ओटीपोटाचा दाह रोग एकतर सौम्य असतो किंवा काहीच लक्षणं नसतात त्यामुळे बहुतेक वेळेस अगदी गंभीर होईपर्यंत निदान केलं जात नाही. पण जेव्हा मासिक पाळीत कोणतीही अनियमितता, योनिमार्गात स्त्राव, संभोगा दरम्यान रक्तस्त्राव किंवा तत्सम लक्षणं दिसून येतात तेव्हा लगेच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली पाहिजे. ओटीपोटात होणार संसर्ग आणि त्याचे दुष्परिणाम टाळले पाहिजेत. वरील तक्रारी दिसल्यानंतर स्त्रीरोग तज्ञ ओटीपोट, योनीतून बाहेर पडणारा स्त्राव यांच्या तपासण्या करून कुठल्या चाचण्या केल्या पाहिजेत हे सांगतात. त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे पीएपी स्मीयर. वारंवार होणार्या संसर्गाच्या बाबतीत, स्त्राव स्वैब्स गोळा केला करून संसर्गाचं नक्की कारण शोधलं जातं. डॉक्टर योनी आणि ग्रीवा तपासून स्वैबवर नमुने गोळा करतात. याव्यतिरिक्त, अचूक निदानासाठी आणि उपचारांसाठी आणखी काही तपशीलवार चाचण्यांची शिफारस करू शकतात.
रक्त तपासणी रक्त तपासणी करून पांढर्या रक्त पेशींच्या संख्येचं मूल्यांकन केलं जातं. या चाचण्यांद्वारे नेमक्या कोणत्या प्रकारचा संसर्ग झाला आहे हे शोधण्याचा प्रयत्न होतो. पेशींच्या संख्येतील कमी जास्तपणा संसर्ग झाला आहे किंवा नाही हे स्पष्ट करतो. जर संसर्ग सौम्य स्वरूपाचा असेल तर अनेकदा रक्त तपासणीत समजत नाही. मात्र संसर्ग जोरदार असेल तर त्याचा पांढऱ्या पेशींच्या संख्येवर परिणाम झालेला तपासणीत लगेच लक्षात येतो. ओटीपोट दाह काहीवेळा लैंगिक आजारांमुळेही होऊ शकतो.गोनोरिहा, क्लॅमिडीया, हर्पस, एचपीव्ही या लैंगिक आजारांमध्ये ओटीपोटाचा दाह होतो. रक्त तपासणी केली की या आजारांचं निदान होऊ शकतं. काहीवेळा मूत्रविसर्गाच्या संसर्गातही ओटीपोटाचा दाह होतो. युरीन इन्फेक्शन आहे का हेही युरीन टेस्टमध्ये समजू शकतं.
अल्ट्रा साउंड जननेंद्रियांची सोनोग्राफी करून संसर्ग झालेला आहे का हे शोधता येतं. यात अंड नलिकेला सूज आहे का, पस किंवा गाठी, फोड आले आहेत का हे समजू शकतं. सौम्य संसर्ग दिसत नाही सोनोग्राफीमध्ये पण संसर्ग जास्त असेल तर लगेच समजतो आणि उपचारांना सुरुवात करता येऊ शकते.
लॅपरोस्कोपी लॅप्रोस्कॉपीमध्ये एका बारीक टेलेस्कोपचा वापर केला जातो. अंड नलिकेला संसर्ग असेल तर जो भाग संसर्ग झालेला आहे तो काढून टाकता येतो किंवा गाठ झालेली असेल तर तेही काढून टाकता येतं. अर्थात हा शेवटचा पर्याय म्हणून केलं जातं कारण अंड नलिकेला काही कारणानं धक्का बसला तर गर्भधारणेत अडचणी येऊ शकतात.
एन्डोमेट्रिअल बायॉप्सी गर्भाशयाच्या अस्तराचा भाग काढून त्याची तपासणी यात केली जाते. टीबीची शंका आल्यास ही तपासणी केली जाते.
उपचार जर ओटीपोटाचा दाह आहे असं लक्षात आलं तर अँटिबायोटिक्स दिले जातात. खूप जास्त प्रमाणात संसर्ग असेल तर दवाखान्यात उपचारांसाठी दाखल केलं जात. आणि इंजेक्शनच्या माध्यमातून अँटिबायोटिक्स दिल्या जातात. त्याकाळात जे कुणी लैंगिक जोडीदार असतील त्यांनाही तपासणी, चाचणी करून घेणं गरजेचं असतं. त्यांनाही आवश्यक ते उपचार लगेच मिळू शकतात. ही संपूर्ण उपचार प्रक्रिया सुरु असताना कुठल्याही प्रकारचे लैंगिक संबंध टाळणं आवश्यक आहे. कारण लैंगिक संबंध ठेवल्यामुळे हा आजरा पसरू शकतो.
ओटीपोटाचा दाह या आजारात शस्त्रक्रिया गरजेची असते का? अगदीच क्वचित केसेसमध्ये या आजारात शस्त्रक्रियेची गरज पडते. जर अँटिबायोटिक्समुळे आजार कमी झाला नाही तर शस्त्रक्रिया करावी लागू शकते. पेल्विक इन्फ्लामॅटोरी डिसीज म्हणजेच ओटीपोटाचा दाह हा रोग वेळीच लक्षात आला तर योग्य उपचारही लगेच मिळू शकतात.
विशेष आभार: डॉ. अंशुमाला शुक्ल कुलकर्णी
(MD, FCPS, DGO)