डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी
‘डॉक्टर,माझे रिपोर्ट्स आलेत सगळे. सोनोग्राफी नंतर तुम्ही एएमएचची लेव्हल कमी असण्याची शक्यता आहे असं म्हणाला होतात, तसाच रिपोर्ट आलाय. मला खूप टेन्शन आलंय, मी आई होऊ शकेन ना?’‘भारतीय स्त्रियांमध्ये पाळी खूप लवकर थांबतेय आणि त्यामुळे वंध्यत्वाच्या केसेस वाढत आहेत "अशी बातमी सुद्धा रियाने कुठेतरी वाचली होती. त्यामुळे तिच्या चिंतेत भर पडली होती. खरंतर ही बातमी हे अर्धसत्य आहे. भारतीय स्त्रियांमध्ये पाळी लवकर थांबण्याचे प्रमाण थोडे जास्त आहे पण त्यामुळे वंध्यत्व वाढते आहे हे पूर्ण खरे नाही. आपण ही समस्या नीट समजावून घेऊया (Problem Of Infertility).
रियाचे वय ३३ वर्षे. सध्याच्या ट्रेण्डप्रमाणे रियाचं लग्न २९ व्या वर्षी झालं पण त्यांची पालक होण्याची मानसिक तयारी नव्हती म्हणून अजून एक दोन वर्ष गेली. मग कोणताही योग्य वैद्यकीय सल्ला व तपासण्या न करता ते प्रेगनन्सी साठी प्रयत्न करत राहिले त्यात अजून दीड वर्ष वाया गेलं. पण गर्भधारणा होतच नाहीये म्हंटल्यावर आता दोघंही थोडीशी धास्तावली होती.
AMH लेव्हल कमी झालीय म्हणजे नक्की काय झालंय?
स्त्रीच्या जननक्षमतेसाठी अंडाशय म्हणजे ओवरीत पुरेशी स्त्रीबीजे असणे अत्यावश्यक आहे. मुलगी जन्माला आल्यापासून पाळी सुरू होइपर्यंत या अविकसित स्त्रीबीजांची संख्या भरपूर असते. नंतर मात्र ही संख्या कमी होण्यास सुरुवात होते. साधारणपणे स्त्रीची पाळी थांबेपर्यंत ओव्हरीत असलेली स्त्रीबीजे तिला पुरतात पण काही स्त्रियांमध्ये ही स्त्रीबीजांची संख्या खूप झपाट्याने कमी होते. त्यामुळे जननक्षमता उतरणीला लागते. भारतीय स्त्रियांमध्ये ही जननक्षमता वयाच्या तीस वर्षांपासून कमी होऊ लागते आणि पस्तिशीनंतर वेगाने घसरणीला लागते. Serum AMH ही तपासणी आपल्याला स्त्रीच्या जननक्षमतेची नेमकी कल्पना देते. AMH म्हणजे antimullerian hormone. हा हॉर्मोन स्त्रीबीजांची संख्या चांगली राहावी म्हणून धडपडत असतो. त्यामुळे त्याचे प्रमाण कमी झाले की स्त्रीबीजे वेगाने कमी होतात. त्यामुळे AMH चे प्रमाण योग्य असणे हे स्त्रीच्या जननक्षमतेसाठी अत्यंत आवश्यक आहे.
कमी झालेल्या AMH लेव्हलमुळे गर्भधारणा अवघड होते तसेच वारंवार गर्भपात होण्याचे प्रमाण वाढते. पाळी बंद होण्याआधी जवळपास तेरा ते चौदा वर्षं AMH कमी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे तिशीच्या आसपास स्त्रियांनी गर्भधारणेचा निर्णय घेणे सयुक्तिक ठरते. यामध्ये काही प्रमाणात जनुकीय कारणे ही असू शकतात. AMH लेवल कमी झालेल्या स्त्रियांची पाळी इतर स्त्रियांच्या मानाने लवकर थांबते. AMH ची लेव्हल एका प्रमाणाबाहेर खाली गेली तर आयव्हीएफ तंत्रज्ञान वापरून देखील गर्भधारणा अवघड होऊन बसते कारण पुरेशी स्त्रीबीजेच मिळू शकत नाहीत. अश्यावेळी दुसऱ्या स्त्रीची स्त्रीबीजे आणि नवऱ्याचे शुक्राणू वापरून गर्भ तयार करता येतो आणि गर्भधारणा हवी असलेल्या स्त्रीच्या गर्भाशयात तो रुजण्यासाठी सोडला जातो. यामध्ये बाळ स्त्रीच्या पोटातच तिचं म्हणूनच वाढणार असतं. तरीही जनुकीय पालकत्व हवे असल्यामुळे खूप स्त्रिया हा उपाय नाकारतात. खरंतर तिच्या शरीरातल्या रक्तामासावर वाढलेलं हे बाळ सर्वार्थाने तिचंच असतं हे समजून घेतलं तर बऱ्याच स्त्रियांची मानसिक व्यथा कमी होईल.
AMH लेव्हल वाढवण्यासाठी काही औषधे व उपाय उपलब्ध आहेत. हल्ली आव्हीएफ तंत्रज्ञानामध्ये AMH कमी असलेल्या स्त्रियांच्या ओवरीतूनही जास्तीत जास्त स्त्रीबीजे मिळवण्यासाठी काही नवीन संशोधन आणि उपाय उपलब्ध आहेत. त्याचाही वापर करता येऊ शकतो. या सगळ्या माहितीचा उपयोग करून तरुण मुली आणि जोडपी काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. आजकाल लग्न उशिरा होताहेत. तरुण जोडप्यांची लगेच मूल होऊ देण्याची इच्छा नसते. पण अती उशीर हानिकारक ठरू शकतो. वय तीस पूर्ण होण्याच्या आत गर्भधारणा प्लॅन करणे उत्तम पण काही कारणाने ते शक्य नसेल तर मग निदान AMH ही तपासणी करून जननक्षमतेचा अंदाज घेणे संयुक्तिक आहे. मात्र गर्भधारणेच्या बाबतीत स्त्रीचे वय हा सर्वात महत्वाचा आणि मोठा घटक आहे ही गोष्ट लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच वजन नियंत्रणात ठेवणे, सिगारेट, दारू,तंबाखू अशी व्यसने टाळणे, योग्य आहार या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे अत्यावश्यक असते.
पालकत्व स्वीकारण्यासाठी ही परिपक्वता हवीच नाही का?
रीयाची AMH लेव्हल कमी असली तरी खूप खाली गेलेली नव्हती. आम्ही उपचार सुरू केल्यावर चार महिन्यांतच तिला बाळाची चाहूल लागली. योग्य वेळी योग्य उपचार हे फार महत्त्वाचे ठरतात.शेवटी एक महत्वाची गोष्ट. गर्भधारणा वेळेवर होणे हे महत्त्वाचे आहेच पण एक कोवळा जीव या जगात आणण्याधी पतीपत्नींचे नाते परिपक्व आहे ना आणि भोवतालची परिस्थिती अनुकूल आहे ना हे तपासून बघणे या गोष्टींना पर्याय नाही बरं का! नाहीतर एकमेकांशी पटत नसलेल्या जोडप्यांना एक मूल होऊन जाऊदे असा भीषण बुरसटलेला सल्ला देणारे कमी नाहीत आपल्या समाजात. पटतंय का तुम्हाला?
(लेखिका स्त्रीरोग व वंध्यत्वतज्ज्ञ आहेत.)
shilpachitnisjoshi@gmail.com