वैद्य विनीता बेंडाळे
स्त्री वंध्यत्वाची कारणे लक्षात घेताना स्त्रीबीज निर्मिती प्रक्रियेमधील दोष निर्देशित करणे अर्थातच आवश्यक असते. PCOS (Polycystic Ovarian Syndrome) या मधे स्त्रीबीज निर्मितीची प्रक्रिया बाधित होऊ शकते. स्त्रीबीज निर्मिती उशीरा होणे आणि त्यामुळे पाळी उशीरा येणे हा PCOS चा एक महत्त्वाचा परिणाम PCOS असलेल्या पुष्कळ स्त्रियांमधे दिसून येतो. स्त्रीबीज निर्मिती प्रक्रियेवरच्या परिणामाव्यतिरिक्त शारीरीक आणि मानसिक स्तरावर अनेक लक्षणे PCOS मुळे निर्माण होऊ शकतात. येथे केवळ स्त्री बीज निर्मितीच्या प्रक्रियेशी संबंधित विचार मांडत आहे. वाढत्या वयानुसार स्त्री बीजाची प्रत खालावत जाते. साधारणपणे वयाच्या पस्तिशी नंतर स्त्री बीजांची संख्या आणि प्रत खालावाण्याचा वेग अधिक असतो. अशा वेळेला AMH या हार्मोनचे प्रमाण कमी झाल्याचे आढळून येते. वाढत्या वयामुळे गर्भधारणा राहण्याची शक्यता जशी खालावते, तशीच गर्भस्रावाची शक्यताही वाढते. स्थौल्य (Obesity) यामुळे स्त्रीबीज निर्मितीच्या प्रक्रियेमधे अडचण येऊ शकते. वजन प्रमाणापेक्षा खूप कमी असल्यामुळेही अशी अडचण येऊ शकते.हार्मोन्समधील असंतुलन, 'Prolactin' या हार्मोनचे प्रमाण अधिक असणे, Thyroid ग्रंथीचे कार्य प्राकृत नसणे, डायबिटीस हा आजार असणे या गोष्टींमुळेही स्त्रीबीज निर्मिती प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतात.
गर्भाशय नलिकांमधील अडथळे (Fallopian tube blockages) हे स्त्री वंध्यत्वाच्या प्रमुख कारणांपैकी एक होय. स्त्रीबीज निर्मिती झाल्यानंतर स्त्रीबीज ग्रंथीमधून (Ovary) स्त्रीबीज(Ovum) गर्भाशय नलिकेमधे पोहोचणे, पुरुष बीजाचा योनिमार्गामधून प्रवेश झाल्यानंतर गर्भाशय नलिकेमधील स्त्री बीजापर्यंत ते पोहोचणे, तसेच स्त्री आणि पुरुष बीज एकत्र आल्यानंतर निर्माण झालेला गर्भ (zygote) हा पुढील वाढीसाठी गर्भाशयामधे पोहोचणे या सर्व दृष्टिकोनातून गर्भाशय नलिकांमधील मार्ग मोकळा असणे हे आवश्यक असते. Pelvic inflammatory disease (PID) - ओटीपोटामधील तीव्र संसर्गजन्य आजार, Endometriosis, Pelvic Tuberculosis या आजारांमुळे, तसेच काही वेळा शस्त्रकर्मानंतर गर्भाशय नलिकांमधे अडथळा निर्माण होऊ शकतो. Ectopic Pregnancy हे अशा स्वरूपाचा अडथळा निर्माण होण्याचे एक प्रमुख कारण आहे. गर्भाशयनलिकेमधे गर्भ निर्मिती झाल्यानंतर तो गर्भ (zygote) हा साधारणपणे आठवडाभराच्या काळात गर्भाशयामधे पोहचून पुढील वाढीसाठी तिथे रुजणं अपेक्षित असते. परंतु काही वेळा तसे न होता त्या गर्भाची वाढ गर्भाशय नलिकेमधेच होऊ लागते. यास (Ectopic Pregnancy) असे संबोधले जाते. अशा वेळेला शस्त्रकर्म करून आवश्यकतेनुसारे काही वेळा गर्भशयनलिका पूर्णत: काढावी लागते (Salpingectomy) अन्यथा काही वेळा केवळ गर्गभाशय नलिकेच्या आतील घटकांचे निर्हरण करावे लागते(Salpingostomy). गर्भनिहरणासाठी या दुसऱ्या प्रकारच्या कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रियेनंतर गर्भाशय नलिकेमधे अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. या दोन्ही पैकी कोणत्याही एका कारणाच्या परिणामस्वरूप एका गर्भाशयनलिकेमधे दोष निर्माण झाला अशी परिस्थिती असली तरीसुद्धा दुसरी गर्भाशय नलिका प्राकृत असेल आणि गर्भनिर्मितीशी संबंधित दोन्ही जोडीदारांचे इतर सर्व निकष योग्य असतील तर गर्भधारणा होण्याची संभावना ही ५० टक्के असतेच. जी गर्भाशयनलिका प्राकृत आहे त्या बाजुच्या स्त्रीबीज ग्रंथी (Ovary) मधून स्त्रीबीज निर्मिती ज्या महिन्यामध्ये होते त्या महिन्यामधे स्वाभाविक रित्या गर्भधारणा होऊ शकते.
या अनुषंगाने एक उदाहरण येथे नमूद करत आहे. त्या रुग्ण महिलेचे वय २८ वर्षे होते. काही महिन्यांपूर्वीचा तिचा Ectopic pregnancy चा इतिहास होता. त्यामुळे तिच्या उजव्या बाजूची गर्भाशय नलिका पूर्णत: काढावी लागली होती. त्यानंतर गर्भधारणा राहण्यासाठी यश येत नसल्यामुळे चिकित्सेसाठी ते दांपत्य आले होते. चिकित्सा सुरु करण्यापूर्वी ज्या प्राथमिक तपासण्या करून घेतल्या गेल्या, त्या मधे HSG (Hysterosalpingography) या तपासणीमधे असे निदर्शनास आले की तिच्या डाव्या बाजूच्या गर्भाशयनलिकेमधे अडथळा निर्माण झाला होता. उजव्या बाजूच्या गर्भाशय नलिकेचे शस्त्रकर्माने आधीच निर्हरण झालेले असल्याने नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा होण्याची शक्यता आता तिच्या बाबतीत उरली नव्हती. आयुर्वेदाच्या तत्त्वांनुसार औषध योजना, पंचकर्म आणि काही स्त्री विशिष्ट कर्म यांची योजना, जीवन शैलीमधील बदल यांचं संयोजन करून तीन महिन्यांची संपूर्ण चिकित्सा योजना करण्यात आली. तीन महिन्यांनी पुन्हा केलेल्या HSG मधे तिच्या डाव्या बाजूच्या नलिकेतील अडथळा दूर झाल्याचे दिसून आले आणि नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा राहण्याचा तिचा मार्गही मोकळा झाला. गर्भाशय नलिकेमधील मार्ग मोकळा असणे याव्यतिरिक्त गर्भाशय नलिकेमधील स्त्राव प्राकृत असणे तसेच नलिकांच्या आतील प्रदेशावर असणारी सूक्ष्म केसांसारखी रचना (cilia) यांची हालचाल योग्य प्रकारे होत असणे या गोष्टीसुद्धा गर्भधारणा राहण्यासाठी आवश्यक असतात. स्त्रीबीज निर्मिती प्रक्रियेमधील दोष आणि गर्भाशय नलिकेशी संबंधित कारणे या व्यतिरिक्त स्त्री वंध्यत्वाशी निगडित उर्वरित कारणांचा विचार आपण पुढील लेखामधे पाहू.
(लेखिका आयुर्वेद आणि वंध्यत्व उपचार तज्ज्ञ आहेत. ‘द्युम्ना वुमेन्स क्लिनिक’, रसायू क्लिनिक, पुणे) ०२० २५४६५८८६, www.dyumnawomensclinic.com