- डॉ. ह्र्षिकेश पै
भारतातील बर्याच महिलांमध्ये एन्डोमेट्रीऑसिस ही आरोग्य समस्या आढळते. ही समस्या गर्भधारणेच्यावेळी अडथळा निर्माण करत असल्याचं आढलून आलं आहे. 'एन्डोमेट्रीऑसिस' ची समस्या असलेली स्त्री गर्भवती होऊ शकते की नाही? हा प्रश्न आज मोठ्या प्रमाणात स्त्रीरोग तज्ज्ञांना विचारला जात आहे. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याआधी ही एन्डोमेट्रीऑसिस ही समस्या आहे तरी काय, हे समजून घ्यायला हवं.
Image: Google
एन्डोमेट्रिऑसिस म्हणजे?
मासिक पाळीच्या काळात शरीराबाहेर टाकले जाणारे गर्भाशयाचं अस्तर म्हणजे एन्डोमेट्रिअम. अशाप्रकारचं अस्तर जेव्हा अंडाशयाभोवती आढळतं, तेव्हा त्या स्थितीला एन्डोमेट्रिऑसिस म्हटलं जातं. एन्डोमेट्रिऑसिस या आरोग्य समस्येमध्ये महिलांच्या गर्भाशयातील अस्तर जे आतील बाजूनं असणं अपेक्षित असते ते त्या महिलेच्या गर्भाशयाच्या बाहेरील बाजूला असतं. प्रत्येक स्त्रीचं दर महिन्याला गर्भशयातील अस्तर वाढतं, जर स्त्रीबीज फलित झालं तर ते त्या गर्भाशयाच्या अस्तराला चिकटून तिथे गर्भधारणा होऊ शकते. तसेच जर गर्भधारणा नाही झाली तर त्या स्त्रिला मासिक पाळी येते आणि ते अस्तर त्याद्वारे बाहेर पडतं. मात्र, एन्डोमेट्रिऑसिसची समस्या असणाऱ्यांमध्ये एन्डोमेट्रीयल पेशींचं अस्तर शरीरातील एखाद्या दुसऱ्या भागात असू शकतात. अशा परिस्थितीत या पेशी अंडाशय, आतडे, गुदाशय, मूत्राशय, पेल्विक भागात किंवा ओटीपोटीच्या आतील पोकळीमध्ये असण्याची शक्यता असते. एन्डोमेट्रियम पेशींची मेदयुक्त उती तुटल्यानं, गर्भाशयात रक्तस्राव होतो. तथापि या रक्ताला बाहेर पडण्याची जागा मिळत नसल्यानं कालांतरानं त्याचं गाठीमध्ये आणि अल्सरमध्ये रूपांतर होतं. जे बाहेरील अवयवांना चिकटून बसतं.
लक्षणं काय?
एन्डोमेट्रिऑसिसचं मुख्य लक्षण म्हणजे वेदना. ज्यामध्ये ओटीपोटात तीव्र वेदना आणि पेटके यांचा समावेश आहे. वंध्यत्व देखील एन्डोमेट्रिऑसिसचं लक्षण असू शकतं.
Image: Google
एन्डोमेट्रिऑसिस आणि गर्भधारणा
एन्डोमेट्रिऑसिसमुळे गर्भधारणेत येणारा अडथळा या समस्येला अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. फेलोपियन ट्यूबमधून अंडाशयातील स्त्रीबीज गर्भाशयात प्रवास करत असतात. मात्र, फेलोपियन ट्यूबच्या अवतीभवती एन्डोमेट्रीयमचे अस्तर वाढल्यानं, स्त्रीबीज गर्भाशयात जाण्यासाठी अडथळा निर्माण होतो.
एन्डोमेट्रिऑसिस हे स्त्रीबीज आणि पुरुष शुक्राणू नष्ट करू शकतात. याचं नेमकं कारण डॉक्टर सांगू शकत नसले तरी, एन्डोमेट्रिऑसिसच्या सिध्दांतानुसार शरीरात त्यामुळे मोठ्या प्रमाणात दाह निर्माण होतो. आपल्या शरीरात उत्पन्न झालेल्या या प्रतिरोधक पेशी स्त्री बीज आणि पुरुष शुक्राणुला हानी पोहोचवतात. ज्यामुळे शुक्राणू आणि स्त्रीबीजाचं फलन होत नाही व गर्भधारणा होत नाही.
Image: Google
यावर उपाय काय?
जर एन्डोमेट्रिऑसिसमुळे गर्भधारणेस समस्या येत असेल तर आपण मुंबईत प्रजननतज्ज्ञांकडे उपचार घेऊ शकतात. एन्डोमेट्रिऑसिस समस्येची तीव्रता निश्चित करण्यासाठी डॉक्टरांची मदत घेता येते. एण्डोमेट्रिऑसिस संबंधित गर्भधारणा समस्यांच्या उपचारांमघ्ये खालील प्रक्रियांचा समावेश होतो:
1. स्त्रीबीजाचं गोठण: एन्डोमेट्रिऑसिस गर्भाशयातील राखीव भागांवर परिणाम करतो. म्हणूनच, जर नंतर एखादीला गर्भवती होण्याची इच्छा असेल तर बरेच डॉक्टर अंडी गोठवण्याची शिफारस करतात.
2. सुपरव्यूलेशन आणि इंट्रायूटरिन इनसेमिशन (एसओ-आययूआय): जर फॅलोपियन ट्यूबमध्ये सौम्य एंडोमेट्रिओसिस असेल आणि आपल्या जोडीदाराकडे दर्जेदार शुक्राणू असतील तर एसओ-आययूआय प्रक्रिया उत्तम मार्ग आहे. या प्रक्रियेमध्ये स्त्रीला स्त्रीबीज तयार करण्यासाठी काही विशिष्ट औषधं दिली जातात. स्त्रीबीज परिपक्व झाली आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी करावी लागते. अंडे फुटण्याच्या वेळी पुरुषाचे शुक्रजंतू साफ करुन त्यातील शुक्रजंतूंची शक्ती वाढवून ते गर्भपिशवीच्या वरच्या भागात एका छोट्याशा नळीद्वारे नेऊन सोडले जातात. अशा पद्धतीनं शुक्रजंतुंना स्त्रीबीजाजवळ नेऊन सोडल्यामुळे शुक्रजंतू आणि स्त्रीबीज यांचं मिलन होऊन फलन होण्याची शक्यता बळावते.
Image: Google
3. इन विट्रो फर्टिलायझेशन (आय.व्ही.एफ) : गर्भवती होण्यासाठी आय.व्ही.एफ. सर्वोत्तम पर्याय आहे. या प्रक्रियेमध्ये स्त्रीबीज आणि पुरूष शुक्राणुंचं मिलन प्रयोगशाळेत केलं जातं. त्यांचे संयोग जुळवून आणल्यानंतर गर्भाशयाच्या आत त्याचं रोपण करतात. या प्रक्रियेमुळे गंभीर एण्डोमेट्रिऑसिस असलेल्या बर्याच महिला यशस्वीरित्या गर्भवती झाल्या आहेत. तर, मुंबईतील आपल्या आय व्ही एफ केंद्रातील तज्ञांचा सल्ला आणि उपचार घेऊन, आपल्या एण्डोमेट्रिऑसिस स्थितीची माहिती करून घ्यावी आणि शंकेच निरासन करावं
4. लॅपरोस्कोपी: गर्भाशयात एन्डोमेट्रिऑसिसमुळे वाढलेल्या एन्डोमेट्रियमच्या अवांछित पेशी लॅपरोस्कोपी शस्त्रक्रियेद्वारे काढल्या जातात. विशेष लॅपरोस्कोपिक सर्जनद्वारे एन्डोमेट्रिऑसिस शल्यक्रिया करुन काढून टाकल्यास गर्भधारणेच्या संधी वाढतात.
5. निरोगी जीवनशैली: वरील सर्व उपचार प्रक्रियेबरोबरच, गर्भधारणेची शक्यता वाढविण्यासाठी निरोगी जीवनशैली देखील आत्मसात करणं आवश्यक आहे. गर्भधारणा निरोगी आणि आपल्या गर्भाची वाढ चांगल्याप्रकारे होण्यासाठी सदृढ आणि व्याधीमुक्त जीवनशैली अबलंबवायला हवी. 1. संतुलित वजन 2. फळं, भाज्या, धान्य आणि पातळ प्रथिनयुक्त आहाराचा समावेश असावा. 3. नियमित मध्यम स्वरुपाचा व्यायाम करावा (वजन उचलणं, चालणं आणि एरोबिक्सचा सराव करावा.) भारतात एन्डोमेट्रिऑसिस असणार्या अनेक स्त्रिया आहेत, ज्यांनी निरोगी बाळांना जन्म दिला आहे. गर्भवती होण्यापूर्वी आपल्या गर्भधारणा पर्यायांवर चर्चा करणं हीच मुख्य गोष्ट आहे. जर आई होण्याचं स्वप्न असेल तर त्या स्वप्नांना पंख द्या. आपल्या फर्टिलिटी डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन, एन्डोमेट्रिऑसिसबद्दलच्या शंका दूर करा. खास करून गेली सहा महिने प्रयत्न करून देखील जर गर्भधारणा होत नसेल, तर या गोष्टींचा विचार नक्की करायला हवा.
( लेखक स्त्री रोग आणि वंध्यत्व निवारण तज्ज्ञ आहेत.)