डॉ. हृषिकेश पै
आयव्हीएफ (इन-विट्रो फर्टिलायझेशन, IVF ) ज्याला सर्रास टेस्ट ट्यूब बेबी म्हंटलं जातं ही एक प्रभावी प्रक्रिया असून, त्यामुळे देशभरातील अनेक जोडप्यांना गर्भधारणा होण्यास मदत झाली आहे. मात्र तरीही पुष्कळ जोडप्यांना आय.व्ही.एफ. प्रक्रिया अयशस्वी झाली तर पुढे काय ही भीती सतावत असते. आयव्हीएफ केलं की गर्भ राहीलच याची गॅरंटी त्यांना हवी असते त्यामुळे काहीवेळा गोंधळ देखील उडतो. खरे तर, कोणत्याही वैद्यकीय प्रक्रियेची डॉक्टर गॅरंटी देत नाहीत. आय.व्ही.एफ.चा निकाल विविध घटकांवर अवलंबून असतो. मात्र त्यात अपयश आलं की जोडप्यांना निराशा येणं साहजिकच आहे. खर्चिक प्रक्रिया असल्याने आणि त्यांना बाळाची आस असल्याने आयव्हीएफ उपचार त्यातली अनिश्चितता आणि अपयश हे माहिती करुन घेणंही गरजेचं आहे.
आयव्हीएफ अयशस्वी होण्याची कारणे
१. बीज फलन - परिपक्व झालेलं स्त्रीबीज गर्भाशयात फलन करतेवेळी, त्याची पेरणी अपयशी झाल्याने गर्भधारणा होत नाही.
२. प्रजननासाठी पोषक गर्भाशय नसणे- आयव्हीएफ चाचणी दरम्यान, डॉक्टरांना गर्भधारणेसाठी अनुकूल असा गर्भाशय सापडला नाही, तर, ही प्रक्रिया तिथेच रद्द होऊ शकते.
३. गर्भरोपणासाठी अपरिपक्व स्त्रीबीज- अपरिपक्व स्त्रीबीज किंवा पुरूष शुक्राणूंच्या कमतरतेमुळे गर्भाशयात स्त्रीबीजाचे रोपण होऊ शकत नाही.
४. सुपीक बीजांड नसणे- गर्भ विकसित होण्यासाठी बीजांड उच्च प्रतीची असणे आवश्यक आहे. निरोगी गर्भधारणेसाठी प्रजननक्षम स्त्री बीजच जर मिळाले नाहीत, तर गर्भधारण शक्य होत नाही.
५. फॉलीकल्सची अपुरी संख्या- स्त्रीबीजांची संख्या अपुरी असल्यास आयव्हीएफ चालू ठेवू शकत नाही. अंडाशयातील स्त्रीबीजाच्या संख्येत वाढ होण्यासाठी वेगळ्या प्रक्रियेची आवश्यकता लागते.
आय.व्ही.एफ.च्या अपयशाला कसे सामोरे जाल?
१. आय.व्ही.एफ. ट्रीटमेंट अपयशी झाल्यामुळे दु:खी होऊ नका, ही वैद्यकीय प्रक्रीया असून, त्याला सामोरे जा. अपयश येण्याचे नेमके कारण जर कळाले, तर लवकर तुम्ही या समस्येतून बाहेर येऊ शकता.
२. एकच एक विचार करु नका, बोला. संवाद साधा. निराश न होता, सकारात्मक विचार करा.
३. आय व्ही.एफ चाचणी अपयशी ठरलेल्या ब-याच महिला आपल्या अवतीभवती आहेत, त्या या गोष्टीला कशा सामोऱ्या गेल्या, याबद्दल त्यांचे विचार जाणून घ्या. ऑनलाइन किंवा समोरासमोर भेटून त्यांच्याशी हितगुज साधल्याने आपल्या भावना आणि विचार व्यक्त करण्यात मदत होईल.
४. सेल्फ हिलींगचा सराव करा. आय.व्ही.एफ दरम्यान शरीर बऱ्याच बदलांमधून गेलेले असते, त्यामुळे आता ते पुर्ववत स्थितीत येणे गरजेचे असते. आय.व्ही.एफ. प्रक्रियेनंतर मासिक पाळी येण्यास काही दिवस लागू शकतात. मासिक पाळी स्वतःहून पुर्ववत होणे आवश्यक आहे. नियोजित मासिक पाळी आपले शरीर सुस्थितीत आहे, हे सुचित करते. एक्युप्रेशर किंवा इतर विश्रांती तंत्रांचा वापर करून आपले मन आणि शरीर स्वस्थ ठेवा.
५. गर्भधारण आणि प्रजनन संदर्भातील विविध लेख आणि तज्ज्ञांचे ब्लॉग्स वाचा. आय. व्ही. एफ. प्रक्रीयेबद्दल सखोल जाणून घेण्यासाठी बाजारात तसेच नेटवर हजारो पुस्तके आणि साईट्स उपलब्ध आहेत, त्यांचा अभ्यास करा.
६. अपयशासाठी स्वत: ला जबाबदार धरणे पहिले थांबवा. गर्भधारणा होत नसल्याचा संपूर्ण दोष स्वतः वर घेऊ नका.
एकदा अपयश आलं तर पुन्हा आयव्हीएफ प्रक्रिया करावी का?
पहिल्या आय.व्ही.एफ.अपयशानंतर तात्काळ दुसऱ्यांदा प्रयत्न करता येत नाही. शरीराला थोडी विश्रांतीची गरज असते. यादरम्यान, आपल्या डॉक्टरांशी तपासणीचे वेळापत्रक तयार करा. आपले शरीर पहिल्यासारखे सामान्य झाल्यावर पुन्हा प्रयत्न करता येतील. दुसऱ्यांदा आय.व्ही.एफ. ला जाताना मनात कोणताच पुर्वग्रह ठेवू नका. तुम्ही जितके सामाजिक आणि मानसिक स्थितीत चांगले असाल तितके उत्तम! उमेद कायम ठेवा.
(लेखक स्त्रीरोगतज्ज्ञ आणि वंध्यत्व विशेषज्ञ आहेत.)