-प्रज्ञा शिदोरे
आपल्यामध्ये असे अनेक विषय असतात ना की ज्याबद्दल बोलणं, चर्चा करणं याला एक न सांगता मनाई असल्यासारखं असतं. म्हणजे खरंतर हे विषय बोललो तर चालणार असतं, पण शी हे काय बोलायचे विषय का? असं म्हणून टाळलं जातं बोलणं! आणि त्यामुळेच अशा विषयांना अनेक गैरसमजांना ग्रासलेलं असतात. त्यापैकीच एक, खरंतर ज्याबद्दल सतत चर्चा व्हायला हवी, असा विषय म्हणजे ‘पाळी’.
आपल्यापैकी जवळजवळ सर्वांनी, आणि नक्कीच सर्वच मुलींनी याचा अनुभव घेतला असणार. शाळेत, साधारण सातवी किंवा आठवीमध्ये असताना अचानक मुलांना, मुलग्यांना वर्गाबाहेर जायला सांगितलं जायचं किंवा त्यांना खेळायला पाठवलं जायचं आणि मुलींना वर्गात ‘सेक्स एज्युकेशन’ चा वर्ग घेतला जायचा. अर्थातच याबद्दल खुली
चर्चा किंवा मोकळेपणाने बोलणं नाही. सारं कसं शांत शांत.
अदिती गुप्ता हिला जेव्हा तिच्या वयाच्या १२ व्या वर्षी पाळी सुरु झाली तेंव्हा तिला हे कोणालाही सांगू नको, आणि वाच्यता तर करूच नको असं घरच्यांकडून सांगण्यात आलं होतं. तिला देवळात जाऊ नको, ताटं वाढू नको असं सांगण्यात आलं होतं. म्हणजे थोडक्यात काय तर या ४ - ५ दिवसांमध्ये तू अशुद्ध आहेस असंच तिला सांगितलं गेलं.
अदिती म्हणते की अशामुळे मुलींच्या मनात लहानपणापासून आपण कुठेतरी कमी, अशी शरमेची भावना यायला लागते. अदिती अर्थातच एकटी नाही. आपल्यापैकी अनेकींना असं ‘वेगळं बसायची’ पद्धत
पाळावी लागली असेल. ‘पाळी’ याचे अनौपचारिक भाषेमध्ये जवळजवळ ५००० शब्द आहेत असं एक अभ्यास सांगतो. पण याबद्दल मोकळेपणाने बोलले मात्र जात नाही. यामुळे पाळी बद्दलची शास्त्रीय माहिती देखील मुला-मुलींनी नसते. मेन्स्ट्रुअल हायजिन डे निमित्त २०१६ साली एक अभ्यास करण्यात आला. या अभ्यासाचा
निष्कर्ष ही हेच सांगतो की दक्षिण आशियामधील ३०% मुलींना त्यांची पाळी सुरु होईपर्यंत याबद्दल काहीही माहिती नसते. आणि ज्याबद्दल माहिती नसते, त्याबद्दल शंका, भीती असणं हे साहजिकच आहे!
अनेक गैरसमजांनी घेरलेल्या या विषयासाठी आदिती गेल्या ५ वर्षांपासून काम करते
आहे. ही ३३ वर्षीय झारखंडमध्ये राहणारी इंजिनियर याबद्दल मार्ग शोधण्यासाठी अनेक दिवस प्रयत्न करत होती. ती म्हणते की तेंव्हा तिने ग्लोरिया स्टाईनम नावाच्या अमेरिकेतील स्त्रीवादी लेखिका, अभ्यासक, पत्रकार हीचा एक तिच्या वाचनात आला. आणि सगळी कोडी सुटायला लागली. लेखाचं नाव ‘पुरुषांना पाळी येत असली असती तर... ’ (हा लेखही जरूर वाचा बरं का!)
पाळी आणि त्याला जोडलेल्या विषयांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आदितीने ५ वर्षांपूर्वी ‘मेन्स्ट्रुपीडिया’ नावाची वेबसाईट सुरु केली. या वेबसाईटवर १० भारतीय भाषांमध्ये लिहिल्या गेलेल्या सचित्र पुस्तिका आहेत. मराठीतल्या या कॉमिक्सचं शीर्षक ‘मुलींसाठी मासिक पाळीविषयीची हसतखेळत मार्गदर्शिका’. यामध्ये मुलींच्या आणि मुलांच्या वाढत्या वयामध्ये होणारे शारीरिक आणि मानसिक बदल, पाळी का येते त्याविषयीची माहिती, तसेच मुलामुलींनी या वयामध्ये कसा आहार घ्यावा याविषयी सुद्धा लिहिले गेले आहे. या पुस्तिकांमधली ‘प्रिया ताई’ आपल्याला याविषयी सांगत असते.
२०१३ साली आदिती आणि तिचा तेंव्हाच बिझनेस पार्टनर आणि आताच लाईफ पार्टनर यांनी गुजरातच्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ डिझाईन मध्ये शिकत असताना, या चित्र पुस्तिकेच्या कामाची सुरवात झाली. यामध्ये प्राथमिक कल्पना म्हणजे मुलामुलींना अतिशय सध्या, सोप्या, त्यांच्या भाषेत हा विषय समजवून सांगावा.
म्हणजे, याविषयी ते आपापसात बोलतील आणि गैरसमज आपोआपच दूर होतील.
क्राऊडफन्डिंग मधून पैसे उभा करून या जोडीने युट्युब चॅनेलही सुरु केले.
ज्यामधल्या पहिल्याच व्हिडिओमध्ये ते याबद्दलची प्राथमिक कल्पना विस्ताराने सांगतात. पुढच्या
व्हिडिओ मध्ये १० भारतीय भाषांमधून ते टप्प्याटप्प्याने हा विषय समजावून सांगतात. हा अतिशय नाजूक विषय समजावून सांगण्यासाठी यापेक्षा प्रभावी माध्यम काय असणार.
तर असा हा ‘मेन्स्ट्रुपीडिया’
‘मेन्स्ट्रुपीडिया’चे युट्युब चॅनेल