नवरात्र म्हणजे घरोघरी बसणारे घट आणि त्यासाठी केले जाणारे ९ दिवसांचे उपवास. ज्यांच्याकडे घट बसतात त्यांच्याकडे घरातील १ व्यक्ती तरी आवर्जून ९ दिवसांचे उपवास करते. देवीवर असलेली भक्ती हा एक भाग असला तरी स्वत:वर नियंत्रण येण्यासाठी या उपवासांना विशेष महत्त्व असते. पावसाळ्याच्या दिवसांत पचनशक्ती क्षीण झालेली असते, तिला आराम देणे हा त्यामागील हेतू असतो. काही जण तर अजिबात काही न खाता म्हणजेच निरंकारी उपवास करतात. तर काही जण फक्त फळं खाऊन उपवास करतात (how to break navratri fasting important diet tips for good health).
आहार एकाएकी कमी केल्याने सुरुवातीला थोडे थकल्यासारखे वाटू शकते. पण नंतर त्याची सवय होते आणि शरीर नकळत हलके जाणवायला लागते. पण ९ दिवसांनंतर दसऱ्याला जेव्हा उपवास सोडायची वेळ येते तेव्हा मात्र आपल्याला त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. कारण गोडाधोडाचा स्वयंपाक, तळकट, मसालेदार पदार्थ आरोग्यासाठी त्रासदायक ठरु शकतात. इतके दिवस पोटाला आराम दिल्यानंतर एकाएकी जड अन्न खाण्याने पचनक्रियेवर ताण येऊ शकतो. असे होऊ नये म्हणून नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ते पाहूया..
१. उपवास सोडताना शक्यतो दही भात, वरण भात यांसारखे पदार्थ खाऊन सोडायला हवा. यामुळे पोाटावर अनावश्यक ताण येणार नाही. सणाला साधारणपणे भजी, पापड, वडे असं काही ना काही असू शकते. पण शक्यतो ९ दिवसांच्या उपवासानंतर असे पदार्थ खाणे टाळावे. धान्य ही आरोग्यासाठी जड असतात तेव्हा धान्य, कडधान्य यांचा आहारात एकाएकी समावेश न करता हळूहळू त्यांचा वापर वाढवावा.
२. उपवास सोडताना मैदा, साखर, मीठ, तेल, तूप हे पदार्थ कमीत कमी वापरुन ताक, दही, डाळींचे पाणी, सूप असे पदार्थ घेऊन सुरुवात करावी. एकदम पोळी, भाकरी, भात, कडधान्य खाणे टाळावे.
३. एरवी आपण नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण असा पॅटर्न फॉलो करतो. पण उपवास सोडताना आणि सोडल्यानंतर २-४ दिवस दर २ तासाने थोडे थोडे खावे. जेणेकरुन अशक्तपणा येणार नाही आणि तब्येत भरुन येण्यास मदत होईल.
४. नेहमीचा आहार सुरू करताना घन पदार्थांचा आहारात समावेश वाढवण्यापेक्षा द्रव पदार्थ जास्त प्रमाणात घ्यायला हवेत. यामध्ये सरबते, सूप, ज्यूस, ताक, नारळ पाणी यांचा आवर्जून समावेश हवा. जेणेकरुन पचनाच्या तक्रारी उद्भवणार नाहीत.
५. उपवासानंतर काहीतरी चमचमीत, मसालेदार खाण्याची इच्छा होऊ शकते. पण एकदम मसालेदार खाल्ले तर त्याचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे या इच्छेवर नियंत्रण ठेवावे आणि साधारण आठवड्याभराने तेलकट, मसालेदार पदार्थ खावेत.