Join us   

तरुण मुलींना PCOS चा त्रास नेमका कशाने होतो? हा आजार आहे का, तो बरा होतो का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2023 9:20 AM

PCOS विषयी अनेक गैरसमज दिसतात, ते टाळून PCOS विषयी आणि उपचार-लाइफस्टाइल यासंदर्भात तज्ज्ञ सल्ला आवश्यक ठरतो.

तरुण मुलींमध्ये आणि एकूणच भारतीय महिलांमध्ये पीसीओडी, पीसीओएस या समस्या गेल्या काही वर्षात वेगाने वाढत आहेत. इन्शुलिनची पातळी जास्त असणे, लठ्ठपणा, मासिक पाळी अनियमित, उच्च रक्तदाब, मधुमेह, हार्ट डिसीज, त्वचेच्या समस्या, मानसिक समस्या या तक्रारी असणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हार्मोन्समध्ये विविध कारणांनी होणारे बदल आणि त्याचा परीणाम म्हणजेच हे चक्र आहे हे लक्षात घ्यायला हवे. पीसीओएस ही ट्रीटमेंटने नियंत्रणात येणारी समस्या असली तरी ती पूर्णपणे बरी होणारी नाही.

 जीवनशैलीत लहान लहान बदल केल्यास ही समस्या काही प्रमाणात नियंत्रणात येऊ शकते. याबाबतच पीसीओएस संघटनेने नुकतेच एका ऑनलाइन सेमिनारचे आयोजन केले होते. ज्यामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गौरा करंदीकर, त्वचारोगतज्ज्ञ डॉ. तेजा कुलकर्णी, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ऋचा सुळे-खोत, फिटनेसतज्ज्ञ यशश्री कलंत्री आणि आहारतज्ज्ञ क्षितिजा गायकवाड सहभागी झाल्या होत्या. त्यांनी  PCOS संदर्भात दिलेली ही उत्तरं..

तरुण मुलींना PCOS चा त्रास का होतो?

स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतीतज्ज्ञ डॉ. गौरी करंदीकर सांगतात..

पीसीओएस आहे हे सोनोग्राफी करताना दिसते. मात्र एकाच सोनोग्राफीवरुन पीसीओएस आहे असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. १३ ते १८ वयाच्या मुलींमध्ये हार्मोन्सचे बदल मोठ्या प्रमाणात होत असतात. लाईफस्टाइल बदल करणं जास्त महत्त्वाचे असते. काऊन्सिलींग आणि सकारात्मक माहिती देणं ही सर्वात महत्त्वाची स्टेप असते. अनेकदा पीसीओएस आहे असे नेमके असे कारण सांगता येत नाही. त्यामुळे त्यावर नेमके उपचारही नाहीत. कुटुंबात डायबिटीसची हिस्ट्री, लठ्ठपणाची समस्या, जन्मत: कमी वजन असणे यांसारखी काही कारणे ढोबळमानाने सांगता येऊ शकतात. एएमएच ब्लड टेस्ट करुन तसेच थायरॉईड आहे किंवा इतर काही समस्या आहेत का हे पाहणेही महत्त्वाचे आहे. 

मासिक पाळी अनियमित असेल तर फक्त पीसीओएस असतो असं नाही, इतरही काही कारणं असू शकतात. व्यायाम हा वजन कमी करण्यासाठी नसतो तर तो तुम्हाला फिट ठेवण्यासाठी असतो हे लक्षात ठेवायला हवे. वजन कमी करताना व्हीटॅमिन डेफीशन्सी होण्याची शक्यता असते. २१ ते ४५ दिवसांत पाळी येत असेल तर ओसी पिल्स देऊ नयेत. पण प्रमाणापेक्षा जास्त ॲक्ने, केस येणे किंवा आणखी काही त्रास असेल तर या गोळ्या द्यायला हरकत नाही. पीसीओएस असलेले आजारी नसतात ते आजारी भासतात. ओसी पिल्स ३ महिने दिल्या तर त्यामुळे प्रश्न कायमचा सुटत नाही. पण लाईफस्टाईल सुधारली तर त्याचा नक्कीच फायदा होतो.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समासिक पाळी आणि आरोग्यपीसीओएस