Lokmat Sakhi >Health > जननेंद्रियात पाण्यासारखे फोड, प्रचंड आग हा त्रास महिलांना का होतो? डॉक्टर सांगतात, घरगुती उपायांचा धोका

जननेंद्रियात पाण्यासारखे फोड, प्रचंड आग हा त्रास महिलांना का होतो? डॉक्टर सांगतात, घरगुती उपायांचा धोका

Herpes genitalless Health Problem : नाजूक जागचं दुखणं म्हणून पाणी भरलेले फोडा, प्रचंड आग हे सारं महिला अंगावर काढतात, घरगुती उपाय तर अधिक धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2023 09:47 AM2023-07-21T09:47:43+5:302023-07-21T11:18:16+5:30

Herpes genitalless Health Problem : नाजूक जागचं दुखणं म्हणून पाणी भरलेले फोडा, प्रचंड आग हे सारं महिला अंगावर काढतात, घरगुती उपाय तर अधिक धोकादायक

Herpes genitalless Health Problem : Why do women suffer from blisters like water in the genitals, huge fire? Doctors say, danger of home remedies | जननेंद्रियात पाण्यासारखे फोड, प्रचंड आग हा त्रास महिलांना का होतो? डॉक्टर सांगतात, घरगुती उपायांचा धोका

जननेंद्रियात पाण्यासारखे फोड, प्रचंड आग हा त्रास महिलांना का होतो? डॉक्टर सांगतात, घरगुती उपायांचा धोका

डॉ. दाक्षायणी पंडित 

एकदा अशीच निवांत बसलेली असताना आईचा फोन आला. आमच्या नेहमीच्या गप्पा न मारता आई म्हणाली, ‘अगं, या भारतीला तुझ्याशी काही तरी बोलायचंय.’ मी फोन घेतला.    भारतीला जननेंद्रियांची  वा त्याभोवतालच्या त्वचेवर पाण्याचे(पाण्याने भरलेले) फोड आले होते. तिला फोडांभोवती व फोडांवर असह्य वेदना होत होत्या. तिला मी तिथला फोटो पाठवायला सांगितला. फोटोवरून सहज कळत होतं की भारतीला नागिणीच्या विषाणूचा संसर्ग झाला होता (Herpes genitalless Health Problem ) . 

आजाराचं नाव –जननेंद्रियांची नागीण ( हर्पिस जेनिटॅलिस )

रोगकारक जंतू -

नागिणीचा विषाणू २  (हर्पिस व्हायरस २ ).नागीण विषाणूंचे एक कुटुंब असून त्यात ८ सभासद आहेत. १, २, व ३ क्रमांकाचे विषाणू हे मज्जापेशींना संसर्गित करतात व त्या पेशीत शिरून आयुष्यभर सुप्तावस्थेत तिथेच राहतात. क्र. १ चा विषाणू मानेच्या वरच्या भागात तर क्र. २ चा विषाणू कमरेच्या खाली काम करतो. पण मुखमैथुनामुळे विषाणू क्र. २चा संसर्ग मुखाला किंवा क्र. १चा  संसर्ग जननेंद्रियांना अशी अदलाबदली होऊ शकते. विषाणू क्र. ३ मुळे आधी कांजिण्या  होतात व नंतर विषाणू मज्जापेशीत राहतात. 

पुढे कधीही प्रतिकारशक्ती कमी झाली तर या तिन्ही विषाणूंचा उद्रेक होऊन लक्षणे दिसू लागतात. हे विषाणू फक्त एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे लैंगिक संबंधाद्वारा/अतिरिक्त शारिरीक जवळिकीमुळे पसरतात. ते फक्त मानवी शरीरात जिवंत राहतात, इतरत्र नाही. यापुढे आपण फक्त १ व २ क्र.च्या विषाणूंबद्दल बोलू. 

(Image : Google)
(Image : Google)

लक्षणे –

पुरुष वा स्त्रियांमध्ये सारखीच लक्षणे आढळतात. जननेंद्रिये व त्यांच्या आजूबाजूला किंचित खाज येते, नंतर आग होते व पाठोपाठ पाण्याचे फोड येतात. फोड खूप दुखतात व त्याच्या भोवतालची जागा लालसर होते. नुसत्या स्पर्शाने सुद्धा वेदना होते. अंतर्वस्त्रांचे घर्षण किंवा मांड्या एकमेकांवर घासून देखील असह्य वेदना होतात. यामुळे बायका लौकरच डॉक्टरांकडे जातात. प्रथम संसर्गाच्या वेळी ताप, थकवा देखील असतात. या काळात विषाणू मज्जापेशीत शिरून तिथेच राहतो. औषध न घेताही बऱ्याचदा आजार तात्पुरता बरा होतो. प्रतिकारशक्ती कमी होणे, अतिथंड (हिमालयात/ बर्फाळ प्रदेशात जाणे) किंवा अतिउष्ण (राजस्थान इ.) प्रदेशात प्रवास, वातावरणातील तीव्र स्वरूपाचे बदल, मोठे आजारपण यामुळे विषाणू जोमाने  वाढू  लागतात. 

निदान- 

फोडांचे ठिकाण, रूप व वेदना यावरूनच यावरूनच निदान होते..  वैद्यकीय महाविद्यालयासारख्या मोठ्या शैक्षणिक संस्थेतील स्त्रीरोग किंवा त्वचारोग वा गुप्तरोग विभागातील तज्ञ निदान करून औषधे देतात पण फोडातील पाण्याचा नमुना तसेच फुटलेल्या फोडाचा तळ खरवडून तो नमुनाही तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवतात. फोडाच्या पाण्यात विषाणूची प्रतिजने (अँटिजेन्स) तर खरवडून घेतलेल्या नमुन्यात विशिष्ट प्रकारच्या पेशी आढळतात. या चाचण्या बहुधा अभ्यासासाठी म्हणूनच केल्या जातात. मैत्रिणींनो, आजार गंभीर नसला तरी त्रासदायक असल्याने लौकर इलाज करून लक्षणांची तीव्रता कमी करण्याची आवश्यकता असते. 

उपचार – 

क्र. १ व २ विषाणूसाठी असायक्लोवीर  नावाचे औषध वापरतात. याच्या गोळ्या, मलम, द्रावण तसेच डोळ्यात घालायचे थेंब (क्र. १ साठी) उपलब्ध आहेत. यासोबत वेदनाशामके, व फोड वा त्याभोवतीच्या हुळहुळ्या जागेला मऊपणा  आणण्यासाठी ओल टिकवणारे पदार्थ (मॉईश्चराइझर) एवढीच औषधयोजना असते. दोघांवर एकदम उपचार करण्याचा उपयोग नाही कारण दोघांमध्ये एकाच वेळी संसर्गाचा उद्रेक होतोच असे नाही. 

महत्वाचे -

औषधोपचारांनी फक्त आताची लक्षणे जाऊन बरे वाटते पण याचा पुन्हा पुन्हा उद्रेक होतो. कारण मज्जापेशीत बसलेला विषाणू औषधांनी नष्ट होत नाही व संधी मिळताच परत उठाव करतो.

प्रतिबंध-

यासाठी लस उपलब्ध नाही. काँडोमचा वापर संसर्ग रोखतो.   
तर, मैत्रिणिंनो, काळजी घ्या.  


(लोखिका एम बी बी एस, एम डी. असून डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व चिकित्सा प्रयोगशाळेच्या प्रमुख निवृत्त प्राध्यापिका आहेत. )
 

Web Title: Herpes genitalless Health Problem : Why do women suffer from blisters like water in the genitals, huge fire? Doctors say, danger of home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.