नवरात्र म्हणजे ९ दिवासांचे उपवास हे अतिशय सामान्य गणित आहे. घरोघरी एक नाहीतर अधिक जण देवीची उपासना करताना आवर्जून उपवास करतात. यावेळी उपवासाचे पदार्थ खाऊन किंवा वेगवेगळ्या पद्धतीने उपवास केले जातात. स्वत:वर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी या उपवासांना विशेष महत्त्व असते. ऋतूबदलाच्या वेळी अशाप्रकारचे उपवास केले तर आरोग्याला त्याचे बरेच फायदे असतात हे नक्की. पण त्यासाठी ९ दिवसांत योग्य प्रमाणात, योग्य वेळी योग्य पद्धतीने आहार घ्यायला हवा. नाहीतर या उपवासांचा त्रासही होण्याची शक्यता असते. ९ दिवस उपवास केल्यावर दहाव्या दिवशी उपवास सोडण्याची वेळ येते. यावेळी अनेकांना जेवण न जाणे, जेवण पाहून अस्वस्थ होणे, भूक न लागणे अशा समस्या उद्भवण्याची शक्यता असते. ९ दिवस पोटाला आराम दिल्याने असे होण्याची शक्यता असते. त्यामुळे दहाव्या दिवशी जेवणाचा त्रास होऊ नये तर काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात (Important Diet Tips for Breaking Navratri Fasting)...
१. उपवास सोडताना एकदम जड पदार्थ खाण्यापेक्षा पचायला हलके आणि लो कॅलरी पदार्थ थोड्या प्रमाणात खात नेहमीचे अन्नपदार्थ घेण्यास सुरुवात करावी. यामध्ये बीट/गाजर/दुधी भोपळा/पालक यांचा रस, दाल सूप दही, ताक यांचा समावे करु शकता.
२. पचनशक्ती हळूहळू पूर्वपदावर आली की मग इतर पदार्थ थोड्या प्रमाणात आणि थोड्या थोड्या वेळाने खायला सुरुवात करा. पचन आणि भूक सुधारेल तेव्हा गहू, तांदूळ, डाळी, कडधान्य खायला हरकत नाही, मात्र सुरुवातीला हे जड पदार्थ घेणे शक्यतो टाळावेत.
३. उपवास सोडताना साखर, मीठ, मैदा आणि तेल, तूप मर्यादित स्वरूपातच वापरायला हवं. नेहेमीचं खाणं पिणं सुरू करतानाही, भरपूर पाणी आणि पातळ पदार्थ घ्या. त्यामुळे पचन तर चांगलं होईलच पण डीहायड्रेशनही होणार नाही.
४. उपवासात आपण तुलनेने कमी वेळा आणि कमी प्रमाणात खातो. त्यामुळे नेहमीचे खाणे सुरू करताना शक्यतो २ ते ३ वेळाच खाण्यापेक्षा थोडं थोडं ५ ते ६ वेळा विभागून खायला हवं.
५. मसालेदार, तिखट पदार्थ शक्यतो टाळा, म्हणजे पित्तविकार आणि पचनाच्या तक्रारी उद्भवणार नाहीत. तळलेले, तेलकट, तुपकट आणि पचायला जड पदार्थ कमीत कमी खा म्हणजे पोटाचे किंवा पचनाचे त्रास होणार नाहीत.