Lokmat Sakhi >Health >Infertility > मूल हवंय, उपचारही सुरु आहेत, पण यश येत नाही; वंध्यत्वाची नेमकी कारणं काय?

मूल हवंय, उपचारही सुरु आहेत, पण यश येत नाही; वंध्यत्वाची नेमकी कारणं काय?

वंध्यत्व, अनपत्यता या समस्या मोठ्या हाेताना दिसतात आणि उपचार करुनही अनेकांना अपत्यप्राप्तीत यश येत नाही, हे सारं का होतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 01:53 PM2021-05-26T13:53:25+5:302021-05-26T13:56:39+5:30

वंध्यत्व, अनपत्यता या समस्या मोठ्या हाेताना दिसतात आणि उपचार करुनही अनेकांना अपत्यप्राप्तीत यश येत नाही, हे सारं का होतं?

What exactly causes infertility in males & females? | मूल हवंय, उपचारही सुरु आहेत, पण यश येत नाही; वंध्यत्वाची नेमकी कारणं काय?

मूल हवंय, उपचारही सुरु आहेत, पण यश येत नाही; वंध्यत्वाची नेमकी कारणं काय?

Highlights मनुष्य हा निसर्गाचाच अविभाज्य घटक आहे आणि या गोष्टीचा विसर पडल्यामुळे ज्या विविध समस्यांना  सामोरे जावे लागत आहे त्यापैकी अनपत्यता ही एक होय.

वैद्य विनीता बेंडाळे

‘अनपत्यता’ किंवा ‘वंध्यत्व’ याच्या वाढत्या प्रमाणामुळे भारतात आणि जागतिक स्तरावरवरही मोठे आव्हान निर्माण झाले आहे.मूल होण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असतानाही दिवस रहात नाहीत यास अनपत्यता असे संबोधले जात असले, तरी किती काळ प्रयत्न केल्यानंतर यश न आल्यास अनपत्यता आहे असे म्हणता येऊ शकेल असा प्रश्न स्वाभाविकपणे निर्माण होऊ शकतो. एक वर्षभर दर महिन्याला ‘ योग्य काळामधे’ प्रयत्न करूनही गर्भधारणा होऊ शकली नाही, तर अनपत्यता आहे असे निदान करता येते. अनपत्यतेची कारणे, निदानासाठी केल्या जाणाऱ्या विविध तपासण्या, चिकित्सेचे निरनिराळे पर्याय या सगळ्या गोष्टी संबोधित करण्यापूर्वी, मुळात स्वाभाविकपणे गर्भधारणा हेण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याचा विचार करणे महत्वाचे ठरेल.
नैसर्गिक रित्या गर्भधारणा होताना योनिमार्गातून पुरुष बीजाचा ( sperm) प्रवेश होऊन गर्भाशयनलिकेमधील स्त्री बीजाशी (Ovum) त्याचा संयोग झाल्यानंतर गर्भनिर्मिती होते. त्यानंतर साधारणपणे आठवडाभराच्या काळामधे, हा तयार झालेला गर्भ (Zygote) गर्भाशय नलिकेमधून प्रवास करून गर्भाशयामधे पोहोचतो आणि त्याच्या पोषणासाठी तयार असलेल्या गर्भशय्येमधे (Endometrium) हा गर्भ रुजतो. इथून पुढे या गर्भाची मासानुमासिक वाढ होत जाते आणि गर्भधारणेचा काळ पूर्ण झाल्यानंतर बाळाचा जन्म होतो.
हीच प्रक्रिया आयुर्वेदामधे एका सामान्य, परंतु अत्यंत व्यावहारिक उदाहरणाच्या मदतीने स्पष्ट केली आहे.
शेतकरी ज्यावेळेस एखादे धान्य पिकवतो त्यावेळेस त्याला निरनिराळ्या गोष्टींचा साकल्याने विचार करून योजना करावी लागते. अगदी आपल्या घराच्या गच्चीमधे कुंडीमधे एखादं बी पेरलं, तरी त्यापासून अंकुर उगवण्यासाठी काही गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागतं. एक महत्वाची गोष्ट म्हणजे ‘बी’ . अंकुर निर्मिती होण्यासाठी बीज सकस असणे ही अनिवार्य गोष्ट आहे. बीज निकृष्ट दर्जाचं असेल, काही रोग लागलेलं असेल, तर त्यापासून अंकुर निर्मिती होऊ शकत नाही. बीज अत्यंत उच्च दर्जाचे असेल, परंतु ज्यामधे ते रुजणं अपेक्षित आहे त्या जमिनीची मशागत व्यवस्थित केलेली नसेल, तरीही ते बीज रुजण्यामधे अडचण येऊ शकते.
बीजाची प्रत उत्तम आहे, जमिनीची मशागत अगदी काळजीपूर्वक केली आहे, पण बीजापासून अंकुर निर्मितीसाठीचा जो एक मुख्य आधार ‘ पाणी’ , हे पाणीच मिळाले नाही, किंवा योग्य प्रमाणात मिळाले नाही, तरीही अंकुर निर्मिती होऊ शकत नाही.


उत्तम बीज, सकस जमीन आणि योग्य प्रमाणात पाणी, सगळं असेल, पण जर ते ‘ बी’ पेरण्याचा ‘काळ’ योग्य नसेल तरीही अंकुर निर्मिती शक्य होत नाही.
या सगळ्याचा गर्भनिर्मितीशी काय संबंध? असा प्रश्न कदाचित निर्माण होऊ शकेल. परंतु हे अगदी चपखल उदाहरण आहे आणि अतिशय सुलभतेने समजण्यासारखेच आहे.
 गर्भधारणा होणे म्हणजे अंकुर निर्मिती होणे असे इथे गृहीत धरल्यास त्यादृष्टीने ‘बी’ म्हणजे ‘स्त्री बीज’ (Ovum) आणि ‘पुरुष बीज’ (Sperm) हे दोन्ही उत्तम दर्जाचे असणे अनिवार्य असते. Ovulation न होणे, Semen analysis या तपासणीमधे काही त्रुटी असणे, AMH levels योग्य नसणे ही या मुद्दयाशी संबंधित उदाहरणे आहेत.
सकस जमिनीची तुलना ही गर्भाशयामधील योग्य पद्धतीने तयार असणाऱ्या गर्भशय्येशी ( Endometrium) करता येते. Endometrial thickness योग्य नसल्यामुळे गर्भधारणा होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. कित्येक वेळेस IUI किंवा IVF या प्रक्रियांनाही endometrial thickness योग्य नसल्यास यश येऊ शकत नाही. येथे समजण्यासाठी केवळ गर्भशय्येचा उल्लेख केला असला, तरी आयुर्वेदाला येथे गर्भाशय आणि गर्भाशयाशी निगडीत इतर अवयवही अपेक्षित आहेत.
 ‘ पाणी’ हा असाच अत्यावश्यक घटक आहे. ही संकल्पना मनुष्य शरीरातील आहाररसाशी निगडीत आहे. आपण घेतलेल्या आहाराचे योग्य प्रकारे पचन झाल्यानंतर त्यापासून जो आहाररस तयार होतो त्यापासूनच शरीरातील प्रत्येक पेशीचे पोषण व चयापचय प्रक्रिया पूर्ण होत असते आणि त्यामुळेच शरीरातील सर्व अवयवांचे कार्य सुरळीत राहून आवश्यक घटक पदार्थांची निर्मिती होत असते. स्त्री व पुरुष प्रजनन संस्था या संपूर्ण शरीराचाच एक भाग असल्याने शरीरातील संपूर्ण चयापचय प्रक्रिया (Metabolism) प्राकृत असणे इथे आवश्यक आहे. डायबिटीस, ओबेसिटी अशाप्रकारचे विकार अनपत्यतेला कारणीभूत ठरू शकतात.
 बीज, जमीन, पाणी, याव्यतिरिक्त ज्या गोष्टीचा उल्लेख केला गेला आहे, ती आहे ‘ऋतू’ . आयुर्वेदामधे ऋतू या संज्ञेचा विचार वेगवेगळ्या प्रकारे केला गेला आहे. लेखाच्या सुरवातीस अनपत्यतेचा विचार करताना ‘ योग्य काळामधे ‘ गर्भधारणेसाठी प्रयत्न करणे असा उल्लेख आला आहे. २८-३० दिवसांची नियमित मासिक पाळी असल्यास साधारणपणे १२व्या ते १४ व्या दिवशी स्त्री बीजकोशामधून बीजनिर्मिती होत असते. त्या सुमारास गर्भाशयनलिकेमधे पुरुष बीजाचा प्रवेश झाल्यासंच गर्भनिर्मिती होऊ शकते. याव्यतिरिक्त ऋतू किंवा काळ याचा वेगवेगळ्या पद्धतीने जो विचार केला गेला आहे, त्यामधे ‘ वय’ हा मुद्दा फार महत्वाचा आहे.

ऋतू , क्षेत्र, अंबू, बीज या चार घटकांच्या मदतीने गर्भधारणेचा विचार आयुर्वेदामधे केला आहे. वरकरणी दिसताना हे घटक जरी चारंच दिसले , तरी व्यवहारामधे आढळून येणारी निरनिराळी कारणे- स्त्री बीज निर्मिती न होणे (Anovulation) , PCOS, Fallopian tube blockages, Hormonal imbalance, Thyroid dysfunction आणि इतरही अनेक गोष्टी ज्या वंध्यत्वाशी निगडीत आहेत- त्यांचा अंतर्भाव या चार घटकांमधे होतो आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे, त्यादृष्टीने निदान आणि चिकित्सा योजना केल्यावर त्याचे योग्य फळही मिळताना दिसते.
या सर्व माहितीमधे एक मुद्दा आवर्जून लक्षात घेण्यासारखा आहे, तो म्हणजे निसर्गातील अगदी दैनंदिन जीवनातील उदाहरणावरून गर्भधारणेची प्रक्रिया आयुर्वेदामधे समजावली आहे. मनुष्य हा निसर्गाचाच अविभाज्य घटक आहे आणि या गोष्टीचा विसर पडल्यामुळे ज्या विविध समस्यांना  सामोरे जावे लागत आहे त्यापैकी अनपत्यता ही एक होय.
                                   
(लेखिका आयुर्वेद आणि वंध्यत्व उपचार तज्ज्ञ आहेत. ‘द्युम्ना वुमेन्स क्लिनिक’, रसायू क्लिनिक, पुणे)
०२० २५४६५८८६,
www.dyumnawomensclinic.com

Web Title: What exactly causes infertility in males & females?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य