वैद्य विनीता बेंडाळे
“ अगं काय सांगतेस अवनी? किती गोड बातमी दिलीस! काय बोलायचं सुचतंच नाहीये, इतका आनंद झालाय मला. कधी एकदा तुला भेटते असं झालंय आता. तुमच्या दोघांचही खूप खूप अभिनंदन! नीट काळजी घे स्वतःची. लवकरात लवकर भेटू आपण.’’
मीराने फोन ठेवला. तिच्या डोळ्यात खरंच आनंदाश्रू होते. अवनी आणि मीरा बालपणापासूनच्या अगदी ‘सख्ख्या’ मैत्रिणी.
दोघींच्याही लग्नाला आता चार वर्षं झाली होती आणि अवनीने फोनवरून ती प्रेगनंट असल्याची गोड बातमी मीराला दिली होती. काही क्षण त्या आनंदामधे तिचे मन हरवून गेले. ते क्षण ओसरल्यावर मात्र तिच्या मनातील त्या एका सततच्या जडत्वाने अलगदपणे पुन्हा आपली मान वर काढली. दोन वर्षांपासून मीरा आणि तिचा नवरा राहूल हे ‘कन्सेप्शन’ साठी प्रयत्न करत होते. अनेक प्रकारच्या तपासण्या झाल्या, नामांकित डॅाक्टरांकडे सल्ला आणि चिकित्सा घेतली गेली, पण सगळं व्यर्थ. आपल्या जीवलग मैत्रिणीची ही गोड बातमी ऐकून मीराला अगदी मनापासून आनंद निश्चितच झाला होता. पण पुन्हा एकदा तिच्या मनातील तो प्रश्न ठळकपणे तिच्या डोळ्यांसमोर आला- ‘ मीच का? व्हाय मी? ’
आता आपण या एका मीराची कथा आणि व्यथा वाचत असलो, तरी समाजात असे अनेक ‘ मीरा ’ आणि ‘राहूल ’ आहेत की ज्यांना ‘व्हाय मी? ’ आणि ‘व्हाट नेक्स्ट ? ’ असे प्रश्न दिवस रात्र भेडसावत असतात आणि ज्याच्या ओझ्याखाली त्यांना आयुष्यातला कोणताच आनंद नीट उपभोगता येत नसतो.
मी वैद्यकीय प्रॅक्टीस सुरू केल्यापासून गेल्या २३ वर्षांच्या काळात ‘अनपत्यता’ किंवा ‘वंध्यत्व’ याचं वाढलेलं प्रमाण एक चिकित्सक म्हणून माझ्याही मनाला अस्वस्थ करतं. अनपत्यतेचं प्रमाण वाढतं आहे हे जरी सत्य असलं, तरी देखील ‘मीरा’ आणि ‘राहूल’ यांच्या या समस्येला आयुर्वेद शास्त्राच्या सिद्धांतांनुसार अत्यंत प्रभावी पद्धतीने उत्तरे मिळू शकतात, मिळताना आम्ही पाहतो.
एखादी व्याधी अथवा आरोग्याशी संबंधित समस्या याचा विचार करताना त्याचे हेतू म्हणजे कारणे, त्यामुळे निर्माण झालेली लक्षणे अथवा समस्या हे अत्यंत बारकाईने विचारात घेऊन, त्याचे सखोल विश्लेषण करून त्यानुसार युक्तीपूर्वक चिकित्सा योजना करणे हे आयुर्वेदाच्या मूळ तत्वांपैकी एक महत्त्वाचे तत्व आहे. याला अनुसरून योग्य उपाय योजना केल्यास वंध्यत्वाची समस्या असणाऱ्या अनेक ‘मीरा’ आणि ‘राहूल’ यांच्या जीवनात पालकत्वाच्या आनंदाची पालवी ही आयुर्वेद शास्त्राच्या मदतीने फुलवता येऊ शकते.
आयुर्वेदाच्या पद्धतीने निदान आणि चिकित्सा करत असताना वंध्यत्वाशी संबंधित रक्ताच्या तपासण्या, Sonography, Ovulation study, semen analysis, HSG या आणि यासारख्या इतर संबंधित तपासण्यांचाही आवश्यकतेनुसार उपयोग करणे निश्चितच उपयुक्त ठरताना दिसते.
‘अनपत्यता’ किंवा ‘वंध्यत्व’ या विषयाचा विस्तार फार मोठा आहे. त्याचे सविस्तर विश्लेषण पुढील काही लेखांमधे आपण क्रमाक्रमाने पाहूच..
(लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ आणि वंध्यत्व तज्ज्ञ आहेत.
द्युम्ना वुमेन्स क्लिनिक
रसायू क्लिनिक
www.dyumnawomensclinic.com