Join us   

मूल होत नाही म्हणून फक्त ‘तिची’च तपासणी, तिचाच दोष? तपासणी 'दोघांची' केली तरच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 1:15 PM

अनपत्यतेची समस्या असताना स्त्री आणि पुरुष या दोघांशी संबंधित सल्ला आणि आवश्यक तपासण्या करून घेणं योग्य आहे. यामुळे मानसिक तणावाचं प्रमाणही कमी होवू शकतं.

ठळक मुद्दे शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरांवर वंध्यत्वाच्या कारणांचा विचार

 वैद्य विनीता बेंडाळे

जागतिक स्तरावर अनपत्यतेविषयी सुरू असलेल्या सखोल अभ्यासातून जे निष्कर्ष काढले गेले आहेत, त्यापैकी एक निष्कर्ष असा आहे की वंध्यत्वाच्या कारणांपैकी साधारण ३० टक्के  कारणे ही पुरुष वंध्यत्वाशी, ३० टक्के कारणे स्त्री वंध्यत्वाशी, ३० टक्के कारणे स्त्री आणि पुरुष दोघांशी संबंधित, तर १० टक्के कारणे ही ‘अननोन कॉजेस’ म्हणजे निर्देशित न करता येण्यासारखी असतात. या माहितीवरून असा महत्वाचा मुद्दा लक्षात घेणं आवश्यक ठरतं की अनपत्यतेची समस्या असताना स्त्री आणि पुरुष या दोघांशी संबंधित सल्ला आणि आवश्यक तपासण्या करून घेणं योग्य आहे. यामुळे दोघांपैकी कोणाही एका जोडीदाराच्या अथवा दोघांच्याही बाबतीत काही चिकित्सा योजना करणे आवश्यक असल्यास तशी योजना एकाच वेळेस करता येऊ शकते जेणेकरुन मौल्यवान वेळ तर वाचू शकतोच, पण त्याबरोबर मानसिक तणावाचं प्रमाणही कमी राहू शकतं.       वंध्यत्वाशी संबंधित आयुर्वेदामधे जे मूलभूत मार्गदर्शन आहे, त्याला अनुसरून दोन्ही जोडीदारांच निदान आणि चिकित्सा जेव्हा केली जाते. त्यावेळेस अनेकविध तपासण्यांमधून वंध्यत्वाचे कोणतेही कारण निर्देशित केले गेले नाही अशी वस्तुस्थिती असतानाही चिकित्सेला यश आल्याची उदाहरणे आहेत. दोन्ही जोडीदारांविषयी सल्ला घेण्याचं महत्व यामुळे अधोरेखित होतं. स्त्री आणि पुरुष वंध्यत्वाच्या कारणांचा विचार हा शारिरीक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरांवर करणे आवश्यकच नाही तर अनिवार्य असते. स्त्री वंध्यत्वाशी संबंधित PCOS, हार्मोन्समधील असंतुलन, पाळीची अनियमितता, तर पुरुष वंध्यत्वाशी संबंधित कारणांमधे शारीरिक संबंध येतानाच्या काही अडचणी, Semen analysis मधील काही दोष, ही कारणे उदाहरणादाखल मांडतां येतील की ज्यांचा संबंध शारिरीक आणि मानसिक, अशा दोन्ही स्तरांवर असू शकतो.

 

     

संतती प्राप्तीसाठी जे विचार आयुर्वेदामधे मांडले आहेत त्यामधे इतर महत्त्वाच्या घटकांव्यतिरिक्त ‘सौमनस्य’ म्हणजे मनाच्या प्रसन्नतेचं गर्भधारणेसाठीचं महत्वही अधोरेखित केलं आहे. खरं तर ही अतिशय स्वाभाविक अशीच बाब आहे. परंतू सद्य: स्थितीत अनपत्यतेची चिकित्सा करत असताना इतर सर्व गोष्टींबरोबर मानसिक स्वास्थ्याकडेही विशेष लक्ष देणे महत्वाचे ठरते. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे वंध्यत्वाचं निदान झाल्यानंतर त्याच्याशी संबंधित तपासण्या, सल्ला , चिकित्सा या साऱ्यामुळे मनावर मोठं दडपण निर्माण होऊ शकतं. ‘Fertility window’ म्हणजे स्त्री बीज निर्मितीच्या काळातच अप्त्यप्राप्तीसाठी संबंध येण्याचं महत्व, यामुळे अतिशय स्वाभाविक असणारी प्रक्रिया ही ‘मेकॅनिकल’ होऊ शकते. संबंध येताना पुष्कळ मानसिक ताण येतो ही कित्येक जोडप्यांची समस्या असते. सामाजिक दडपण या इनडायरेक्ट कारणामुळे मानसिक अस्वास्थ्यामधे पडणारी भर हा स्वतंत्र मुद्दा आहेच. मानसिक स्वास्थ्याचं संतती प्राप्तीसाठीचं महत्व आणि त्यावरील उपाययोजना याचं विश्लेषण आपण नंतर पाहूच. शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरांवर वंध्यत्वाच्या कारणांचा विचार करण्याचं येथे केवळ महत्व नमूद करत आहे.       स्त्री वंध्यत्वाच्या कारणांचा विचार करताना स्त्री बीज निर्मिती प्रक्रिया, स्त्री बीजाची प्रत, योनि मार्ग, गर्भाशय,  गर्भाशय नलिका- या सर्व ठिकाणी पुरुष बीजाला अनुकूल वातावरण, गर्भाशय नलिका प्राकृत असणे- त्यामधे अडथळा (Blockage) नसणे, गर्शाशयातील अंत:स्तर (Endometrium ) याची निर्मिती योग्य प्रकारे होणे, शरीरातील चयापचय क्रिया(Metaboism) प्राकृत असणे, गर्भाशय आणि संबंधित अवयवांची रचना प्राकृत असणे, स्त्रीचे वय योग्य मर्यादेमधे असणे, जीवनशैली नियंत्रित असणे यांचा प्राधान्याने समावेश केला जातो.

पुरुष वंध्यत्वाच्या कारणांमधे पुरुष बीजांची संख्या, निष्क्रमण शक्ती (Motility), पुरुष बीजांची प्राकृत रचना (Morphology), संबंध येतानाच्या विविध अडचणी, पुरुष बीज वाहून नेणाऱ्या नलिकांमधे अडथळा (blockage) असणे, पुरुष प्रजनन संस्थेमध्ये काही रचनात्मक विकृती असणे, काही संसर्ग (infections), varicocele, हार्मोन्समधील असंतूलन, काही विशिष्ट आजारांचा पूर्व इतिहास असणे, सद्य: स्थितीतील चयापचय प्रक्रिया (Metabolism), जीवनशैली या सगळ्याचा विशेषत्वाने विचार केला जातो. वंध्यत्वाशी संबंधित महत्वाच्या कारणांचे अधिक विश्लेषण आणि आयुर्वेद शास्त्राचा चिकित्सेचा दृष्टिकोन पुढील लेखांमधे आपण पाहू.

(लेखिका आयुर्वेद आणि वंध्यत्व उपचार तज्ज्ञ आहेत. ‘द्युम्ना वुमेन्स क्लिनिक’, रसायू क्लिनिक, पुणे) ०२० २५४६५८८६, www.dyumnawomensclinic.com

टॅग्स : आरोग्य