विविध डाएट प्रोग्राम्सद्वारे, गोळ्या औषधं आणि शस्त्रक्रियांच्या मदतीनं वजन घटवणं सोपं झालं आहे. तितकंच सोपं वजन वाढवणंही. अनेक किलोंनी वजन वाढवणं, किंवा घटवणं याला वेट सायकलिंग असं म्हणतात. अनेकजण बारीक किंवा शेपमधे दिसण्यासाठी वेट सायकलिंगचा वापर करतात. वेट सायकलिंगचा वजनावर परिणाम दिसत असला तरी वेट सायकलिंग हे घातक असतं आणि विशेषत: महिलांसाठी हे एका अभ्यासाद्वारे सिध्द झालं आहे.वेट सायकलिंगचा सर्वात जास्त धोका महिलांना आहे असं हा अभ्यास म्हणतो. वेट सायकलिंगमुळे महिलांना झोपेसंबधित आजार होतात. हे आजार त्यांच्या हदय आणि मेंदूसाठी घातक असतात असं हा अभ्यास सांगतो.
जर्नल ऑफ कार्डिव्हॅसक्यूलर नर्सेस असोसिएशन या जर्नलमधे प्रकाशित झालेला हा अभ्यास वेट सायकलिंग आणि झोपेच्या संबंधित समस्या यांच्यात सहसंबंध असल्याचं सांगतो. वेट सायकलिंगमुळे सर्वात जास्त धोका महिलांना असल्याचं हा अभ्यास म्हणतो. वेट सायकलिंग केलेल्या महिलांमधे झोप नीट न लागणं, कमी वेळ झोप लागणं, झोपेत सतत व्यत्यय येणं, निद्रानाश, त्याचा परिणाम दिवसभराच्या चलनवलनावर होणं अशा झोपेसंबंधी वेगवेगळ्या समस्या निर्माण झालेया आढळल्या. हा अभ्यास अमेरिकेतल्या वेगवेगळ्या टप्प्यातल्या आणि भिन्न वंशाच्या महिलांमधे केला गेला. हे संशोधन कोलंबिया विद्यापिठातील अभ्यासकांनी केला आहे.
‘गो रेड फॉर वूमन’ या प्रकल्पांतर्गत सरासरी ३७ वयाच्या ५०६ महिलांच्या माहितीचं विश्लेषण करुन वेट सायकलिंग आणि महिलांमधील झोपेशी संबंधित समस्या यांचा सहसंबंध शोधला गेला. या संशोधनात सहभागी महिला या प्रौढावस्थेतील प्रत्येक टप्प्याचं प्रतिनिधित्त्व करणाऱ्या होत्या. त्यात बाळंतपण झालेल्या, मेनोपॉजच्या सुरुवातीच्या, मेनोपॉज सुरु असलेल्या आणि मेनोपॉज झालेल्या महिला होत्या. एकूण सहभागी महिलांपैकी ७२ टक्के महिला एकदा किंवा अनेकदा वेट सायकलिंग केलेल्या होत्या. या महिलांनी बाळंतपण वगळून एकदा किंवा अनेकदा १० पौंड वजन कमी किंवा वाढवलं होतं. वेट सायकलिंगची हिस्ट्री असलेल्या या महिलांमधे निरनिराळ्या झोपेच्या समस्या आढळून आल्यात. संशोधनाच्या प्रवेशाच्या टप्प्यात आणि पुढे वर्षभर अभ्यासादरम्यान या महिलांमधे वेट सायकलिंगमुळे झोपेच्या समस्या आढळून आल्यात.
वेट सायकलिंग किती वेळा केलं गेलं यावरही झोपेशी संबंधित समस्यांची विविधता आणि तीव्रता बदलेली आढळून आली. एकदा वेट सायकलिंग केलेल्या महिलांमधे कमी तास झोपेची ( सात तासांपेक्षा कमी झोप घेणं) प्रवृत्ती आढळून आली. झोपेची गुणवत्ताही ढासळलेली आढळून आली. ज्या महिलांनी पाच किंवा पाच पेक्षा जास्त वेळा वेट सायकलिंग केले आहे त्यांना झोपेत श्वास अडकण्याचा ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅप्निआ होण्याचा धोका सर्वात जास्त असल्याचं आढळून आलं. वेट सायकलिंगमधून झोपेसंबंधित या आजाराला आमंत्रण मिळतं त्यामुळे हदयाच्या आणि मेंदुच्या आरोग्याला धोका निर्माण होतो असं अभ्यासकांचं विश्लेषण म्हणतं.
'गो रेड फॉर वूमन' या प्रकल्पांतर्गत आधी केलेल्या अभ्यासानुसार जास्त वजन, स्थूलता यामुळे झोपेच्या समस्या निर्माण होण्याचा धोका असतो असं आढळून आलं होतं आताचा अभ्यास वेट सायकलिंग आणि झोपेशी संबंधित समस्या यांचा सहसंबंध दाखवून महिलांना वजन स्थिर ठेवण्याचा, वजन नियंत्रित ठेवण्याचा , वजनाचं व्यवस्थापन करण्याचा सल्ला देतात. अभ्यासकांचा मते यामुळे वेट सायकलिंग करावं लागणार नाही. परिणामी त्यातून निर्माण होणाऱ्या झोपेच्या परिणामी हदयाशी , मेंदुशी निगडित समस्यांचा धोका टळेल.