तिसरी लाट कधी येईल, ती कशी असेल ? हे डेल्टा काय प्रकरण आहे? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनात घोंघावातायत. दिल्लीतील इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स ॲण्ड इंटेग्रेटीव्ह ( सीएसआय आर)चे संचालक डॉं. अनुराग अगरवाल. यांनी यापैकी काही प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.
डेल्टा हा कोविड विषाणूचा काय प्रकार आहे? जगभरात लोकांना याची का चिंता वाटत
आहे?
सार्स कोविड २ च्या विषाणूच्या बी 1.617.2 या प्रकाराला डेल्टा हे नाव देण्यात आलं आहे.
या विषाणूला असलेल्या काट्यावरच्या प्रथिनामध्ये उत्परिवर्तन होऊन हा प्रतिकारशक्तीला टाळून जास्त संक्रमणशील झाला आहे. आजवर जगातल्या ८० देशात तो पसरला आहे आणि इंग्लंड, अमेरिकेतली काही राज्यं, सिंगापूर आणि दक्षिण चीनमध्ये तो झपाट्याने पसरत आहे.
डेल्टा प्लस उत्परिवर्तन म्हणजे काय ?
कोविड विषाणूच्या डेल्टा प्रकारात संभाव्य महत्वाचे अतिरिक्त बदल विकसित झाल्यास त्याला डेल्टा प्लस असे म्हंटलं जातं. आजपर्यंत के ४१७ एन या उत्परिवर्तनाला पूर्वी बीटा म्हणून बघितलं जात होतं, त्यालाच लोक डेल्टा प्लस म्हणत आहेत. हा डेल्टा आण बीटा यांचा संकर नसून स्वतंत्र उत्परिवर्तन आहे. ए वाय १ किंवा ए वाय २ ही याची अधिक अचूक नावं आहेत. माझ्या मते ज्या भौगोलिक क्षेत्राने डेल्टा विषाणूचा कहर अनुभवला आहे तिथे डेल्टा प्लस विषाणूपासून फार मोठा धोका संभवत नाही. डेल्टा विषाणूमुळे तयार झालेल्या अँटीबॉडीज ( प्रतिपिंड) डेल्टा प्लसचा प्रतिकार करून पुरेशा निष्प्रभ करतील अशी माझी अपेक्षा आहे. त्यामुळे आपल्याला लगेचच धोका आहे किवा धास्ती घेण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. गेल्या महिन्यात डेल्टा विषाणूपेक्षा डेल्टा प्लस विषाणूची झपाट्याने वाढ होताना दिसली नाही. हे या मताला पुष्टी देणारं आहे. तरीही, INSACOG डेल्टा उत्परिवर्तनाचा एखादा उपप्रकार चिंताजनक ठरू शकतो म्हणून कसून तपासणी करत आहे.
काही लोकांचा कयास आहे त्याप्रमाणे तिसरी लाट येणार आहे का?
सर्वात हतबल किंवा आजाराच्या सान्निध्यात जास्त असणाऱ्या लोकांना विषाणूचा लगेच संसर्ग होतो आणि नंतर त्याची लागण जास्त जास्त संवेदनशील लोकांना होत जाते. आजाराची लागण होऊन ते बरे झालेल्या लोकांमध्ये विषाणूविरोधी नैसर्गिक प्रतिकारशक्ती निर्माण होते. नंतर लस घेतल्यामुळे प्रतिकारशक्ती प्राप्त झालेले लोक आहेत. प्रतिकारशक्ती प्राप्त झालेले लोक जास्त असतील तेव्हा विषाणू सहज पसरू शकत नाही आणि लागण होण्याचं प्रमाण घटतं. काही काळाननंतर प्रतिकारशक्ती कमी होते किंवा तिला टाळून विषाणू विकसित होतो आणि परत हल्ला करतो आणि पसरू लागतो. याला तुम्ही लाटांचं चक्र म्हणू शकता. संपूर्ण देशाचा विचार करता आपण नुकत्याच येऊन गेलेल्या लाटेला फक्त दुसरी लाट म्हणू शकत नाही. उदा. दिल्लीत ही चौथी लाट होती. गेल्या जून महिन्यात पहिली लाट आली, नंतर सप्टेंबर महिन्यात, नंतर नोव्हेंबर आणि आता आलेली चौथी लाट होती. अनेक लोकांना पुन्हा कधी लाट येणार आहे याची माहिती हवी असते. ती आता लवकर येईल असं मला वाटत नाही. काही डेल्टा उत्परिवर्तनाने नुकताच देशभर उच्छाद मांडला होता. बहुतांश लोकांमध्ये सध्या प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे. तेव्हा काही ठिकाणी स्थानिक लागण होईल परंतु ती लगेच देशभर लाटेसारखी पसरणार नाही. अर्थात प्रतिकारशक्तीला टाळून विषाणू खूप झपाट्याने विकसित होतो.
सर्वात महत्वाचं म्हणजे काही महिन्यापूर्वी लोक जसे गाफील राहिले तसा निष्काळजीपणा केला तर नक्कीच आणखी एक लाट येईल. सध्या झपाट्याने लसीकरण चालू आहे. विषाणू विकसित व्हायला थोडा वेळ लागतो, आम्ही विषांणूंवर लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे पुढच्या लाटा नियंत्रित ठेवण्यात आम्ही यशस्वी होऊ याची मला खात्री आहे. आपल्याकडे थोडा वेळ असला तरी विषाणू अस्तित्वात आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला पुरेशी दक्षता घेतली पाहिजे. लसीकरणाला प्रोत्साहन दिलं पाहिजे पण घाबरून जायचं काही कारण
नाही.
बदलत्या विषाणूवर लस प्रभावी ठरेल का ?
विषाणूच्या काट्यावर असलेली काही प्रथिनं विकसित झाल्यावर लसीनंतर तयार होणाऱ्या प्रतीपिंडांना दाद देणार नाहीत. अशा परिस्थितीत प्रतिकारशक्तीला टाळून आजार होऊ शकतो. सध्या उपलब्ध असलेल्या लसी या तीव्र स्वरूपाच्या आजाराला प्रतिबंध घालण्यास प्रभावी आहेत मात्र लागणीचा प्रतिबंध करण्यात त्यांचा प्रभाव कमी
पडतो.
विषाणू सतत विकसित होत राहिला तर वैज्ञानिकांना विषाणूच्या प्रत्येक नवीन रूपासाठी नवीन लसी शोधाव्या लागतील का?
आपल्याला प्रत्येक नवीन रूपासाठी वेगळी लस शोधावी लागणार नाही. काही उत्परीवर्तीत रूपासाठी आपल्याला लसीमध्ये थोडेफार बदल करावे लागतील. आपण आताच तशा एम आर एन ए लसी आलेल्या पहात आहोत.
सध्या भारतात उपलब्ध असलेल्या लसी या उत्परीवर्तनावर प्रभावी आहेत का?
हो, सध्या उपलब्ध असलेल्या सर्व लसी तीव्र आजारापासून संरांक्षण देणाऱ्या आहेत.
लस घेणं एव्हढं महत्वाचं का आहे?
कोविड सुसंगत वर्तन केल्याने कोविडची लागण होण्यापासून संरक्षण मिळत असलं तरी लसीमुळे लागण आणि प्रसार होणं दोन्हीच्या शक्यता कमी होतात. सर्वात महत्वाचं
म्हणजे आजार तीव्र होण्याची शक्यता ९० टक्के कमी होते म्हणून लस घेणं आवश्यक आहे.
- (‘कोविड सुसंगत वर्तन उत्तेजन आणि लस संकोच निर्मुलन’ डीएलए फाउंडेशन आणि
युनिसेफचा संयुक्त उपक्रम)