डॉ. शंतनु अभ्यंकर
कमी दिवसाच्या कळा यायला लागल्या तर अनेक औषधे वापरली जातात आणि होणारी प्रसूती किंवा किमान त्यापासून होणारे धोके टाळण्याचा किंवा कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. बरेचदा कमी दिवसाची प्रसूती तऱ्हेतऱ्हेच्या इन्फेक्शनमुळे होत असल्याने अँटिबायोटिक्स वापरली जातात. पाणमोट जर फुटली असेल तर ज्या क्षणापासून पाणी बाहेर पडायला लागते तेव्हापासून बाहेरचे जंतूदेखील आत शिरकाव करायला लागतात. त्यामुळे इथेही अँटिबायोटिक्सचा उपयोग होतो. गर्भपिशवीच्या कळा कमी करतील अथवा थांबवतील अशी औषधेसुद्धा उपलब्ध आहेत. यामुळे कळा पूर्णपणे थांबून अकाली प्रसूती पूर्णतः जरी टळत नसली, तरी आजचा जन्म उद्यावर ढकलण्याचा फायदा होतोच होतो. असे केल्याने बाळाची वाढ होण्यासाठी जी इंजेक्शने दिली जातात (Steroids), त्यांचा प्रभाव सुरू व्हायला वेळ मिळतो. मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम चॅनेल ब्लॉकर्स, प्रोजेस्टेरॉन अशा प्रकारची औषधे कळा थांबविण्यासाठी वापरली जातात. पूर्वी चक्क दारूची इंजेक्शनेसुद्धा दिली जायची! पण, कसे कुणास ठाऊक, यांचा पेशंटवर इफेक्ट यथातथाच व्हायचा नाही; पण आरोग्य कर्मचाऱ्यांवर मात्र इफेक्ट्स तत्काळ दिसून यायचे! आता बंदच आहे तो प्रकार.
ऑक्सिटोसिन हे कळा आणणारे संप्रेरक. थेट याविरुद्ध काम करणारे औषध (ॲटोसीबॅन) आता दाखल झाले आहे. पण, त्याचीही कामगिरी फारशी चमकदार नाही. पिशवीला टाका घालणे हा एक डॉक्टरप्रिय उपचार आहे. पुन्हा एकदा शास्त्रीय निकषानुसार या उपचारालाही काही मर्यादा आहेत. संपूर्ण विश्रांती हा लोकप्रिय उपाय आहे. पण दुःखद बातमी अशी की, याचाही फारसा परिणाम होत नाही, असे अभ्यास सांगतात.
थोडक्यात अकाल प्रसूतीचे भाकीत वर्तवणे, सध्यातरी शक्य नाही आणि अशी प्रसूती होणारच नाही, अशा गोळ्या, औषधे, लसी, इंजेक्शने, ऑपरेशनेही उपलब्ध नाहीत. कमी दिवसाची होऊ नये या नावाखाली जे जे केले जाते, ते ते मदत आणि सदिच्छा-स्वरूप असते म्हणा ना.
अर्थात अकाल प्रसव टाळता येत नसेल; पण त्यापासून बाळाला उद्भवणारा त्रास मात्र बराचसा टाळता येतो. अत्यंत कमी दिवसाच्या आणि कमी वजनाच्या बाळांची काळजी घेण्याचे तंत्र (Technology) आणि मंत्र (Protocols) आता विलक्षण प्रगत झालेले आहेत.
बाळाला मुख्य त्रास होतो तो म्हणजे नीट श्वास घेता येत नाही. बाळ पोटात असते, त्या वेळेला पाण्यात तरंगत असताना त्याच्या फुप्फुसांना काही काम नसते. त्याला लागणारा ऑक्सिजन आईच्या रक्तातून नाळेद्वारे त्याच्यापर्यंत पोहोचविला जात असतो. एकदा या जलसमाधीतून ते बाहेर पडले की फुप्फुसाला काम करावेच लागते. आत हवा घेणे, ऑक्सिजन घेणे आणि कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर टाकणे हे तत्क्षणी सुरू व्हावे लागते. पहिल्या श्वासाबरोबर हवेने फुलतात फुप्फुसे.
म्हणजे अनरशाच्या पिठाचा गोळा चांगला घट्ट असतो. पण, अनरशाला छान जाळी पडते. फुलून येतो अनरसा. तशी फुप्फुसे फुलून येतात. पण, अनरसा फुलला की तसाच राहतो. पुन्हा त्याचा पिठाचा गोळा बनत नाही. पण, अकाली जन्मलेल्या बाळांत, उच्छवासाबरोबर फुप्फुसाचा पुन्हा गोळा होऊ शकतो. तसा तो होऊ नये म्हणून काही विशिष्ट रसायनं तिथे असावी लागतात. यांना म्हणतात सरफॅक्टंट. कमी दिवसाच्या बाळांमध्ये ही सरफॅक्टंट नसतात किंवा पुरेशी नसतात. त्यामुळे बाळाला श्वास घ्यायला अडचणी येतात. सरफॅक्टंट तातडीने तयार व्हावे, म्हणून कमी दिवसाच्या प्रसूतीची शक्यता दिसताच, आईला काही इंजेक्शने (Steroids) दिली जातात. यामुळे नऊ महिने भरल्यावर तयार होणारे सरफॅक्टंट दोन-चार दिवसांत तयार होते. आता झाली जरी कमी दिवसाची प्रसूती, तरी बाळाला सहज श्वास घेता येतो. इतकेच काय अशा उपचारांमुळे मेंदूतील पोकळीत होणारा रक्तस्राव आणि आतड्याच्या अंतःत्वचेचा शोथ आणि झड अशा इतर दोन जीवघेण्या आजारांपासून बाळाचे रक्षण होते. बाळाच्या मेंदूतील पोकळीत होणारा रक्तस्राव होऊ नये म्हणून मॅग्नेशियम सल्फेटही उपयुक्त ठरते हे तेच जे कळा थांबविण्यासाठी वापरले जाते.
बाळाचे अवयव भरभर पिकावेत म्हणून असे बहुविध उपचार आता केले जातात. कमी दिवसांची बरीच बच्ची आता कच्ची राहत नाहीत. चांगली धडधाकट होतात, दंगा करतात. “हे पिल्लू कमी दिवसांचं होतं बरंका,” असं सांगूनही खरं वाटणार नाही इतकी मस्ती करतात!!
(लेखक स्त्री आरोग्य तज्ज्ञ आहेत.)
faktbaykanbaddal@gmail.com