सध्या महिलांमधे वंध्यत्वाची समस्या मोठया प्रमाणात आढळून येत आहे. हे असं का होतंय यावर तज्ज्ञ बिघडलेल्या जीवनशैलीला दोष देत आहेत. सदोष जीवनशैलीमुळे कमी वयातच महिलांना स्थूलता आणि हार्मोनमधील बदल या समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्यांचा परिणाम शरीराच्या यंत्रणेवर आणि कार्यप्रणालीवर होतो. सध्याच्या महिलांना टोकाच्या ताणातून जावं लागतंय. ऑफिस- व्यवसायातील जबाबदार्या , तेथील ताणतणाव, घरातल्या जबाबदार्या पार पाडताना होणारी दगदग यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात ताणाला सामोरं जावं लागत आहे. ही सर्व कारणं आणि ताणाचा परिणाम म्हणजे गर्भधारणा होण्याबाबत महिलांना अडचणी येत आहे तर अनेकींना वंध्यत्व आलं अहे. वंध्यत्वाबाबतच्या कारणांबद्दल तज्ज्ञ सविस्तर माहिती देतात. त्यात महिलांचं वय, जीवनशैली या घटकाचा समावेश आहे. तज्ज्ञांनी केवळ वंध्यत्वामागील कारणांबाबतचा आढवा घेतला असं नाही तर हे वंध्यत्त्व टाळू शकण्याचे वैयक्तिक पातळीवरचे उपायही सांगितले आहेत.
का येतं वंध्यत्व?
- सध्याच्या मुली महिला या आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला, कामाला खूप महत्त्व देत आहेत. करिअरच्या पातळीवर स्थिरस्थावर झाल्यावर लग्नाचा निर्णय घेत आहेत. त्यामुळे बर्याच मुलींच्याबाबतीत लग्न होईपर्यंत वयाची तिशी उलटून जाते. लग्नानंतरही लगेच मूल होण्याला मुलींचा नकार असतो. यामुळे वय वाढतं आणि वाढणार्या वयासोबतच महिलांच्या अंडाशयातील अंड्याची संख्या कमी होते. त्यांची गुणवत्ता कमी होते. त्यामुळे वाढतं वय हे वंध्यत्वामागचं मुख्य कारण असल्याचं तज्ज्ञ म्हणतात.
- आधुनिक काळातल्या महिलांमधे व्यसनाचं प्रमाणही वाढलेलं आहे. अनेक महिला धूम्रपान आणि मद्यपान करत आहेत. आधुनिक जीवनशैलीची निकड म्हणून या गोष्टी अनेक महिलांच्या सवयीचा भाग झाल्या आहेत. पण या व्यसनांचा परिणाम त्यांच्या प्रजनन क्षमतेवर होतो. अनेक अभ्यास सांगतात की , तंबाखू आणि मद्यामधील विषारी घटकांचा महिलांच्या अंडाशयावर वाईट परिणाम होतो. त्याचा परिणाम म्हणून महिलांमधे वंध्यत्वाचा धोका वाढतो. तसेच गर्भ राहिला तरी गर्भपात होण्याची भीती असते.
- महिला, मुली खाण्याच्या बाबतीत डाएटिंगच्या नावाखाली खूप प्रयोग करतात. जास्त खाणं, कमी खाणं या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी हानिकारकच असतात. यालाच ‘इटिंग डिसऑर्डर’ असं म्हटलं जातं. कमी आहार घेतल्यानं शरीरास आवश्यक ती पोषक तत्त्वं मिळत नाही. त्यामुळे पोषणाशी निगडित अनेक समस्या निर्माण होतात. तर जास्त खाल्यामुळे वजन वाढतं. तसेच थायरॉइड, पीसीओडी या आजारांना आमंत्रण मिळतं. या आजारात हार्मोन्समधलं संतुलन बिघडतं. हार्मोन्समधे असंतुलन निर्माण झालं का त्याचा परिणाम प्रजनन क्षमतेवर होतो.
- तणाव हाही आजच्या आधुनिक जीवनशैलीचा भाग झालाय. अति ताण घेतल्यानं थायरॉइडसंबंधित आजार निर्माण होतात. या आजारामुळे हार्मोन्समधील संतुलन बिघडतं आणि अशा परिस्थितीत गर्भधारणा होणं अवघड होतं.
- अंडनलिका बंद होणं ही समस्या आजकाल अनेक महिलांमधे दिसून येते. यामुळे शुक्राणू बीजांडापर्यंत पोहोचू शकत नाही. य कारणामुळेही गर्भधारणा होण्यास अडचणी येतात.
यावर उपाय काय?
- गर्भधारणा होण्यासाठी आधी आपल्या जीवनशैलीकडे बारकाईनं बघायला हवं. जीवनशैलीत महत्त्वाचे बदल आवश्यक ठरतात. सकाळ -संध्याकाळ एक तास प्राणायाम आणि ध्यानधारणा करणं आवश्यक आहे. यामुळे तणाव हलका होण्यास , तणाव नियंत्रणास मदत मिळते.
- दगदगीच्या जीवनशैलीत धावपळ होते . पण व्यायाम होत नाही. व्यायामाला वेळच मिळत नाही. गर्भधारणा होण्यावर आपण शारीरिक हालचाली , व्यायाम किती करतो ही गोष्ट खूप परिणाम करते. गर्भधारणा होण्यासाठी योगसाधनेतील सर्वांगासन, पश्चिमोत्तानासन, सुप्त बध्द कोनासन, भुंजगासन, सेतू बंधासन ही आसनं फायदेशीर असतात. तज्ज्ञांकडून ती शिकून मग करणं सुरक्षित ठरतं.
- जीवनशैली ताळ्यावर आणताना त्यात आहाराला खूप महत्त्व आहे. आहारात जास्तीत जास्त फळं, हिरव्या भाज्या, सुकामेवा, मोड आलेली कडध्यानं या घटकांचा समावेश असणं आवश्यक आहे. जंक फूड, बाहेरचे खाद्यपदार्थ खाण्यास टाळावं.
- रात्री लवकर झोपणं, सकाळी लवकर उठणं या सवयीनं शरीर आणि मनाचा उत्साह वाढतो, आरोग्य चांगलं राहातं. झोपेशी निगडित समस्या निर्माण होत नाही.
- गर्भधारणा विनासमस्या होण्यासाठी धूम्रपान , मद्यपान हे टाळायला हवं.
- वंध्यत्वामागे वय हा घटक मोठा परिणाम करतो. त्यामुळे गर्भधारणेस फार उशीर करु नये. जास्त वय हे फक्त वंध्यत्वासाठीच कारणीभूत ठरतं असं नाही गरोदरपणात गुंतागुंतीच्या समस्याही निर्माण होवू शकतात.