Join us  

पावसाळ्याच्या दिवसात जीवघेणं इन्फेक्शन टाळण्यासाठी स्वयंपाकघर 'असं' ठेवा सुरक्षित अन् स्वच्छ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 3:18 PM

How to Keep the kitchen safe and clean : घरात किंवा घराजवळ पाणी साचल्यास त्यात डास आणि इतर किटाणू होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पाणी साचू देऊ नका. घरातील लादी वेळोवेळी स्वच्छ करा.

ठळक मुद्दे उष्टी भांडी धुवायची राहिली तर झुरळं, डास वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे बायकांना स्वच्छतेबाबत निष्काळजीपणा करून चालत नाही. पावसाच्या दिवसात धुतलेले कपडे बाहेर वाळायला घालू शकत नाही. घरातच सुकवावे लागतात. त्यामुळे अनेकदा कपड्यांना बुरशी लागण्याची शक्यता असते.

पावसाळा आला की ओलसरपणा, साथीचे आजार, अस्वच्छता हे सगळं आलंच. घराघरातल्या बायकांना पावसाच्या वातावरणात जरा जास्तच कामं करावी लागतात. कारण पावसाच्या दिवसात धुतलेले कपडे बाहेर वाळायला घालू शकत नाही. घरातच सुकवावे लागतात. त्यामुळे अनेकदा कपड्यांना बुरशी लागण्याची शक्यता असते.

ओलसरपणामुळे वासही येतो. तसंच उष्टी भांडी धुवायची राहिली तर झुरळं, डास वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे बायकांना स्वच्छतेबाबत निष्काळजीपणा करून चालत नाही. आज आम्ही तुम्हाला पावसाच्या दिवसात साथीचे आजार टाळण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्सचा वापर करून तुम्ही स्वयंपाकघर सहज स्वच्छ ठेवू शकता.

रोज किचन स्वच्छ करत राहा

पावसाच्या दिवसात खरकटी भांडी राहिली तर डास, जंतू  होण्याची शक्यता जास्त असते. हेच जंतू माणसांच्या शरीरात  प्रवेश करतात तेव्हा साथीच्या आजारांचा सामना करावा लागू शकतो तेव्हा ताप, सर्दी, खोकला असे आजार उद्भवतात. म्हणूनच शक्यतो  घरातील सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर भांडी पडून राहू देऊ नका लगेचच स्वच्छ करा. गॅस, ओटा जेवण बनवून झाल्यानंतर धुवून घ्या मग स्वच्छ पुसा, स्वयंपाक घर नेहमी हवेशीर राहील याची काळजी घ्या. यासाठी खिडक्या उघड्या ठेवा. घरात किंवा घराजवळ पाणी साचल्यास त्यात डास आणि इतर किटाणू होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पाणी साचू देऊ नका. घरातील लादी वेळोवेळी स्वच्छ करा. चपला-बुट घरात  नेऊ नका. 

हवाबंद डब्यांचा वापर

पावसाळा सुरू होण्याआधीच वर्षभर किंवा अधिक महिने साठवून ठेवण्याच्या अन्नपदार्थांसाठी हवाबंद डब्ब्यांचा वापर करा. स्टिलचे डबे वापरात असतील तर डब्याच्या झाकणावर बटर पेपर किंवा उपलब्ध असलेल्या कोणत्याही पेपरनं गोलाकार गुंडाळून त्यावर प्लास्टीकची बॅग बांधा मग झाकण लावा. जेणेकरून पापड, मसाला, मसाल्याचे पदार्थ दीर्घकाळ व्यवस्थित राहतील. डब्बे बंद करताना किंवा उघडताना आपले हात ओले नसतील याची खात्री करून घ्या. कारण ओले हात लागले तर पदार्थांवर बुरशी येऊन लवकर खराब होण्याची शक्यता असते. 

फ्रिज स्वच्छ  ठेवा

पावसाळ्यात  स्वयंपाक घरातील फ्रिजची साफसफाई सगळ्यात महत्वाची असते.  सध्याच्या लॉकडाऊन काळात आपण अनेकजण जास्तीचं सामान घरात आणून ठेवतो. हे सामान खराब होऊ नये यासाठी  फ्रिजचा वापर केला जातो. म्हणून फ्रिजमध्ये उरलेले अन्नपदार्थ जास्त दिवस पडून राहू देऊ नका. शिळे पदार्थ, भाज्या आणि फळे वेळेवर बाहेर काढा. कारण हे पदार्थ खराब झाल्यास त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवेलेले इतर पदार्थ संक्रमित होऊ शकतात. निरोगी आरोग्यासाठी फ्रिज वेळेवर स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे. फ्रिजमध्ये ठेवलेल्या पदार्थांवर झाकण ठेवायला विसरू नका. पावसाळ्याच्या वातावरण फ्रिजचं पाणी न पिता साधं पाणी प्या. 

वैयक्तीक स्वच्छता

सर्वाधिक हेल्थ प्रॉब्लेम हे हातांव्दारे पोटात गेलेल्या किटाणूंमुळे होते. त्यामुळे काहीही खाण्याआधी एकदा हात नक्की धुवा. तुमची नखं वाढली असतील तर ती कमी करावीत. कारण नखांमध्ये लपलेले किटाणू तुम्हाला आजारी करु शकतात. पावसाळ्यात गॅस, अपचन अशा समस्या अधिक होतात. त्यामुळे बाहेरचं खाणं टाळा. आपल्या डाएटमध्ये व्हिटॅमिन ई आणि ओमेगा 3 चा समावेश करा. लिंबू, आलुबुखारा, संत्री, आवळा, पेरु यांसारखे व्हिटॅमिन सी असलेले फळे खावे. यामुळे स्कीनच्या समस्या दूर होतात. 

जर तुम्ही पावसात भिजला असला तर शक्य असल्यास लगेच कपडे बदला. ओल्या कपड्यांमध्ये जास्त वेळ राहू नका. खासकरुन भिजलेले अंडरगारमेंट्स वापरल्यास फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. त्यासोबतच भिजलेले शूज आणि सॉक्सही वापरू नका.   

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्य