Lokmat Sakhi >Health >Infertility > मूल होत नाही? शारीरिक समस्यांसह सुपरफास्ट जीवनशैलीमुळेही वाढतेय वंध्यत्वाची गंभीर समस्या

मूल होत नाही? शारीरिक समस्यांसह सुपरफास्ट जीवनशैलीमुळेही वाढतेय वंध्यत्वाची गंभीर समस्या

मूल न होण्याची ही काही गंभीर कारणं; काही आजार शारीरिक असले तरी काही प्रश्न जीवनशैलीतूनही निर्माण होतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 03:36 PM2021-06-24T15:36:29+5:302021-06-24T15:44:21+5:30

मूल न होण्याची ही काही गंभीर कारणं; काही आजार शारीरिक असले तरी काही प्रश्न जीवनशैलीतूनही निर्माण होतात

infertility causes physical problems and lifestyle, risk and treatment | मूल होत नाही? शारीरिक समस्यांसह सुपरफास्ट जीवनशैलीमुळेही वाढतेय वंध्यत्वाची गंभीर समस्या

मूल होत नाही? शारीरिक समस्यांसह सुपरफास्ट जीवनशैलीमुळेही वाढतेय वंध्यत्वाची गंभीर समस्या

Highlightsमासिक पाळीचे चक्र बदलू शकते, अनियमित होऊ शकते, त्यामुळे स्त्रीबीज निर्मितीची प्रक्रिया, गर्भाशयातील आतील स्तराची रचना यांच्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात.

वैद्य विनीता बेंडाळे

स्त्री वंध्यत्वाशी संबंधित बीज निर्मितीमधील दोष आणि गर्भाशयनलिकांमधील दोष याव्यतिरिक्त वंध्यत्वाची अजून काय कारणं असतात? योनीप्रदेश (Vagina), जेथून पुरुष बीजाचा प्रवेश होतो, तेथे काही इन्फेक्शन्स असतील तर ही परिस्थिती पुरुष बीजांच्या दृष्टीने हानीकारक ठरू शकते. 'Vagimsmus' म्हणजे येोनीप्रदेशातील स्नायुंचा अनैच्छिक (Involuntary) संकोच होणे. काही स्त्रियांमध्ये अशी परिस्थिती शारीरीक संबंध येताना निर्माण होते. यामुळे वेदना होतात आणि त्यामुळे संबंध येण्यामधेही अडचण निर्माण होऊ शकते. असे झाल्यास गर्भधारणा राहू शकत नाही .
गर्भाशय मुख (cervix) येथिल स्त्राव हे स्त्रीबीजनिर्मितीच्या (ovulation) सुमारास नैसर्गिकरित्याच पुरुष बीजाला अनुकूल असे होतात जेणेकरून पुरुष बीजांचा प्रवेश हा गर्भाशयामधे सुकरतेने होऊ शकतो. काही वेळा, विशेषत: काही संसर्ग दोषांमुळे (infections) हे गर्भाशय मुखांमधील स्त्राव अधिक प्रमाणात घट्ट होऊ शकतात आणि त्यामुळे पुरुष बीजांचा गर्भाशयामधे प्रवेश होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. गर्भाशय मुखाच्या संसर्ग दोषांमुळे (infections) तेथील स्त्राव हे पुरुषबीजांना हानीकारक अथवा मारकही ठरू शकतात. हे गर्भाशय मुख काही वेळा अतिशय संकुचित (लहान) असते. त्याला 'cervical stenosis' ही संज्ञा आधुनिक शास्त्रामधे आहे. आयुर्वेद शास्त्रामधे याचं वर्णन 'सूचिमुखी योनी' असं केलं गेलं आहे. यामुळे पुरुष बीजांचा गर्भाशयामधे प्रवेश होण्यास बाधा निर्माण होऊ शकते. गर्भाशय तसेच संबंधित अवयवांमधील रचनात्मक विकृतींमुळे काही वेळा गर्भधारणा राहण्यामधे किंवा राहिल्यास गर्भाची वाढ होण्यामधे अडचण निर्माण होऊ शकते.

 

 

गर्भधारणेत अडचणी येण्याची ही काही कारणं..

१. गर्भधारणेनंतर गर्भ योग्य पद्धतीने रुजण्यासाठी आणि त्याच्या वाढीसाठी 'Endometrium' म्हणजे गर्भाशयातील आतील स्तर हा योग्य दर्जाचा असणे आवश्यक असते. निरनिराळ्या कारणांमुळे यामधे बाधा उत्पन्न होऊ शकते. गर्भधारणा न राहणे किंवा गर्भस्त्राव होणे या गोष्टींचे हे एक महत्वाचे कारण आहे. गर्भाशयातील आतील स्तर (Endometrium) हा त्याच्या स्वाभाविक ठिकाणाव्यतिरिक्त काही वेळा इतरत्रही वाढू शकतो. उदाहरणार्थ - स्त्रीबीज ग्रंथी, गर्भाशय नलिका, गर्भाशयाची बाहेरील बाजू. परिणामस्वरूपी गर्भाशय नलिकांमधे अडथळा निर्माण होणे, गर्भ रुजण्याच्या प्रक्रियेमधे बाधा येणे, गर्भाशयाच्या आतील वातावरणावर अयोग्य परिणाम होणे अशा स्वरूपाचे बदल होऊ शकतात आणि त्यामुळे गर्भ धारणा होण्यामधे अडचण निर्माण होऊ शकते.
काही वेळा हा गर्भाशयातील आतील स्तर (Endometrium) त्याच्या वरील बाजूस असणाऱ्या असणाऱ्या स्तरामधे (Myometrium) वाढू शकतो. यास Adenomyosis अशी संज्ञा आहे. यामुळे गर्भधारणेनंतर गर्भ रुजण्याच्या प्रक्रियेमधे (Implantation ) प्रतिबंध निर्माण होऊ शकतो.
२. ओटीपोटातील संसर्गदोषांमुळे (Pelvic inflammatory diseases) किंवा काही शस्त्रकर्मांनंतर गर्भाशयामधे 'Adhesions’ तयार होऊ शकतात. म्हणजे गर्भाशयाच्या आतील स्तर हे एकमेकांशी संलग्न होऊ शकतात. यामुळे गर्भधारणेला अडचण निर्माण होऊ शकते, गर्भधारणा झाली तर गर्भस्त्राव होण्याची शक्यताही असते.
३. गर्भाशयामधील 'Frboids' आणि 'polyps' या वाढींमुळेही काही वेळा त्यांच्या आकार आणि वाढ होण्याच्या जागेला अनुसरून गर्भधारणा न होणे किंवा गर्भस्त्राव होणे या गोष्टी घडू शकतात.
४. काही संसर्गदोषांमुळे (Infections) वंध्यत्व निर्माण होऊ शकतं. उदाहरणार्थ Sexually transmitted diseases, Pelvic inflammatory diseases, Tuberculosis चे काही विशिष्ट प्रकार.
५. स्त्री वंध्यत्वाशी संबंधित सामान्यतः आढळून येणारी ही काही कारणं. या व्यतिरिक्तही कारणे आढळून येतात जी विचारात घेऊन आवश्यकतेनुसार संबंधित तपासण्या आणि चिकित्सेचा विचार करावा लागतो.

 

६. आयुर्वेद शास्त्राचे याबरोबर आणखीही काही दृष्टीकोन आहेत. मासिक पाळी सुरू असताना अवलंबलेली जीवनशैली हा त्यापैकी एक आहे. आयुर्वेद शास्त्रानुसार मासिक पाळी सुरु असताना शारीरीक आणि मानसिक स्तरावर तणाव टाळणे महत्वाचे असते. पचायला हलका असा ताजा आहार घेणे ही गोष्टही महत्वाची आहे. सध्याच्या ‘सुपर फास्ट ’ जीवनशैली मधे ही गोष्ट अशक्यही वाटू शकते. परंतु त्याचे महत्व लक्षात घेतल्यास तारतम्य बाळगून व्यावहारिक मार्ग काढण्याचा प्रयत्न करणे नक्कीच महत्वाचे आहे.
७. स्त्री शरीरामधे मासिक पाळी येणं हा प्रजननक्षम वयामधे सातत्याने सुरू असणाऱ्या नैसर्गिक चक्राचा एक भाग आहे. त्या ४-५ दिवसांमधील घडामोडींचा संबंध हा पुढील मासिक पाळी येईपर्यंत घडणाऱ्या घडामोडींशीही(Phases) जुळलेला असतो. मासिक पाळी सुरू असतानाच त्यानंतर काही दिवसांनी होणाऱ्या स्त्रीबीज निर्मितीच्या प्रक्रियेच्या दृष्टिने (Ovulation) आवश्यक घडामोडींची सुरवात होत असते. गर्भधारणा झाल्यास ती यशस्वी होण्यासाठी स्त्रीबीजनिर्मितीनंतर पुढील साधारण: दोन आठवड्यांमधे जी तयारी गर्भाशयामधे होणं आवश्यक असते ती प्रक्रिया ही स्त्रीबीजनिर्मितीच्या प्रक्रियेशी जुळलेली असते.
८. या माहितीवरून असा प्रश्न मनात येऊ शकतो, की गर्भधारणेच्या दृष्टिने प्रयत्नशील असताना या गोष्टीचं महत्व असू शकतं. त्याव्यतिरिक्त आधीपासून या गोष्टींची काळजी कशाला घ्यायला हवी? आयुर्वेद शास्त्राचा दृष्टिकोन या मागे असा आहे, की मासिक पाळीचं चक्र (Menstrual cycle)- या मधे वेगवेगळ्या काळामधे, वेगवेगळ्या स्तरांवर घडणाऱ्या घोडीमोडींशी संबंधित शारीरक्रियेमधील (Physiology) जे भाव पदार्थ असतात, त्यांच्या कार्यक्षमतेवर या गोष्टींमुळे परिणाम होऊ शकतो. मासिक पाळीच्या वेळेला क्वचित प्रसंगी जंक फूड सारखा अयोग्य आहार घेणे, शारिरीक किंवा मानसिक स्चतरावर खूप जास्त दगदग होणे ही गोष्ट निराळी आहे. परंतू सातत्याने अशा गोष्टी धडत राहिल्यास शारीरक्रियेतील प्रक्रियांवर त्याचे अयोग्य परिणाम होऊ शकतात. मासिक पाळीचे चक्र बदलू शकते, अनियमित होऊ शकते, त्यामुळे स्त्रीबीज निर्मितीची प्रक्रिया, गर्भाशयातील आतील स्तराची रचना यांच्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात.
 चिकित्सा करतानाही अनपत्यतेची काही कारणे आणि विशेषत: ‘Unexplained Infertility’ मधे या विचाराचं महत्त्व प्रत्ययास येतं.

(लेखिका आयुर्वेद आणि वंध्यत्व उपचार तज्ज्ञ आहेत. ‘द्युम्ना वुमेन्स क्लिनिक’, रसायू क्लिनिक, पुणे)
०२० २५४६५८८६,
www.dyumnawomensclinic.com


 

Web Title: infertility causes physical problems and lifestyle, risk and treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.