डॉ. माया गाडे
सर्वात वाईट सवय म्हणजे गर्भधारणा टाळण्यासाठी हल्ली अनेक मुली गर्भनिरोधक गोळ्यांचा सर्रास वापर करतात. पण त्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे किंवा कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्तीला विश्वासात घेऊन त्याबद्दल माहिती गोळा करणे आवश्यक आहे. (Can Birth Control Cause Infertility) शास्त्रीय माहिती घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या घ्यायला हव्या. आपल्याच मनाने, अर्धवट माहितीच्या आधारे गर्भनिरोधक गोळ्या वापरल्या तर त्याचे वाईट परिणाम देखील होऊ शकतात. (Does Birth Control Affect Infertility Facts You Need To know)
१. आपत्कालीन गर्भनिरोधक गोळी किंवा मॉर्निंग पिल्स - या गोळ्यांमध्ये लिव्होनोरजेस्ट्रेल आणि इस्ट्रोजेन हार्मोन्सचे प्रमाण असते. संततीनियमनाच्या साधनांचा उपयोग न झाल्यास किंवा असुरक्षित लैंगिक संबंध आल्यास, गर्भधारणा टाळण्यासाठी ही गोळी ७२ तासांच्या आत एकदाच घ्यावी लागते.
२. सर्वसाधारणपणे संयुक्त गर्भनिरोधक गोळी जास्त प्रमाणात वापरली जाते. या गोळीमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण असते. वेगवेगळ्या प्रकारच्या संयुक्त गर्भनिरोधक गोळ्या मिळतात. काहींमध्ये प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण जास्त असते तर काहींमध्ये कमी.
३. संयुक्त गोळीमुळे ऋतुचक्रात अंडे बाहेर पडण्याची प्रक्रिया होत नाही. त्यामुळे गर्भधारणा होत नाही. तसेच गर्भाशयाच्या मुखातून जो स्त्राव होतो त्यामध्ये सुद्धा बदल होतो. तो स्त्राव चिकट आणि घट्ट होतो, त्यामुळे शुक्राणूला गर्भाशयात शिरायला अडथळा होतो.
४. गर्भनिरोधक गोळी योग्यरीत्या वापरल्यास गर्भारपण रोखण्यास या गोळ्या ९५ ते ९९ टक्के परिणामकारक ठरतात.
गर्भनिरोधक गोळीचे दुष्परिणाम
प्रत्येक व्यक्तीची शरीरयष्टी वेगळी असते, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर होणारे हार्मोन्सचे परिणाम देखील वेगवेगळे असतात.
१. मळमळ, डोकेदुखी: सर्वसाधारणपणे ५० टक्के स्त्रियांना मळमळ होऊ शकते. त्यासाठी त्यांनी रात्री जेवणानंतर जर गोळी घेतली तर मळमळ बऱ्यापैकी कमी होऊ शकते. अर्धे डोके सतत दुखत राहणे हा देखील गर्भनिरोधक गोळीचा दुष्परिणाम होऊ शकतो.
२. अनियमित रक्तस्त्राव. गर्भनिरोधक गोळ्यांमुळे शरीरामध्ये संप्रेरक बदल होतात. त्यामुळे काही स्त्रियांना अनियमित रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते.
३. वजन वाढणे. गर्भनिरोधक गोळ्यांमुळे शरीरात थोड्या प्रमाणात पाणी जमा होते. त्यामुळे शरीराला सूज आल्यासारखे वाटते. तसेच स्तनांचा आकार देखील वाढतो. या गोष्टी तात्पुरत्या असतात. गोळीचे सेवन करणे बंद केल्यावर सूज कमी होते. त्यामुळे या गोळ्यांचे सेवन करण्याआधी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
४. स्वभावात बदल, चिडचिडेपणा येणे. या गोळ्यांमुळे स्वभावात चिडचिडेपणा किंवा अस्थिरपणा वाढू शकतो. या गोळ्यांच्या सेवनाने नैराश्य येऊ शकते. कमी प्रमाणात प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स असलेल्या गर्भनिरोधक गोळीमुळे नैराश्याचे प्रमाण कमी होते.
५. गर्भनिरोधक गोळ्यांमुळे लैंगिक संक्रमित आजारापासून संरक्षण होत नाही.
६. काही स्त्रियांना या गोळ्यांमुळे योनीतून पांढऱ्या रंगाचा योनिस्राव होण्याची शक्यता असते.
७. काही स्त्रियांना किंवा मुलींना त्वचेसंदर्भात तक्रारी वाढू लागतात. गोळ्यांच्या उष्णतेमुळे चेहऱ्यावर मुरुमे येण्याचे प्रमाण वाढू शकते. काहींना केसगळतीचा देखील त्रास होतो.
गर्भनिरोधक गोळ्या कोणत्या स्त्रीने टाळाव्यात?
- ३५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या स्त्रीने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्यांचे सेवन करू नये.
- धूम्रपान करणाऱ्या स्त्रियांनी किंवा मुलींनी या गोळ्यांचे सेवन करणे टाळावे.
- ज्या स्त्रियांच्या रक्तामध्ये गाठी जमा होण्याची शक्यता असते त्यांनी या गोळ्या घेऊ नयेत.
- ज्या स्त्रियांना कर्करोग होण्याची पार्श्वभूमी असल्यास किंवा स्तनांचा कर्करोग आहे त्यांनी या गोळ्यांचे सेवन टाळावे.
- ज्या स्त्रियांना यकृताचा आजार आहे, गाठी होणे, काविळीमुळे यकृत खराब होणे, मद्यपानामुळे यकृतावर सूज येणे, असे त्रास असलेल्या स्त्रियांनी या गोळ्यांचे सेवन करणे टाळावे.
गर्भनिरोधक गोळ्यांचे फायदे कोणते?
१. गर्भनिरोधक गोळ्यांमुळे केवळ गर्भधारणा थांबते इतकेच नव्हे तर, त्यामुळे मासिक पाळीचे अनियमित चक्र देखील सुरळीत होते. ज्या मुलींना हार्मोन्सची अनियमितता व असंतुलनाचा त्रास आहे, त्यांना या गोळ्यांचा चांगला फायदा होतो. शिवाय चेहऱ्यावर मुरुमे येणे किंवा अति प्रमाणात केस येतात ते देखील बऱ्यापैकी कमी होतात.
२. सगळ्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे दोन मुलांमध्ये अंतर राखण्यासाठी या गोळ्यांचा फायदा होतो. गर्भधारणा होण्याचे टेन्शन नसल्याने स्त्रीचे मानसिक स्वास्थ्य सुधारते आणि लैंगिक जीवनामध्ये देखील सुधारणा होते. जेव्हा गर्भधारणा हवी असेल तेव्हा गर्भनिरोधक गोळी बंद करणे आवश्यक असते. या गोळ्या बंद केल्यानंतर २ ते ३ महिने स्वतःला आणि शरीराला पूर्ववत होण्यासाठी थांबावे लागते. त्या काळात हार्मोन्सचे परिणाम पूर्ववत होतात आणि गर्भधारणा होऊ शकते.
(कन्सल्टन्ट, गायनॅकॉलॉजी आणि ऑब्स्टेट्रिक्स, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई)