Lokmat Sakhi >Health >Gynaecology Disorder > डॉक्टर, बाळ नॉर्मल आहे ना? गरोदरपणात करायच्या टेस्ट्सचं टेंशन येतं तेव्हा..

डॉक्टर, बाळ नॉर्मल आहे ना? गरोदरपणात करायच्या टेस्ट्सचं टेंशन येतं तेव्हा..

तुम्हांला मतिमंद मूल होण्याची शक्यता ‘दोनशे छत्तीसात एक’ एवढी आहे; किंवा ‘पस्तीसात एक’ एवढी आहे; हे असलं काही आपल्या पचनी पडत नाही. कारण.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 03:30 PM2021-06-29T15:30:55+5:302021-06-29T15:33:09+5:30

तुम्हांला मतिमंद मूल होण्याची शक्यता ‘दोनशे छत्तीसात एक’ एवढी आहे; किंवा ‘पस्तीसात एक’ एवढी आहे; हे असलं काही आपल्या पचनी पडत नाही. कारण.. 

Pregnancy double marker, triple marker, quadruple test- risk & result, what it means | डॉक्टर, बाळ नॉर्मल आहे ना? गरोदरपणात करायच्या टेस्ट्सचं टेंशन येतं तेव्हा..

डॉक्टर, बाळ नॉर्मल आहे ना? गरोदरपणात करायच्या टेस्ट्सचं टेंशन येतं तेव्हा..

Highlightsडबल, ट्रिपल वा क्वाड्रूपल मार्करचा रिपोर्ट हा असा शक्याशक्यतेच्या भाषेत येतो.

डॉ. शंतनु अभ्यंकर

डबल मार्कर, ट्रिपल मार्कर, क्वाड्रूपल मार्कर तपासण्या करायच्या म्हंटलं की अर्धवट माहितीमुळे, रुग्ण अस्वस्थच जास्त होतात. पण ते करणं गरजेचं कारण..
डबल शब्द आपल्या अगदी परिचयाचा आहे. डबलडेक्कर, डबल फिल्टर, डबल मज्जा वगैरे.
ट्रिपलचा आणि आपला संबंधही अगदी बालपणापासून, म्हणजे ट्रिपल-पोलिओ मधल्या ट्रिपलपासून सुरू होतो. त्यामानाने क्वाड्रूपल हा लांबच्या चुलत्या इतका दूरस्थ. पण आजकाल दिवस राहिले रे राहिले, की या शब्दांशी संबंध येतो. कारण डबल मार्कर, ट्रिपल मार्कर, क्वाड्रूपल मार्कर अशा तपासण्या आता उपलब्ध आहेत.
नव्या पाहुण्याची चाहूल लागताच आनंदलहरींबरोबर एक चिंतेचा तरंगही उमटत असतो.
कोणी उघडपणे तसं म्हणत नाही; पण सारं काही सुखरूप पार पडेल ना?, बाळ-बाळंतीण निरोगी, सुखरूप असेल ना?, अशा शंका मन कुरतडत असतात. जगातील कोणतीच टेस्ट आणि कोणताच डॉक्टर बाळ-बाळंतीण संपूर्ण निरोगी आहेत आणि राहतील असं छातीठोकपणे सांगू शकत नाही. बाळ-बाळंतीण १०० टक्के सुखरूप आहेत का?, या प्रश्नाचं प्रामाणिक आणि सार्वकालिक उत्तर, ‘सांगता येत नाही’, हेच आहे. मात्र, बाळ अथवा बाळंतिणीला अवाजवी धोका आहे का?, ह्या प्रश्नाचं उत्तर काढता येतं. दरवेळी डॉक्टर तेच करत असतात.

या नव्या नव्या तपासण्यांमुळे ह्या उत्तरात अधिक नेमकेपणा आला आहे. डबल मार्कर, ट्रिपल मार्कर, क्वाड्रूपल मार्कर तपासण्या या अशा आश्वस्त करणाऱ्या तपासण्या आहेत. पण बरेचदा याबद्दल अर्धवट माहिती असल्यामुळे, आश्वस्त होण्याऐवजी रुग्ण अस्वस्थच जास्त होतात. म्हणून हा लेखनप्रपंच.
ह्या तपासण्या करण्याचा काही विशिष्ट कालावधी ठरलेला आहे. ११ ते १४ आठवडे अथवा १५ ते २१ आठवड्या दरम्यान ह्यातील विविध टेस्ट करता येतात. आधी अथवा नंतर नाही.
आईचे वय, वजन, उंची, आधीच्या अपत्यांची माहिती, सोनोग्राफीत दिसणाऱ्या काही खाणाखुणा आणि आईच्या रक्तातील काही घटकांचा एकत्रित विचार केला जातो. आईच्या रक्तातील दोन (PAPP-A, hCG); तीन (AFP, E3, hCG) किंवा चार (AFP, E3, hCG आणि Inhibin-A) घटक मोजले जातात. यावरूनच ह्या तपासण्यांना डबल, ट्रिपल, क्वाड्रूपल मार्कर असे नाव पडले आहे. यातून आई आणि बाळाबद्दल काही भविष्य वर्तविण्याचा प्रयत्न असतो. पण या साऱ्या घटकांतील नातेसंबंध इतका गुंतागुंतीचा आहे की हे सारे संगणकाच्या मदतीनेच शक्य आहे. यातून, आईचे बीपी वाढण्याची शक्यता, बाळाचे वजन कमी असण्याची शक्यता, बाळांत दोष असण्याची शक्यता वगैरे वर्तवली जाते. प्रत्यक्षात ह्या गोष्टी घडणार आहेत वा नाहीत असं नेमकं उत्तर मिळत नाही. उदाहरणार्थ, ‘बाळाच्या गुणसूत्रात दोष असू शकेल’, असं उत्तर आलं, तर तसा दोष खरोखरच आहे का, हे शोधायला बाळाच्या पेशी तपासाव्या लागतात. यासाठी बाळाभोवतीचे पाणी काढावे लागते (गर्भजलपरीक्षा, Amniocentesis) किंवा वारेचा तुकडा तपासायला घ्यावा लागतो (Chorionic Villus Sampling). म्हणजे हे कोलेस्टेरॉल तपासल्यासारखे आहे. कोलेस्टेरॉल वाढले म्हणजे लगेच काही तुम्हाला हार्ट अटॅक येत नाही, कदाचित कधीच येणार नाही, पण येण्याची शक्यता बरीच जास्त असते. या नवनव्या तपासण्या शक्याशक्यतेच्या भाषेत बोलतात. ही भाषा सामान्यतः अपरिचित आणि वैतागवाणी असते.

आपल्याला एक वाईट खोड असते. आपण डॉक्टरकडे जायचं, डॉक्टर आपल्याला तपासणार आणि सांगणार, तुम्हाला बीपी आहे अथवा नाही; तुम्हाला शुगर आहे वा नाही. ह्या असल्या उत्तरांची आपल्याला सवय.
तुम्हांला मतिमंद मूल होण्याची शक्यता ‘दोनशे छत्तीसात एक’ एवढी आहे; किंवा ‘पस्तीसात एक’ एवढी आहे; हे
असलं काही आपल्या पचनी पडत नाही. डबल, ट्रिपल वा क्वाड्रूपल मार्करचा रिपोर्ट हा असा शक्याशक्यतेच्या भाषेत येतो. असला ‘नरो वा कुंजरो वा’ रिपोर्ट पुढे नर का कुंजर हे ठरल्याशिवाय काय कामाचा?
हे कसं
ठरवायचं ते पाहूया येत्या मंगळवारी.

(लेखक स्त्री आरोग्य तज्ज्ञ आहेत.)
faktbaykanbaddal@gmail.com

 

Web Title: Pregnancy double marker, triple marker, quadruple test- risk & result, what it means

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.