Join us   

आईचं बीपी वाढत असेल तर बाळ ‘पोटात’ सुरक्षित का ‘पेटीत’ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 1:48 PM

आईचे ब्लडप्रेशर वाढलेले असेल, तर बाळ पोटात बाळगणे सुरक्षित आहे का? - हा प्रश्न महत्त्वाचा होतो.   ​​​​​​​

ठळक मुद्दे बाळंतवात’ : उत्तरार्ध

डॉ. शंतनू अभ्यंकर

बाळंतवात नामक एका अगम्य आजाराला मी गरोदर बाईच्या पोटातला कम्युनिस्ट रशिया का म्हणतो, हे गेल्या अंकातल्या पहिल्या लेखातच मी सांगितले. गरोदरावस्थेत आईचे ब्लडप्रेशर का वाढते हे नेमके माहीत नाही. असे म्हणतात की बाळाकडून आईकडे काही द्रव्ये जातात आणि परिणामी आईला हा त्रास जडतो. ब्लडप्रेशर वाढल्याचा परिणाम आईच्या प्रत्येक अवयवावर होतो. किडनीवर परिणाम झाला की प्रथिनपात होऊ लागतो. याने आईला अशक्तपणा, सूज वगैर मालिका सुरू होते. कधी किडनी बंद पडते. मग डायलिसीसला पर्याय उरत नाही. मेंदूच्या रक्तपुरवठ्यात गोच्या होतात. परिणामी झटके येतात किंवा दृष्टी जाते किंवा दोन्ही होते. कधी लिव्हर नीट काम करीत नाही. मग तिथली विषारी रसायने साठून राहतात. कावीळ होतो. रक्त साकळणे हे लिव्हरवरही अवलंबून असते. मग ती क्रिया मंदावते. कल्पना करा, जर रक्तच साकळले नाही तर प्रसूतीनंतर किती रक्तस्राव होईल? जाईल न ती बाई! नव्हे आजार तीव्र असेल तर जातेच! उत्तम काळजी घेऊनही जाते! नेमका कोणाला, केव्हा, कितव्या महिन्यात त्रास सुरू होईल, हे सांगता येत नाही. ब्लडप्रेशर कोणत्याही महिन्यात वाढू शकतो. झटके कोणत्याही महिन्यात येऊ शकतात. ब्लडप्रेशर कधी वाढेल हे सांगता येत नाही, कुणाचे वाढेल हे सांगता येत नाही, किती वाढेल हे सांगता येत नाही.

सांगता फक्त एकच गोष्ट येते, जर ब्लडप्रेशर वाढले तर प्रसूती हाच उपाय आहे. महिना कुठलाही असो, प्रसूती होताच ब्लडप्रेशर कंट्रोल होते. विश्रांती, अळणी अन्न, प्रथिनयुक्त आहार वगैरेंचा उपयोग एकच, आपण काहीतरी करतोय हे कृतक समाधान. प्रत्यक्षात परिणाम शून्य! तेव्हा ‘विश्रांती घ्या’, या सल्ल्याचे पालन तारतम्याने करावे. उगाच गोठ्यात म्हैस बांधल्यासारखे पेशंटला कॉटला बांधून ठेवू नये! गोळ्या-औषधांचासुद्धा फारसा उपयोग होत नाही. मग डॉक्टर एवढ्या भारंभार गोळ्या का देतात?

- डिलिव्हरी होईपर्यंत ब्लडप्रेशर तात्पुरते, पण तात्काळ कमी करण्यासाठी देतात. दिवस भरले नसतील तर प्रसूती थोडी पुढे ढकलता यावी म्हणून देतात. अशावेळी बाळाच्या फुफ्फुसांची वाढ लवकर व्हावी म्हणून काही इंजेक्शने दिली जातात, यांचा परिणाम होईपर्यंत ब्लडप्रेशर ताळ्यावर राहावे म्हणून देतात. गोळ्यांचा उपयोग मर्यादित आहे हे जाणूनच देतात. झटके येऊ नयेत म्हणूनही इंजेक्शने असतात. यादरम्यान डॉक्टर पेशंट आणि बाळावर सक्त नजर ठेवून असतात. प्रत्येक वेळी डॉक्टर स्वतःलाच दोन प्रश्न विचारतात. सध्या बाळ पोटात सुरक्षित आहे का? पेटीत? (पेटीत म्हणजे इन्क्युबेटरमध्ये) आणि बाळ पोटात बाळगणे आईसाठी सुरक्षित आहे का, पोटात का, पेटीत? या प्रश्नाचे उत्तर ‘पेटीत’ असं येईल. त्यादिवशी सरळ प्रसूती करण्याच्या मागे लागतात. तो दिवस कधी उगवेल हे सांगता येत नाही. कधीकधी तर परिस्थिती इतकी अस्थिर असते की हा प्रश्न रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ विचारला जातो आणि त्यानुसार उपचार ठरविले जातात. एकदा प्रसूती करायची असे ठरले की कळांची औषधे देऊन प्रयत्न करायचा का, थेट सीझर हेही ठरविले जाते. शिवाय पोटात का, पेटीत या प्रश्नाचे उत्तर निव्वळ वैद्यकीय नाही. दिवस कमी, म्हणजे किती कमी, बाळ अशक्त, म्हणजे किती अशक्त? अशक्त, गुदमरलेल्या बाळाची काळजी घेणारी खास एनआयसीयू जवळ आहे का? असल्यास अशा ठिकाणी बाळाला ठेवायची तयारी आहे का, कुटुंबियांची हा सगळा खर्च करायची क्षमता आणि तयारी आहे का, थोडक्यात प्रश्न वित्तीय तर आहेच; पण प्रश्न वृत्तीचाही आहे. या दोन्ही गोष्टी कुटुंबागणिक भिन्न असतात. हा निर्णय कुटुंबीयांनी घ्यायचा आहे. डॉक्टरांनी नाही!! आता रंगीत सोनोग्राफीच्या मदतीने बाळाकडे जाणारा रक्तप्रवाह मोजता येतो. पुढे तो कमी होणार आहे हे भाकीतही आता वर्तविता येते. शिवाय आईचे रक्त तपासून काही ठोकताळे बांधता येतात; परंतु मन्सूनच्या अंदाजाइतकाच हाही अंदाज बेभरवशाचा आहे. पुढे बीपी वाढणार असा काही सुगावा लागला तर ॲस्पिरीनची अल्प मात्रेतली गोळी देतात. हिपॅरीनची इंजेक्शन देतात. आधीच्या खेपेला बीपी वाढलेल्या बाया, मुळातच आधी बीपी जास्त असणाऱ्या बाया, काही ऑटोइम्यून आजार असलेल्या बाया (SLE), वयस्कर, जाड्या, जुळी/तिळी वगैरे असणाऱ्या बाया, अशा सगळ्या अतिजोखीमवाल्या! यांच्यात बाळंतवाताची बाधा अधिक. औषधांमुळे बीपी वाढणे पूर्णतः टळत नाही; पण निदान त्याची तीव्रता कमी राहते. वाढायचेच झाले तर थोडे उशिरा बीपी वाढतो. दरम्यान, बाळ आणखी थोडे मोठे झालेले असते. प्रसूतीनंतर ब्लडप्रेशर आटोक्यात येते. सहा आठवड्यांच्या वर जर ते वाढलेलेच राहिले, तर पुढील तपासण्या कराव्या लागतात. तीव्र बाळंतवात झाला असेल तर सुमारे ४० टक्के बायकांना पुढच्या खेपेला पुन्हा हा त्रास जडू शकतो. तर असा हा बाळंतवात. सगळ्यांनाच वात आणणारा आजार आहे. ज्या दिवशी हे रहस्याच्या पोटात दडलेले, गुढात लपेटलेले, कोडे उलगडेल तो दिवस आरोग्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल, हे निश्चित.

( लेखक स्त्री आरोग्य तज्ज्ञ आहेत.)

shantanusabhyankar@hotmail.com

 

 

 

टॅग्स : आरोग्यप्रेग्नंसीगर्भवती महिला