्या मुली आणि महिलांमधे वाढत आहे.
पीसीओडीमधे महिलांच्या शरीरात एंड्रोजन हे पुरुषी हार्मोन वाढतं त्याचा परिणाम महिलांच्या शरीरावर आणि प्रजननसंस्थेवर होतो. या समस्येत अंडाशयात द्रावाच्या गाठी तयार होआत. मासिक पाळीच्या संदर्भात महत्त्वाची असलेली ओव्हूलेशन ही प्रक्रियाही उशीरा घडून येते. परिणामस्वरुप मासिक पाळी अनियमित होते. शरीरावर केस वाढतात. तसेच चेहेर्यावर मुरुम पुटकुळ्या येतात, वजन वाढतं, महिलांमधे गर्भधारणेत अडचणी निर्माण होतात. एकूणच महिलांच्या आरोग्यावर पीसीओडीचा मोठा परिणाम होतो. या आजारावर औषधं, आहार आणि योग्य जीवनशैली हाच उपचार आहे. आणि जीवनशैलीतही व्यायामला महत्त्व आहे. तज्ज्ञ सांगतात की व्यायामातही फुलपाखरु आसन ,चक्की आसन आणि उष्ट्रासन य योगसाधनेतील तीन आसनांमुळे पीसीओडी आणि त्याच्याशी निगडित अनेक समस्यांवर चांगला परिणाम दिसून येतो. ही तीन आसनं नियमित करण्याचा फायदा होतो असं तज्ज्ञ सांगतात.
बटरफ्लाय अर्थात फुलपाखरु आसन
हे आसन करताना खाली बसावं. दोन्ही पाय समोर पसरुन बसावं. पाठीचा कणा ताठ ठेवावा. आता दोन्ही पाय दुमडून दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जोडावेत. हाताने दोन्ही पायाचे पंजे पकडावेत. टाचा शरीराच्या अगदी जवळ असाव्यात. श्वास घेत दोन्ही पाय सोबत फुलपाखराच्या पंखासारखे वर खाली हलवावेत. एका वेळेस 15 ते 20 वेळा पाय हलवावे. या आसनामुळे पीसीओडीच्या समस्येमुळे पाळी आल्यावर पोटात आणि कंबरेत ज्या वेदना होतात त्या कमी होतात. हे आसन महिलांनी रोज केल्यास प्रसूतीच्या वेळेस महिलांना कमी वेदना होतात. तसेच या आसनामुळे मनावरचा ताण हलका होतो. या आसनामुळे मांड्याचे स्नायू मजबूत होतात. ज्या महिला रजोनिवृत्तीच्या टप्प्यात असतात त्यांनाही या आसनामुळे फायदा होतो. हे आसन करताना पाय हलवण्याचा वेग जोरात नसावा.
चक्की आसन
हे आसन करताना खाली बसावं. दोन्ही पाय फाकवून बसावं. हात पकडावेत आणि ते खांद्याच्या रेषेत सरळ ठेवावेत. दीर्घ श्वास घेऊन शरीराचा वरचा भाग पुढे झुकवत पहिले डवीकडे न्यावा आणि श्वास सोडत उजवीकडे न्यावा. जातं फिरवतो त्याप्रमाणे कृती करावी. ही कृती दहा ते बारा वेळा करावी. हे आसन करताना शरीराच्या खालच्या भागावर ताण जाणवतो. शरीर डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे नेताना पाय स्थिर ठेवावेत. ते हलवू नये. या आसनानं पाठीचा कणा लवचिक होतो. पाठ आखडत नाही. पीसीओडीमधे झोप विस्कळीत होते. या आसनानं झोप चांगली लागते. तसेच ओटीपोटावरची चरबीही कमी होते. पोटाचे आणि हाताचे स्नायू मजबूत होतात. हे आसन करताना छाती आणि ओटीपोटावर आण येतो. या आसनामुळे कामातली एकाग्रताही वाढाते.
उष्ट्रासन
आधी जमिनीवर गुडघ्यांवर बसवं. गुडघे आणि पायात एक फुटाचं तरी अंतर ठेवावं. मग गुडघ्यावर उभं राहावं. श्वास घेत शरीर मागच्या बाजूस झुकवावं. डाव्या हातानं डावी टाच आणि उजव्या हातानं उजवी टाच पकडावी. शरीर 10 अंश मागच्य दिशेनं नेत डोकं खाली झुकवावं. मंद गतीनं श्वास सुरु ठेवावा. श्वास सोडत मूळ आसनात यावं. हे आसन पाचते सात वेळा करावं. हे आसन नियमित केल्यास ओटीपोटावरची चरबी कमी होते. पचनासंबंधीच्या समस्या दूर होतात, नजर सुधारते . पाळीच्या वेळेस होणार्या वेदना कमी होतत.