चहा म्हटलं की, अनेकांचा जीव की प्राण. सकाळी सकाळी चहा मिळाला नाही तर दिवस उगवल्यासारखं वाटतंच नाही. अनेकांच्या दिवसाची सुरुवात सकाळच्या चहानेच होते. काहींना तर चहा घेतल्याशिवाय काम करण्याची तरतरी येत नाही, असे म्हणतात. कोरोनाकाळात रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी अनेक उपायांचा वापर लोकांकडून केला जात आहे.
सतत घरात बसून राहिल्यानं अनेकांच्या मनावर प्रचंड ताण आला आहे. या समस्यांमधून बाहेर येण्याासाठी नक्कीच चहाचं सेवन फायदेशीर ठरतं. चहा प्यायल्यानं काही वेळासाठी का होईना इतर गोष्टींचा विसर पडतो. थोडं रिलॅक्स झाल्यासारखं वाटंत. आज जागतिक चहा दिवसा निमित्ताने चहाचे फायदे काय आहेत, ते जाणून घेऊया.
ताण तणाव दूर होतो
कोरोनाकाळात अनेकांना ताणाचा सामना करावा लागत आहे. चहामध्ये तणाव दूर करण्याचे घटक असतात. चहामुळे थकवा, आळस दूर निघून जातो, असे एका संशोधनातून समोर आल्याचे सांगण्यात येते. दूधाच्या चहा इतकाच कोरा चहा, पुदीना, लेमन टी, आल्याचा चहा असे वेगवेगळ्या प्रकारचे चहा शरीरासाठी बदलत्या हवामानानुसार फायदेशीर असतात. चहामधील तुळस आणि आलं सर्दी खोकल्याच्या आजारापासून दूर ठेवते. दरम्यान, आरोग्यासाठी चहा फादेशीर असला तरी अति सेवन न करता रोज घ्यायला काही हरकत नसल्याचेही बऱ्याचदा संशोधनातून म्हटले जाते.
रोगप्रतिकारकशक्ती वाढते
आल्याचा चहा शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करतो. ज्यामुळे आपलं सर्दी-खोकल्यासारख्या आजारांपासून रक्षण होण्यास मदत होते. सर्दीमुळे होणाऱ्या डोकेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी आलं फायदेशीर ठरतं. त्यासाठी तुम्ही आलं घातलेला चहा प्यायल्यास उत्तम ठरेल.
ब्लड प्रेशर व्यवस्थित राहते
आल्याच्या चहाचे सेवन केल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहण्यास मदत होते. तसेच ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी आलं उपयोगी ठरतं. त्याचबरोबर पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी, तसेच वात, पित्त आणि कफ यांसारख्या समस्या दूर ठेवण्यासाठीही आल्याचा चहा उपयुक्त ठरतो.
हदयासाठी फायदेशीर
आल्याच्या चहामध्ये व्हिटॅमिन, खनिजे आणि अमिनो अॅसिडचे प्रमाण असल्यानं रक्ताभिसरण सुधारण्यास मदत मिळते. यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित असलेल्या समस्या कमी होतात. याशिवाय धमण्यांवर चरबी साचू नये, यासाठी आले उत्तम कार्य पार पाडते. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका कमी होतो.
मासिक पाळीत आराम मिळतो
मासिक पाळीदरम्यान महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या दिवसांमध्ये आल्याचा चहा पिणं उपयुक्त ठरतो. रक्तप्रवाह सुरळीत करण्यासोबतच मासिक पाळीदरम्यान शरीरात होणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी हा चहा परिणामकारक ठरतो.
जेवणानंतर चहा पिण्याचे फायदे आणि नुकसान
१) चहा आपल्या पचन तंत्राला साल्विया, पित्त आणि गॅस्ट्रिक ज्यूस तयार करण्यास मदत करतो. यात अॅंटी-ऑक्सिडेंट्सचं प्रमाण अधिक असल्याने हे शक्तीशाली अॅंटी-इंफ्लेमेटरीसारखं काम करतं. ज्याने पचनक्रियेशी संबंधित अनेक कमतरता पूर्ण केल्या जातात.
२) काही रिसर्च हे सांगतात की, चहामध्ये असणारं फेनोलिक तत्व आपल्या पोटातील आतड्यांच्या आतील भागात आयर्न कॉम्प्लेक्स तयार करून पचनक्रियेत अडचण निर्माण करतं.
३) जेवणासोबत तुम्हाला चहा हवा असेल आहारात आयर्न आणि व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. याने तुम्हाला होणारा त्रास टाळला जाईल.
४) आयर्नची कमतरता असलेल्या लोकांनी जेवताना चहा घेऊ नये. असंही आढळलं आहे की, जेवणादरम्यान चहा प्यायल्याने शरीरात कॅटलिनची कमतरता होते. कॅटलिन चहामध्ये आढळणारं एक तत्त्व आहे. ज्याचा आपल्या अनेक सायकॉलॉजिकल कामात महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
५) तुम्हाला जेवणासोबत चहा प्यायचाच असेल तर ग्रीन टी किंवा जिंजर टी घेऊ शकता. कारण याने पचनक्रियेला मदत मिळते.