निकीता मोरे
आजपासून आश्विन महिन्यातील नवरात्रीचे व्रत सुरू झाले. वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्याचा सण म्हणून देशभरात विविध ठिकाणी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. नवरात्रीच्या काळात देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी नऊ दिवस उपवास करतात. उपवासाच्या दिवसांची संख्या कमी-जास्त असू शकते. बरेच लोक सर्व नऊ दिवस उपवास करतात, तर काही भक्त असे आहेत जे नवरात्रीचे पहिले दोन किंवा शेवटचे दोन दिवस असे जोड्यांमध्ये उपवास करतात (How To take care of Health While fasting In Navratri 1 important thing to remember).
उपवास आहेत म्हणून महिलांची दैनंदिन कामं मात्र थांबत नाहीत. घरातील कामं, ऑफिसचं ताण आणि बदलेलं वातावरण यामुळे उपवास करताना आपल्या अनेक आरोग्याच्या समस्या जाणवतात. उपवासामुळे अनेकांना थकवा जाणवतो, त्याशिवाय उपवासाच्या पदार्थांमुळे अॅसिडीटी किंवा अपचन होणे यासारख्या समस्या जाणवतात. मात्र जर आपण योग्य पद्धतीने उपवास केल्यास तर आपल्याला उपवासामुळे आरोग्यास नुकसान होण्यापेक्षा फायदाच होता.
उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून नेमकं काय करायला हवं?
१. उपवास केल्यामुळे आहारातील फायबरचं प्रमाण कमी होतं. तसंच या दिवसांमध्ये अनेक जणांचा चहा-कॉफी घेण्यावर भर असतो. त्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठता होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे शक्यतो चहा किंवा कॉफी घेणे टाळून राजगिरा पीठ, मखाणा हे पदार्थ या दिवसांमध्ये आवर्जून खायला हवेत.
२. दही खाल्ल्यास पचनाशी निगडीत समस्या कमी होण्यास मदत होते. त्यामुळे या काळात पचनक्रिया मजबूत करण्यासाठी आहारात दह्याचा अवश्य समावेश करावा.
३. उपवासामुळे पोट रिकामं होतं आणि त्यात उपवासाचे पदार्थ खाल्ल्यामुळे अनेकांना अॅसिडीटी म्हणजेच पित्ताचा त्रास होतो. अशावेळी या 9 दिवसांच्या उपवासामध्ये ताक पिण्यावर भर दिला पाहिजे.
४. अनेकांना एरवीच मुळात पाणी कमी पिण्याची सवय असते. पण उपवास असल्याने आपलं खाणं कमी होतं आणि त्यातच उपवासाचे पदार्थ जास्त तिखट नसल्याने पाणी कमी प्यायलं जातं.
५. या 9 दिवसांच्या उपवासात फळांवर जास्त भर द्या. केळी, सफरचंद, पपई, अंजीर, पेर, चिकू या फळांचा समावेश करा. यामुळे आरोग्याला पोषण मिळण्यास मदत होते. फळांमध्ये जास्त प्रमाणात फायबर आणि विविध प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात. तसेच फळांमुळे शरीरातील पाण्याची पातळी चांगली राहण्यास मदत होते.
उपवास करताना १ तत्त्व आवर्जून पाळा...
याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्यापैकी बरेच लोक भूक लागण्याची वाटच बघत नाही. भूक लागणे म्हणजे आपले शरीर अन्न पचविण्यासाठी आता सज्ज आहे हे दर्शविण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. काही वेळा दुपारची भूक लागली नसेल तर जेवणाची वेळ झाली म्हणून जेवायचा जाणे. खाल्ल्यामुळे आपली पाचनप्रणाली अजून दुबळी होते, परिणामी ताण वाढतो आणि रोगप्रतिकारक शक्ती मंदावते. उपवासाने आपला जठराग्नी अजून प्रदीप्त होत असल्यामुळे, तणाव कमी होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. आयुर्वेदानुसार उपवासामुळे आपला जठराग्नी पुन्हा प्रज्वलित होतो. या जठराग्नीतील वाढ आपल्या शरीरातील टाकाऊ विषकण नष्ट करते. हे टाकाऊ विषकण शरीराच्या बाहेर घालविले जातात, त्यामुळे सुस्ती आणि मंदपणा कमी होतो. शरीरातील पेशीपेशीत नवचैतन्य जागृत होते. त्यामुळेच, उपवास हा शरीरशुद्धीसाठी प्रभावी उपचार ठरलेला आहे. जेव्हा शरीर शुद्ध होते, तेव्हा मन सुद्धा अधिक शांत आणि स्थिर होते, कारण शरीर आणि मनाचा जवळचा संबंध असतो.
(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत.)