प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री तिच्या डाएट आणि फिटनेससाठी अतिशय प्रसिद्ध आहे. आपल्या चाहत्यांना ती नेहमी काही ना काही टिप्स देत असते. दर मंगळवारी तर भाग्यश्री आवर्जून आरोग्याबाबत किंवा फिटनेसबाबत काहीतरी महत्त्वाची माहिती आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करते. त्याचप्रमाणे आजही तिने अतिशय उपयुक्त अशी माहिती शेअर केली आहे. यामध्ये उत्तम आरोग्यासाठी शरीरात मॅग्नेशियम या खनिजाची कशी आवश्यकता असते याविषयी तिने माहिती दिली आहे. आपल्या शरीराचे कार्य सुरळीत चालावे यासाठी प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, कॅल्शियम यासोबतच विविध प्रकारच्या व्हिटॅमिन्सची आणि खनिजांचीही आवश्यकता असते. मॅग्नेशियम हे त्यातीलच एक महत्त्वाचे खनिज असून मेंदूचे आणि हृदयाचे कार्य सुरळीत चालण्यासाठी आहारात मॅग्नेशियमचा समावेश असायला हवा (Important Source of Magnesium is Dragon Fruit Actress Bhagyashree) .
भाग्यश्री सांगते, मॅग्नेशियमची कमतरता असेल तर सतत मूड बदलणे, कार्डीओव्हस्क्युलर डिसिज होण्याची शक्यता असते. हे खनिज स्नायू आणि मज्जातंतूंच्या कार्याचे नियमन करण्यास, रक्तातील साखरेची पातळी राखण्यासाठी, रक्तदाब स्थिर करण्यासाठी आणि प्रथिने, हाडे आणि डीएनए तयार करण्यात मदत करते. मेलाटोनिन हे झोपेसाठीचे उत्प्रेरक असल्याने ते वेळोवेळी पुन्हा भरले जाणे आवश्यक आहे. यासाठी आहारात पालक, हिरव्या पालेभाज्या, काजू, बदाम, शेंगदाणे, भोपळ्याच्या बिया, दही, डार्क चॉकलेट घ्यायला हवे, ज्या माध्यमातून शरीराची मॅग्नेशियमची गरम भरुन काढली जाते.
इतकेच नाही तर काही फळांमध्येही मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात असते. फळं हा नैसर्गिक स्त्रोत असल्याने सप्लिमेंटसच्या माध्यमातून हे घटक घेण्यापेक्षा नैसर्गिक स्वरुपात शरीराचे जितके चांगले पोषण होईल तितके चांगले. केळी, अवाकॅडो, कॅनटालोप, किवी, पपई यांसारख्या फळांमध्ये मॅग्नेशियम असते. यातील केळी, पपई, किवी ही फळं आपण नियमितपणे खातो. पण इतर फळं खातोच असं नाही. त्याचप्रमाणे बाजारात क्वचितच दिसणारे आणि थंड हवेच्या ठिकाणी आवर्जून खाल्ले जाणारे फळ म्हणजे ड्रॅगनफ्रूट. यातही मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात असते. म्हणून आहारात आवर्जून ड्रॅगन फ्रूटचा समावेश करायला हवा असे भाग्यश्री आवर्जून सांगते. हे फळ दिसायला जितके सुंदर असते तितकेच ते चवीलाही छान लागते आणि आरोग्यासाठीही फायदेशीर असते.