Join us

Urine Leakage While Coughing : जोरात खोकला किंवा शिंक आली तर नकळत लघवी होऊन जाते? हा आजार कशानं होतो? उपाय काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 15:34 IST

Urine Leakage While Coughing : खूप जोरात खोकला किंवा शिंका आल्यावर किंवा मोठ्यानं हसल्यानंतर अनेक महिलांना नकळत लघवी होते.

पावसाळ्याच्या दिवसात सर्दी, खोकला होणं फारच कॉमन आहे. पण याला जोडून उद्भवणारे इतर आजार खूपच त्रासदायक ठरतात. काहींना सतत शिंका येतात, डोळे चुरचुरतात तर किंवा खोकला होतो आणि तो तर बरेच दिवस बराच होत नाही. खूप जोरात खोकला किंवा शिंका आल्यावर किंवा मोठ्यानं हसल्यानंतर अनेक महिलांना नकळत लघवी होते. (Urine Leakage While Coughing) आतले कपडे अचानक ओले झाल्यानं चारचौघात खूप अवघडल्यासारखं वाटतं. (How do I stop my pee from leaking when I sneeze)

दुर्गंधी आल्यास सतत कपडे बदलावे लागतात. शिंकलो-खोकलो की लघवी होईल अशी काळजीही वाटते. त्यानं आत्मविश्वासही कमी होतो आणि सतत ओले कपडे राहिल्यानं युरिन इन्फेक्शनचाही धोका वाढतो. जगभरात 3२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक चार महिलांपैकी एका महिलेला असा त्रास होतो असं आकडेवारी सांगते. त्यामुळे आपल्यालाच हा आजार का, असं का होतं म्हणून स्वत:ला दोष देण्यात अर्थ नाही. (Urine Leakage While Coughing)

खोकताना किंवा शिंकताना नकळत लघवी का होते?

मूत्राशयाचे स्नायू कमकुवत होतात त्यामुळे लघवी रोखून धरली जात नाही. अशा परिस्थितीत महिलांना सार्वजनिक ठिकाणी समस्यांना सामोरे जावे लागते. जर थोड्याशा शारीरिक हालचालींंनंतरही थेंब थेंब लघवी अनेकींना होते. त्याला स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टीनेंस म्हणतात.(Stress Incontinence) याची मुख्य कारणे म्हणजे गर्भधारणा, प्रसूती आणि रजोनिवृत्ती. डॉ. रंजना धानू यांनी लोकमत सखीशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे.

१. बहुतेक महिलांना डिलिव्हरीदरम्यान दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत खोकल्यानंतर लघवी बाहेर येण्याचा त्रास उद्भवतो तर काहींना नॉर्मल डिलिव्हरीनंतर. ब्लॅडरमध्ये लघवी साचून युरेथ्राद्वारे बाहेर पडते. डिलिव्हरीमध्ये पेल्विक मसल्स लूज होतात. गर्भपिशवीचे लिगामेंट्स लूज झाल्यानं एखादी स्त्री खोकल्यानंतर तिला लघवी होण्याचा त्रास होतो.

२. माईल्ड, मोडरेट किंवा सिव्हिअर अशा ३ स्थितीत हा त्रास होतो. पहिल्या प्रकारात खोकून थोड्या प्रमाणात लघवी आल्यानं आतले कपडे ओले होतात. मोडरेट लेव्हलमध्ये पॅडींगची आवश्यकता असते. तर सिव्हिअर स्टेजला पॅड किंवा डायपर लावूनही मोठ्या प्रमाणावर लघवी बाहेर येते. त्यामुळे महिला कपड्यांवर डाग लागण्याच्या भितीनं बाहेर जाणं टाळतात.

 उपाय काय? (Solutions for a Leaky Bladder)

 पेल्विक फ्लोअर व्यायामप्रकारांनी (PFMT) सुरूवातीच्या स्टेजमध्ये आराम मिळू शकतो. पण त्रास वाढत जात असतील डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार घ्यायला हवेत. वजन नियंत्रणात ठेवणं, साखरेची पातळी तपासत राहणं, एक- दीड तासानं लघवीला जाऊन येणं गरजेचं आहे. हा त्रास औषधांनी बरा होईलच असं नाही.

२. सध्या टिव्हीटी (TVT) या ट्रिटमेंटद्वारे लघवीच्या युरेथ्राच्या खाली एक टेप बसवली जाते. तो टेम हॅमॉकप्रमाणे सपोर्ट करते. हा टेप लाईफलॉन्ग एखाद्या स्त्रीचा त्रास टाळण्यासाठी उपयोगी ठरू शकतो. या ट्रिटमेंटनंतर ६ आठवडे शारीरिक संबंध ठेवता येत नाहीत. तात्पुरत्या उपायांसाठी बोटॉक्स इंजेक्शन्स दिले जातात. दर तीन ते सहा महिन्यांनी ही इंजेक्शन्स द्यावी लागतात. अर्थात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानेच असे उपाय करणं योग्य.

टॅग्स : महिलाहेल्थ टिप्सआरोग्य