आपल्या शारीरिक स्वास्थ्यावर आणि एकूण जगण्यावरच शरीरातल्या हार्मोन्सचा थेट किंवा अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. त्यांच्यामुळेच मुलींना मासिक पाळी येते. हार्मोन्सचा आपल्या भावनांवर म्हणजेच मूड्सवर परिणाम होतो, आपली त्वचा, लैंगिक भावना या सगळ्यावरही हार्मोन्सचा प्रभाव असतो. शरीरातले काही हार्मोन्स आणि वंधत्व यांच्यात कनेक्शन असल्याचं काही संशोधकांचं म्हणणं आहे. स्त्रियांमध्ये शरीरातील हार्मोनल असमतोलामुळे वंध्यत्व येऊ शकतं. पण योग्य औषोधोपचार आणि लाइफस्टाइल बदल केले तर ही समस्या सोडवता येते.
म्हणूनच हार्मोनल बॅलन्स सांभाळणं अतिशय गरजेचं आहे.
पुरुषांमध्ये जर टेस्टोस्टेरॉन या हार्मोनचं प्रमाण कमी झालं तर वंधत्व येऊ शकतं. अर्थात त्याचं प्रमाण कमी असतं.
हार्मोन्स प्रजननावर कशाप्रकारे परिणाम करतात ?
एल, एफएसएच, इस्ट्रोजेन, प्रॉजेस्टेरॉन, अँड्रोजन्स यासारख्या हार्मोन्सचा स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेत थेट संबंध असतो. या हार्मोन्सच्या सिग्नल्सवर अंडाशयातील अंड्याची वाढही होते आणि दर महिन्याला ते बाहेर कधी सोडायचे हेही ठरते. त्याचप्रमाणे याच हार्मोन्सच्या सिग्नल्समुळे एन्डोमेट्रिअम पसरते आणि गर्भाचे रोपण आणि विकासासाठी आवश्यक तो स्तर तयार होतो. कुठल्याही हार्मोन्समध्ये असंतुलन झालं तर प्रजननाच्या चक्रावर त्याचा परिणाम होतो.थायरॉईड (टीएसएच, टी ३, टी ४) आणि प्रोलॅक्टिन या हार्मोन्सचाही अप्रत्यक्षपणे प्रजननाशी संबंध असतो.
हार्मोनल वंध्यत्वाची कारणे कोणती?
- पॉलिसिस्टिक ओव्हरीन सिंड्रोम (पीसीओएस) -
थायरॉईड या हार्मोनचे प्रमाण कमी अधिक होणे
- हायपरप्रोलॅक्टिनेमिया
- हायपोथॅलॅमिक ऍमेनोरिया
- अंड निर्मिती न होणे
स्त्रियांमधील हार्मोनल असंतुलनाची लक्षणं कोणती?
१) अनियमित मासिक पाळी
२) पाळीच्या दरम्यान प्रचंड रक्तस्त्राव आणि वेदना
३) चेहरा, मान छाती आणि पाठीवरील केसांमध्ये वाढ.
४) अकारण प्रचंड वजन वाढणे किंवा कमी होणे.
पुरुषांमधील हार्मोनल असंतुलनाची लक्षणं कोणती?
१) लैंगिक इच्छा कमी होणे.
२) लिंग ताठरता न येणे. (इरेक्टाईल डिसफंक्शन)
३) स्पर्म काउंट कमी असणे.
४) शरीरावरील केस कमी होणे.
डॉक्टरांची मदत केव्हा घ्यावी?
१) एक वर्षापेक्षा जास्त काळ मूल व्हावं यासाठी प्रयत्न सुरु असतील पण दिवस जात नसतील तर डॉक्टरांना भेटलंच पाहिजे.
२) डॉक्टर तुमची संपूर्ण चाचणी करतील ज्यात, हार्मोनल संतुलन तपासलं जाईल, गर्भाशयाची सोनोग्राफी केली जाईल, आणि पुरुष जोडीदाराचे सेमेन तपासणी आणि त्याचे विश्लेषण केले जाईल.
हार्मोनल असंतुलन कसे टाळावे?
हार्मोनल संतुलन ठेवण्याचे अनेक मार्ग असतात.
१) नियमित व्यायाम
२) संतुलित आहार, आहारात ओमेगा ३ चा समावेश गरजेचा आहे.
३) लाइफ स्टाइल बदल, ज्यात प्रामुख्याने साखर आणि मद्याचे प्रमाण कमी असायला हवे.
४) धूम्रपान करू नये.
५) नियमित आणि पुरेशी झोप झाली पाहिजे.
हार्मोनल वंध्यत्वावर उपचार कोणते?
१) जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल.
२) हार्मोनल बॅलन्ससाठी आवश्यक ते औषधोपचार
३) अंडाशय, अंड निर्मितीयासाठी औषोधोपचार
आपल्या शरीरातील अंत:स्त्रावी व्यवस्था प्रजननामध्ये महत्वाची भूमिका बजावत असते. ताण विरहित आणि निरोगी गर्भधारणेसाठी वेळीच उपाययोजना करणं गरजेचं असतं.
विशेष मार्गदर्शन : डॉ. गरिमा शर्मा
(FRM, M.S. OBGY, DNB OBGY)