वंध्यत्व येण्यामागे पीसीओएस म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हरीन सिंड्रोम हे अनेकदा कारण असू शकतं. प्रत्येक दहामधल्या एका स्त्रीला पीसीओएस होतो. पीसीओएस कधी होईल याला काही विशिष्ट वय नाही. प्रजननाची क्षमता असलेल्या वयातल्या कुठल्याही स्त्रीला पीसीओएस होऊ शकतो. पण ज्यावेळी मूल जन्माला घालण्याचा निर्णय जोडप्यांमध्ये होतो आणि त्यासाठी प्रयत्न सुरु होतात तेव्हा पीसीओएस असल्याचं बऱ्याचदा लक्षात येतं. कारण त्याचवेळी मूल व्हावं यासाठीचे प्रयत्न, डॉक्टरांच्या फेऱ्या या गोष्टी सुरु असतात. पीसीओएसमध्ये हार्मोनल बॅलन्स गेल्यामुळे अंडकोषात अंडी तयार होत नाहीत अंडी झालीच तरी ती अंडकोषातच राहतात. बाहेर पडत नाहीत. त्यामुळे अंडकोषात गाठी तयार होतात. आणि गर्भधारणेमध्ये अडथळे येतात.
पीसीओएसची कारणं काय? पीसीओएस नक्की कशामुळे होतो हे कारण अजूनही पुरेसं स्पष्ट नाहीये. बहुतांशी वेळा, शरीरातले पुरुषी हार्मोन्स वाढल्यामुळे ही समस्या उद्भवू शकते. अँड्रोजेन हे पुरुषी हार्मोन स्त्रीच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर तयार होतं. याचा परिणाम अंडकोषावर आणि गर्भधारणेवर होतो. याच कारणामुळे अनेकदा दर महिन्याला अंड निर्मितीही होत नाही. काहीवेळा पीसीओएसमुळे शरीरात वाढणाऱ्या इन्सुलिनवर ताबा ठेवता येत नाही. रक्तातील इन्सुलिन लेव्हल वाढली कि त्याचा प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. ज्यामुळे वजन वाढतं आणि पीसीओएसची लक्षणंही वाढतात.
पीसीओएसची लक्षणं कोणती? १) पाळीतील अनियमितता : मासिक पाळीच्या चक्रात अनियमितता येते. दर महिन्याला पाळी न येता वर्षातून १२ ऐवजी ८ पेक्षाही कमी वेळा पाळी येते. किंवा २१ दिवसांआधीच पाळी यायला लागते. २) गर्भधारणेत अडचणी ३) चेहरा, छाती आणि ओटीपोटावरील केसांमध्ये वाढ ४) अंगदुखी ५) शरीरावर विशेषतः चेहरा आणि मानेवर प्रचंड वांग येणे. ६) मान आणि काखेतील स्नायू जाड होणं. ७) केस गळणे. पुरुषांसारखं टक्कल पडणं. ८) स्थूलता
पीसीओएस असताना गर्भधारणा होऊ शकते का? पीसीओएसमध्ये गर्भधारणा होऊ शकते. गर्भधारणा यशस्वी होण्यासाठी मासिक पाळीच्या चक्राचा नीट अभ्यास केला गेला पाहिजे. पीसीओएस आवश्यक आणि योग्य त्या उपचारांसाठी तुमच्या डॉक्टरांशी बोला. सल्ला घ्या. डॉक्टर तुमच्या शरीरातल्या हार्मोन लेव्हल्स रक्त तपासणीमधून तपासतील, शारीरिक तपासणी आणि सोनोग्राफी केल्यानंतर तुमचं ओव्यूलेशन औषोधोपचारानं नियंत्रणात आणलं जाईल. जर औषधांचा अपेक्षित परिणाम झाला नाही तर मात्र कृत्रिम गर्भधारणेच्या (इन विट्रो फर्टीलायझेशन) पर्यायाचा विचार केला पाहिजे. काहीवेळा वजन आटोक्यात ठेवलं तर शरीराचा हार्मोनल बॅलन्स पुन्हा एकदा तयार होतो आणि ओव्यूलेशन प्रक्रिया सहज होऊ शकते. पण त्यासाठी समतोल आहार, व्यायाम आणि ताण कमीत कमी येऊ देणं गरजेचं आहे. तुमची जीवनशैली जर चांगली असेल तर पीसीओएसचा प्रश्न सोडवता येऊ शकतो.
विशेष आभार: डॉ. गरिमा शर्मा (FRM, M.S. OBGY, DNB OBGY)