सामान्यतः एक वर्ष कुटुंबनियोजनाचं कुठलंही साधन न वापरता लैंगिक संबंध ठेवल्यानंतरही जेव्हा गर्भधारणा होत नाही तेव्हा त्याला वंध्यत्व म्हंटलं जातं. वंध्यत्व येण्यामागच्या अनेक कारणांपैकी गर्भाशयातील गाठी हे एक कारण असतं. अनेक महिलांना गर्भाशयातील गाठींचा त्रास होतो. (Uterine fibroids are one of the several reasons that may cause infertility.)
गर्भाशयातील गाठी म्हणजे काय?
१. गर्भाशयातील गाठी या गर्भाशयाच्या स्नायूंच्या कर्करोगाच्या नसलेल्या गाठी असतात. गर्भाशयाच्या भिंतीतील एका पेशीचं विभाजन होऊन कर्करोगाच्या नसलेल्या गाठी तयार होतात. २. या गाठींमुळे गर्भाशयाचा आणि काही वेळा गर्भाशयमुखाचा आकार बदलू शकतो. सामान्यतः महिलांना एकाहून अधिक गाठी असतात, पण एकच गाठही असू शकते. ३. गर्भाशयात गाठी होण्यामागचं नेमकं कारण नीटसं माहिती नाही, पण ते अनुवांशिक, हार्मोनल आणि परिस्थितीजन्य कारणं मिळून होत असावेत असे काही पुरावे आहेत. ४. काही वेळा या गाठींमुळे काहीही त्रास होतही नाही. या गाठींमुळे काही त्रास होतो होतो का आणि त्यावर काही उपचार करणं गरजेचं आहे का हे त्या गाठींची जागा, आकार, संख्या आणि पुनरुत्पादनाच्या नियोजनावर अवलंबून असतं. ५. गर्भाशयातील गाठी सामान्यतः गर्भाशयाच्या आत आजूबाजूला आढळतात, मात्र काही वेळा त्या गर्भाशयमुखातही आढळू शकतात. या गाठी कुठे आहेत यावरून त्यांचे तीन प्रकार आहेत. सबसेरोसल म्हणजे गर्भाशयाच्या बाहेरील भिंतीत (५५%) इंट्राम्युरल म्हणजे गर्भाशयाच्या आतील अस्तरात (४०%) सबम्युकोसल म्हणजे गर्भाशयाच्या आतील पोकळीत येणारे (५%) या गाठी गर्भाशयाला किंवा आजूबाजूच्या लिगामेंट्स किंवा मूत्राशय अथवा आतड्यांसारख्या अवयवांना एका देठाने जोडलेल्या असू शकतात. या गाठी कमरेच्या पोकळीच्या बाहेर क्वचितच आढळून येतात.
(Image : Google)
गाठींचा पुनरुत्पादन क्षमतेवर होणारा परिणाम
साधारणतः ५% - १०% स्त्रियांना गर्भाशयातील गाठी असतात. या गाठींचा आकार आणि त्या कुठे आहेत यावर त्या प्रजननावर काही परिणाम करतील का हे अवलंबून असतं. गर्भाशयाच्या आतील किंवा गर्भाशयाच्या अस्तरातील गाठींमुळे प्रजननावर परिणाम होऊ शकतो.
गर्भाशयातील गाठींमुळे वंध्यत्व कसं येतं?
गर्भाशयातील गाठींमुळे अनेक प्रकारे वंध्यत्व येऊ शकतं. १. गर्भाशयमुखाचा आकार बदलल्यामुळे गर्भाशयात शिरू शकणाऱ्या शुक्राणूंच्या संख्येवर परिणाम होतो. २. गर्भाशयाचा आकार बदलल्यामुळे शुक्राणू किंवा बीजांडाच्या हालचालींवर परिणाम होतो. ३. गाठींमुळे बीजांडनलिका बंद होऊन जाऊ शकतात. ४. गाठींमुळे गर्भाशयाच्या अस्तराच्या जाडीवर परिणाम होऊ शकतो. ५. गर्भाशयाला होणारा रक्तपुरवठा कमी होऊ शकतो. त्यामुळे भ्रूणाची गर्भाशयाच्या भिंतीला चिकटण्याची क्षमता किंवा वाढ कमी होते.
(Image : Google)
उपचार
गर्भाशयात गाठी असणाऱ्या बहुतेक स्त्रियांना वंध्यत्व नसतं. काही वेळा गाठींपेक्षा त्याच्यावर केल्या जाणाऱ्या उपचारांमुळेच वंध्यत्व येतं. त्यामुळे गर्भाशयातील गाठींवर उपचार करण्यापूर्वी ती महिला आणि तिच्या जोडीदाराची वंध्यत्वाच्या इतर कारणांसाठी संपूर्ण तपासणी केली पाहिजे. जर का उपचारांची गरज असेल, तर खालील पर्याय असू शकतात : १. मायोमेक्टॉमी :ही गाठी काढून टाकण्याची शस्त्रक्रिया असते. यामुळे सिझेरियन डिलिव्हरीची शक्यता वाढते आणि गर्भधारणेसाठी वाट पाहायला लागू शकते. यामुळे पुनरुत्पादन करणाऱ्या अवयवांना इजा होऊन भविष्यातील गर्भधारणेस अडथळा येऊ शकतो. २. हार्मोनल गर्भनिरोधक गोळ्या : यामुळे लक्षणांची तीव्रता कमी होते. मात्र या गोळ्या घेत असतांना गर्भधारणा होऊ शकत नाही. ३. गर्भाशयातील संतितप्रतिबंधक साधनं : ही साधनं बसवलेली असतांना गर्भधारणा होऊ शकत नाही, मात्र या साधनांमुळे लक्षणं काही प्रमाणात कमी होऊ शकतात. ४. मायोलयसिस आणि रेडिफ्रीक्वेन्सी अबलेशन : ही नवीन दुर्बिणीद्वारे करण्याची शस्त्रक्रिया आहे ज्यात गाठींना होणार रक्तपुरवठा खंडित केला जातो. यात रेडिओफ्रिक्वेंसी व्हॉल्युमेट्रिक थर्मल अबलेशन, लेसर, बायपोलर नीडल्स, क्रायोमायोलायसिस आणि एम आर आय च्या मदतीने केलं जाणारं लेझर अबलेशन केलं जातं. लहान आकाराच्या गाठींना याचा उपयोग होतो. ५. गाठींमुळे होणाऱ्या अतिरिक्त रक्तस्रावासाठी केल्या जाणाऱ्या एन्डोमेट्रिअल अबलेशन किंवा युटेराइन आर्टरी एम्बोलायझेशन या गाठी कमी करणाऱ्या उपचारांमुळे स्त्रियांमधील गर्भधारणेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. प्रत्येक उपचारात काही धोके आणि गुंतागुंती असतात, त्यामुळे तुमच्याजवळच्या पर्यायांबद्दल तुमच्या डॉक्टरशी बोला.
निष्कर्ष :
गर्भाशयातील गाठींवरील उपचार हे त्या त्या रुग्णावर अवलंबून असतात. तुम्ही गाठींवर कधी उपचार घ्यायचे हे तुमच्या लक्षणांवर, तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यावर आणि तुमच्या मुलं होऊ देण्याच्या प्लॅनिंगवर अवलंबून असतं.
तज्ज्ञ मार्गदर्शन : डॉ. उमा पांडे (Professor - Dept of Obs & Gynae)