भ्रूणाचं क्रायोप्रिझर्व्हेशन प्रक्रियेमध्ये फ्रीझिंग आणि जतन अशा दोन प्रक्रियांचा समावेश असतो. ज्याचा उपयोग आयव्हीएफ उपचार पद्धतीसाठी होतो. आयव्हीएफ / आयसीएसआय उपचार पद्धतीमध्ये स्त्री बीजांडं आणि पुरुषाचे शुक्राणू एका विशिष्ट द्रवात एका बशीत प्रयोगशाळेत ठेवले जातात. ज्यावेळी शुक्राणू बीजांडाला फलित करते त्यातून भ्रूण तयार होतो. हा भ्रूण नंतर स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केला जातो. आणि बाळ आईच्या पोटात वाढायला सुरुवात होते.
आयव्हीएफ प्रक्रियेअंतर्गत त्या स्त्रीला दररोज हार्मोन्सची इंजेक्शन्स दिली जातात. जवळपास ८ ते १० दिवस ही इंजेक्शन्स दिली जातात. जेणेकरून एक नाही तर अनेक बीजांडं तयार होतील. पुरुषांच्या वीर्यातही लक्षावधी शुक्राणू असतात. एकपेक्षा अधिक स्त्री बीजांडं आणि लाखो शुक्राणू उपलब्ध झाल्यामुळे मग एकापेक्षा अधिक भ्रूण तयार केले जातात. स्त्रीचं वय आणि आधी झालेले गर्भपात, त्या स्त्रीची शारीरिक अवस्था या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन डॉक्टर्स १ ते ३ भ्रूणांचं गर्भाशयात रोपण करतात. जेणेकरून गर्भधारणेच्या शक्यता वाढतात. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान अधिकचे भ्रूण गोठवून जतन केले जातात, या प्रक्रियेला भ्रूण क्रायोप्रिझर्व्हेशन म्हटलं जातं.
भ्रूण क्रायोप्रिझर्व्हेशन का केलं जातं?
अनेक कारणांसाठी जोडपी हा पर्याय निवडतात.
१) आयव्हीएफ प्रक्रियेतून गर्भधारणा करत असताना काहीवेळा पहिल्या फटक्यात गर्भधारणा होत नाही. पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला तर पुन्हा पुन्हा इंजेक्शन्स, सोनोग्राफी, बीजांडं गोळा करणं, त्यासाठी हॉस्पिटलाइज होणं हे करण्यापेक्षा भ्रूण जतन केलेला असेल तर पहिला प्रयत्न अयशस्वी झाला तरी दुसऱ्यांदा जतन भ्रूणच वापरता येतो.
२) कर्करोग किंवा तत्सम जटिल आजारात उपचार पूर्ण झाल्याशिवाय गर्भधारणा स्त्रीसाठी शक्य नसते. या आजारांच्या उपचारांचा अनेकदा बीजांडांच्या आरोग्यावर परिणाम होतो. अशावेळी उपचार सुरु करण्याआधी बीजांडं किंवा भ्रूण गोठवून जतन करण्याचा पर्याय जोडपी निवडतात. जेणेकरून आजरातून पूर्ण बरं झाल्यानंतर त्यांना मुलासाठी चान्स घेता येईल.
३) पहिलं मूल या प्रक्रियेतून झाल्यानंतर काही वर्षांनी दुसरं मूल हवं असल्यासही जोडपी हा पर्याय निवडतात.
४) काही जोडपी निपुत्रिक जोडप्यांना आपला जतन केलेला भ्रूण डोनेटही करतात.
५) त्याचप्रमाणे काही जोडपी फर्टिलिटी लॅब्समध्ये अधिक संशोधनासाठीही डोनेट करतात.
भ्रूणाचे क्रायोप्रिझर्व्हेशन बीजांड फलित झाल्यानंतर १ ते ६ दिवसात केलं जातं. सगळ्या भ्रूणांचं जतन केलं जात नाही. कुठले भ्रूण जतन करण्यासाठी निवडायचे हे त्यांचे आरोग्य आणि भ्रूणांची संख्या यावर ठरतं. एकदा भ्रूण गोठला की त्यात घडणाऱ्या सगळ्या जीवशास्त्रीय घडामोडी थांबतात. पेशींची वाढ आणि पेशी मृत होणं हेही थांबतं. ज्यावेळी हे भ्रूण वापरायचे असतात त्यांना एका विशिष्ट द्रवपदार्थ ठेवून ॲक्टिव्ह केलं जातं आणि त्यांच्यातली जीवशास्त्रीय घडामोड सुरु होऊन, त्या भ्रूणाची वाढ सुरु होते.
भ्रूण किती काळ जतन करता येतो?
गोठलेला भ्रूण लिक्विड नायट्रोजनचे फ्रिझरमध्ये १९६ डिग्री तापमानाला अनेक वर्ष गोठवता येऊ शकतो. लिक्विड नायट्रोजनचे कुठलेही दुष्परिणाम या भ्रूणावर होत नाही. त्यामुळे प्रदीर्घकाळ भ्रूण गोठलेला राहू शकतो. गोठवल्यानंतर अनेक वर्षांनी भ्रूण पुन्हा ॲक्टिव्ह करता येतो. याही प्रक्रियेचे कुठलेही दुष्परिणाम नाहीत, बाळ अगदी सुदृढ जन्माला येऊ शकतं.
भ्रूण क्रायोप्रिझर्व्हेशन कितपत सुरक्षित आहे?
आजवर झालेल्या संशोधनांमधून हे दिसून आलं आहे की भ्रूण गोठवून जतन करण्याचे आणि वापराचे होणाऱ्या मुलावर कसलेही दुष्परिणाम होत नाहीत. गोठवण्याची प्रक्रिया करुन जी मुलं जन्माला येतात त्यांच्यात ती गोठण्याची प्रक्रिया न करता जन्माला आलेल्या मुलांइतकीच सुदृढ असतात.
१९८० पासून भ्रूण क्रायोप्रिझर्व्हेशन प्रक्रिया जगभर सुरु झाली आणि हजारो मुलं जन्माला आली. प्रजननाची ही एका उपयुक्त पद्धत असून जगभर वापरली जाते.
विशेष आभार: डॉ. अरुण आर. राठी
(MBBS, DGO, DNB, FCPS, DFP)