सायली जोशी - पटवर्धन
अभिनेत्री सनी लिओनी नेहमी वेगवेगळ्या गोष्टींवरुन चर्चेत असते. नुकताच एका मुलाखतीत तिने आपल्या सरोगसीबद्दलचा अनुभव शेअर केला. मूल होण्यासाठी आपण सरोगसी करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर या प्रक्रियेला खूप वेळ लागत असल्याने तिने व तिचा पती डॅनियलने एक मुलगी दत्तक घेतली. सरोगसीच्या प्रक्रियेला खूप वेळ लागत असल्याने आपण कंटाळलो होतो. त्याचवेळी एका अनाथाश्रमाला भेट दिल्यावर मूल दत्तक घेण्याचा आम्ही विचार केला आणि प्रक्रिया सुरू केली.
सनी म्हणाली अमेरिकेत तुमच्या बाळाचे लिंग तुम्हाला उघडपणे सांगितले जाते. सरोगसीसाठी आमच्याकडे एकूण ६ एग होती, त्यातील ४ मुलींची आणि २ मुलांची होती. पण ही चारही मुलींची एग आम्ही वाचवू शकलो नाही. त्यातून बाळाचा जन्म होणे अशक्य होते. त्यामुळे मी पूर्णपणे खचले होते. त्यातच या प्रक्रियेला वेळ लागत असल्याने आम्ही मुलगी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. पण त्याच दरम्यान दोन मुलांचा सरोगसीच्या माध्यमातून जन्म झाल्याचे आपल्याला समजले असे सनीने सांगितले. ही सगळी प्रक्रिया नेमकी काय असते याविषयी Pune Obstetric and Gynecological Society च्या अध्यक्ष आणि Indian Society of Assisted Reproduction च्या उपाध्यक्ष प्रसिद्ध आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. सुनिता तांदूळवाडकर यांनी माहिती दिली.
एग फ्रिजिंग म्हणजे काय?
आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करुन एग फ्रिजिंग आणि एम्ब्रियो फ्रिजिंग या दोन्ही प्रक्रिया केल्या जातात. मुलगी वयात येते म्हणजेच तिची पाळी सुरू होते तेव्हापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत एक स्त्री महिन्याला एका अंड्याची निर्मिती करते. प्रत्यक्षात एकावेळी १५ ते २० अंडी तयार होतात. पण त्यातील एकच अंडे पूर्णपणे तयार होते. सध्या लवकर लग्न न करणे, करीयर किंवा इतर काही कारणांनी मूल उशीरा होऊ देणे यासाठी स्त्रिया आपली अंडी फ्रिज करुन ठेवण्याचा पर्याय स्विकारतात. वय वाढतं तशी चांगल्या दर्जाचे अंडे तयार करण्याची शरीराची क्षमता कमी होत जाते. त्यामुळे सध्या अनेक महिला वयाच्या तिशीत एग फ्रिजिंगचा पर्याय स्वीकारताना दिसतात. याशिवाय ज्यांना कर्करोगासारखे दुर्धर आजार झाले आहेत आणि केमोथेरपी किंवा रेडिएशनशी त्यांचा संपर्क येणार आहे अशा स्त्रियाही अंडे फ्रिजिंगला प्राधान्य देतात. कारण केमोथेरपीमुळे अंड्यांचा नाश होऊ शकतो. आपण फ्रिज केलेल्या एकूण अंड्यांपैकी २० ते ६० टक्के अंडी हेल्दी नसतात.
एग फ्रिजिंग कसे केले जाते
स्त्रीच्या शरीरात तयार होणाऱ्या १० ते १५ अंड्यांपैकी केवळ एक अंडे पुढे येऊन उपयोगात येते. पण सगळी अंडी वाचवण्याचा प्रयत्न एग फ्रिजिंगमध्ये केला जातो. यामध्ये बाहेरुन काही इंजेक्शन देऊन ही अंडी वाचवली जातात. ८ ते १० दिवस रोज इंजेक्शन देऊन ही प्रक्रिया करता येते. ५ इंजेक्शननंतर सोनोग्राफीच्या माध्यमातून किती अंडी कार्यरत आहेत याचा अंदाज घेतला जातो. या अंड्यांचा आकारही योग्य प्रमाणात असणे आवश्यक असते. अंडी परिपक्व झाल्याचे सोनोग्राफीतून समजल्यानंतर आणखी एक स्पेशल इंजेक्शन दिले जाते आणि त्यानंतर ३५ तासांनी सगळी अंडी परिपक्व होतात. सोनोग्राफीद्वारे आतील घडामोडींचा अंदाज घेऊन लहानशी शस्त्रक्रिया करुन ही अंडी बाहेर काढून फ्रिज करावी लागतात.
एम्ब्रियो किंवा टेस्ट ट्यूब बेबी फ्रिजिंग
यामध्ये स्त्री अंडे आणि पुरुषातील स्पर्म बाहेर काढून त्यांचा संयोग घडवून आणला जातो. त्यातून निर्माण होणारा गर्भ फ्रिज करुन ठेवला जातो. एग फ्रिजिंगपेक्षा एम्ब्रियो फ्रिजिंगचा सर्व्हायवल रेट जास्त चांगला असतो.
IVF का फेल होते ?
एम्ब्रियो ट्रान्सप्लांट केले की १५ दिवसांत गर्भाशयाकडूशी ते मॅच होईल आणि त्यातून चांगला गर्भ निर्माण होईल अशी आम्हाला अपेक्षा असते. काही वेळा टेस्ट ट्यूब बेबीमध्ये अडचण असू शकते. पण अनेकदा गर्भाशय कमकुवत असल्याने, गर्भाशयाच्या पिशवीला सूज असेल, गाठी असतील, पिशवीला संसर्ग झालेला असेल अशावेळी आयव्हीएफ फेल होऊ शकते. स्त्रीबीज किंवा पुरुषाच्या स्पर्ममध्ये काही अडचण असेल तरीही गर्भ तयार होण्यात अडचणी येऊ शकतात. याबरोबरच आपण वापरत असलेली लॅबोरेटरी चांगली नसेल तरीही आयव्हीएफ फेल होऊ शकते. सध्या आयव्हीएफ करण्याबाबत कोणतीही बंधने पाळली जात नाहीत. कोणीही आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करुन गर्भधारणा करण्याची प्रक्रिया करतात, मात्र ते स्त्रीच्या आरोग्यासाठी धोक्याचे ठरु शकते. तसेच ही प्रक्रिया आर्थिकदृष्ट्याही खर्चाची असल्याने हा प्रयत्न अपयशी झाला तर शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अशा सगळ्यादृष्टीने ताण येऊ शकतो.