Join us   

Coronavirus fact check : खरंच लसीकरणानंतर महिलांसह पुरूषांच्या प्रजनन क्षमतेवर होतोय परिणाम? समोर आलं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 6:31 PM

Coronavirus fact check : या मेसेजमधून दावा केला जात आहे की कोरोनाची लस घेतल्यानंतर महिलांसह पुरूषांमध्ये वंध्यत्वाची समस्या निर्माण होऊ शकते.

ठळक मुद्दे आपल्या मनात काही शंका असल्यास, लसी घेण्यापूर्वी आपण आरोग्य सेवक किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले ठरेल.

देशात कोरोना लसीकरणाची मोहिम वेगाने सुरू आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत १९ कोटी ६० लाखांपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण झाले आहे. लस घेत असलेल्यांमध्ये महिला तसेच पुरूषांचाही समावेश आहे. दिवसेंदिवस जास्तीत जास्त लोक लसीकरण अभियानात सहभागी होत आहेत.  दरम्यान सोशल मीडियावर लसीकरणाबाबत एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमधून दावा केला जात आहे की कोरोनाची लस घेतल्यानंतर महिलांसह पुरूषांमध्ये वंध्यत्वाची समस्या निर्माण होऊ शकते.

पीआयबीच्या फॅक्ट चेक टीमने या व्हायरल मेसेजचे सत्य उघड केले आहे. पीआयबीने लिहिले आहे की, 'कोविड लसीकरणाशी संबंधित अनेक बनावट माहिती/ संदेश पसरत आहेत, त्यातील एक म्हणजे लस महिला व पुरूषांमध्ये वंध्यत्व येते. पीआयबीनं नमूद केले की कोरोनाची लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी आहे आणि त्यांच्यात वंध्यत्वाचा कोणताही पुरावा नाही. पीआयबीने असा इशारा दिला आहे की कृपया अशा अफवा किंवा माहितीपासून सावध रहा आणि लसीकरण झालेच पाहिजे.  यापूर्वी जानेवारीमध्ये अफवांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती, ज्यामध्ये कोणत्या स्थितीत लसी  घेऊ नये याच्या खोट्या सूचना देण्यात आल्या होत्या.

काय आहेत अफवा? 

अविवाहित मुलींना लसीपासून दूर ठेवा (लग्नानंतर मूल न होण्याची भीती असते.), मुलांना लसीपासून दूर ठेवा (भविष्यात बरेच रोग संभवतात), ज्यांना नेहमीच न्यूमोनिया, दमा किंवा ब्राँकायटिस (मृत्यूचे संभाव्य दुष्परिणाम) सारख्या श्वसनमार्गाचे आजार आहेत त्यांनी लस घेऊ नये, अल्कोहोल, सिगारेट, तंबाखूचे सेवन करणारे (कर्करोग होण्याची शक्यता), मानसिक आणि मज्जा तंतूजन्य समस्या असलेले रुग्ण (आजार वाढू शकतात) ,मधुमेहाच्या रुग्णांनीच चुकूनही लस घेऊ नके. (सौम्य दुष्परिणामांमुळेही मृत्यू शक्य आहे). या अफवांकडे दुर्लक्ष करा. आपल्या मनात काही शंका असल्यास, लसी घेण्यापूर्वी आपण आरोग्य सेवक किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले ठरेल.

स्मोकिंग करणारे आणि शाकाहारी लोक कोरोनापासून अधिक सुरक्षित?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शाकाहारी लोक आणि स्मोकिंग करत असलेल्यांना कोरोनाचा धोका कमी असल्याची माहिती व्हायरल झाली होती. पण यात काहीही अर्थ नसल्याचं समोर आलं आहे. धूम्रपान करणारे आणि शाकाहारी लोक कोविड -१९ च्या तुलनेत कमी सुरक्षित आहेत. या व्हायरल पोस्टमध्ये असे सूचित केले गेले आहे की. 'कोरोनाव्हायरस हा श्वसन रोग असूनही धूम्रपान करणे फायदेशीर ठरू शकते. हे देखील सूचित केले  होते की कोविड विरूद्ध रोग प्रतिकारशक्ती प्रदान करण्यात फायबर समृद्ध शाकाहारी अन्नाची भूमिका असू शकते.'

(Press Information Bureau ) पीआयबी  या दाव्याची सत्यता लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ट्विट करत स्पष्टीकरण दिलं होतं.  यानुसार सध्या शाकाहारी आहार आणि धूम्रपान कोविडपासून संरक्षण देऊ शकते अशा सेरॉलॉजिकल अभ्यासानुसार कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. सीएसआयआरने म्हटले आहे की या दाव्याबाबत त्यांनी कोणतीही प्रेस नोट जारी केलेली नाही.

पीआयबी फॅक्ट चेक दरम्यान दिसून आलं की,  शाकाहारी आहार आणि धूम्रपान COVID19 पासून संरक्षण देऊ शकते, असा कोणताही निष्कर्ष  सेरॉलॉजिकल अभ्यासावर आधारित काढण्यात आलेला नाही. धूम्रपान करण्यासंबंधी नकारात्मक बाबी नोंदवल्या गेल्या आहेत.  कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी सत्यता शोधणे आवश्यक आहे.

टॅग्स : आरोग्यकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमहिला